कांडवेल : (हिं. हडजोरा, हर्संकर, हर्जोरा; गु. चोधारी, हडसंकल; क. मंगरवळ्ळी, सांदुवळ्ळी, सं. अस्थिसंहारी, कांडवल्ली, वज्रवल्ली; इं. एडिबल-स्टेम्ड व्हाइन; लॅ. व्हायटिस (सिसस) काड्रँग्युलॅरिस; कुल-व्हायटेसी). या प्रतानारोहीचा (तनाव्याच्या मदतीने चढणाऱ्या वनस्पतीचा) प्रसार भारतातील उष्ण व रुक्ष भागांत सर्वत्र आहे, शिवाय जावा, पू.आफ्रिका, मलाया व श्रीलंका येथेही ती आढळते. जुन्या खोडाला पाने नसतात. कोवळा भग चतुष्कोणी, सपक्ष, हिरवाचार, पेऱ्याजवळ संकुचित, मांसल व गुळगुळीत असतो. प्रतान पर्णसंमुख (पानाच्या समोर) जाड व लांब असते. पाने जाड, रुंदट, अंडाकृती किंवा वृक्काकृती (मूत्रपिंडाकृती), कधी तीन ते सात खंड सलेली, सूक्ष्मदंतुर व गुळगुळीत असतात. फुले लहान चवरीसारख्या शाखित वल्लरीवर जुलैमध्ये येतात. फुलाची सामान्य संरचना ⇨व्हायटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.
मृदुफळ गोलसर, पिकल्यावर लाल व एकबीजी असते. पाने व कोवळे प्ररोह (कोंब) दीपक (भूक वाढविणारे) व आरोग्य पुनःस्थापक असून त्यांचे चूर्ण पचनाच्या तक्रारींवर देतात. खोडाचा रस स्कर्व्हीनाशक (क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा विकार नाहीसा करणारा) व अनियमित आर्तवावर (मासिक पाळीवर) गुणकारी आहे. अस्थिभंगावर रस पोटात देतात व बाहेरून लेप लावतात. दम्यावर त्याचे चाटण करून देतात. खोड आणि मुळापासून वाख काढतात. कोवळे रसाळ खोड आमटीत घालतात. ही वेल मांडवावर चढवली असता अनेक लांबचलांब लोंबती मुळे फुटतात.
जमदाडे, ज. वि.