कांडर : हा एक साप असून त्याला डुर्क्या घोणस असेही म्हणतात. हा बोइडी सर्पकुलातल्या बोइनी उपकुलातील असून ⇨अजगराचा नातेवाईक आहे. याचे स्वरुप आणि बऱ्याच सवयी अजगरासारख्या आहेत. याचे शास्त्रीय नाव एरिक्स कोनिकस असे आहे. एरिक्स वंशात जरी एकंदर सात जाती असल्या तरी त्यांपैकी फक्त दोनच भारतात आढळतात.
कांडर भारतात सगळीकडे आढळतो. रेताड मातीत राहणे याला विशेष मानवते. जमिनीत विशेष खोल नसणारी बिळे करुन त्यांत हा राहतो. हा वाळवंटात राहणारा साप आहे असे काहींचे म्हणणे आहे, पण मैदानी प्रदेशात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी फार पाऊस पडतो आणि दाट जंगल असते अशा डोंगरातही (उदा., पश्चिम घाटात) तो आढळतो.
याची लांबी ३०—७५ सेंमी. असून शरीर जाड असते शेपूट अतिशय आखूड, एकदम निमुळते झालेले आणि फक्त २५—४० मिमी. लांब असते, त्याला टोक असते. पाठीचा रंग करडा असतो किंवा त्यात गुलाबी छटा दिसते पाठीवर पिवळसर तपकिरी किंवा गर्द तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. काही नमुन्यांचा रंग काळसर असून पाठीवर करड्या रगाचे विषम आडवे पट्टे असतात. पोट फिक्कट पिवळया रंगाचे असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला जोडलेले असते. मुस्कट पुढे आलेले असून त्याचा उपयोग जमिनीत बिळे करण्याकरिता होतो. डोळे फार बारीक व बाहुली उभी असते. नाकपुड्या चिरेसारख्या असतात.
कांडर विद्रूप आणि अतिशय सुस्त साप आहे. त्याच्या सगळ्या हालचाली मंद असतात. पुष्कळदा आपले डोके अंगाखाली लपवून किंवा शरीराचा बहुतेक भाग रेताड मातीत खुपसून तो पडून राहतो. उंदीर, खारी, सरडे, बेडूक वगैरे खाऊन तो आपली उपजीविका करतो. भक्ष्याभोवती शरीराचा विळखा घालून तो घट्ट आवळून त्याला मारतो आणि ते मेल्यावरच गिळतो. कधीकधी चवताळल्यावर तो कडकडून चावतो, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे.
या सापाच्या वर्णनात काही ठिकाणी ‘हा साप अंडज असून मादी उन्हाळ्यात अंडी घालते’ असे आणि याच्या उलट काही ठिकाणी, ‘हा साप अंडी घालीत नाही मादीच्या पोटातून जिवंतच पिल्ले बाहेर पडतात’, असेही म्हटलेले आढळते. दुसरे विधान खरे असावे असे दिसते.
पहा : दुतोंड्या साप.
कर्वे, ज. नी.