कंकणसर्प : हा बिनविषारी साप कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या कोल्युब्रिनी या उपकुलातला आहे. याचे शास्त्रीय नाव इलाफे हेलेना आहे. हा साप सबंध भारतात सापडणारा असून ४५०—४६० मी. उंचीवर प्रायः तो आढळतो. विरळ जंगलात आणि वस्ती असलेल्या भागांत तो नेहमी सापडतो.

याची लांबी साधारणपणे ९०-१२० सेंमी. असते पण कधीकधी ती १५० सेंमी. किंवा त्यापेक्षा जास्त असते. डोके लहान, नाकपुड्या मोठ्या आणि डोळे साधारण मोठे असतात. बाहुली वाटोळी किंवा आडवी लंबवर्तुळाकार असते आणि तिच्या भोवतालच्या भागात सोनेरी ठिपके असतात. शरीर काहीसे सडपातळ आणि नितळ असते. त्याच्या मागच्या भागावरील व शेपटीवरील खवल्यांवर कणा असतो. पाठीचा रंग तपकिरी, फिकट हिरवा किंवा हिरवट काळा असतो. तिच्यावर आडवे काळे पट्टे असतात, प्रत्येक पट्ट्यात तीन किंवा जास्त पांढरे जाळीदार ठिपके असतात. ते बारीक दागिन्यांप्रमाणे दिसतात त्यामुळे याला कंकणसर्प (ट्रिंकेट स्‍नेक) हे नाव पडले आहे. पोटाचा रंग पिवळसर असतो. मानेवर गळ्यापर्यंत गेलेले दोन काळे पट्टे असतात.

हा साप धीट, चपळ आणि उग्र असतो. उंदीर, घुशी व इतर सस्तन प्राणी, सरडे, बेडूक आणि दुसरे साप देखील तो खातो. भक्ष्यावर इतक्या झपाट्याने प्रहार करतो की, तो उडी मारीत असल्याचा भास होतो.

कर्वे, ज. नी.