कॅल्कोसाइट : (कॉपर ग्लान्स, रेडरूथाइट).  खनिज.  स्फटिक समचतुर्भुजी परंतु प्रचिनपृष्ठांतील कोन ६० असल्यामुळे व विशेषतः यमलन (जुळे स्फटिक) झालेले असले म्हणजे स्फटिक छद्मषट्‌कोणी दिसतात.  यमलन सामान्यपणे (110) पृष्ठावर होते [→ स्फटिकविज्ञान].  स्फटिक विरळाच आढळतात. पाटन : (110) अस्पष्ट. ठिसूळ. भंजन शंखाभ. काहीसे छेद्य (चाकूने कापता येणारे).  कठिनता २⋅५–३. वि. गु. ५⋅५–५⋅८. अपारदर्शक. चमक धातूसारखी.  रंग व कस शिशाप्रमाणे काळसर करडा. गंजल्यावर गंजाचा रंग हिरवा किंवा निळा होतो.  रा. सं. Cu2S हे तांब्याचे महत्त्वाचे धातुक (कच्ची धातू) असून अनेक खडकांत विखुरलेले किंवा मुख्यतः तांब्याच्या खनिज शिरांतील सल्फाइडाचे समृद्धीकरण झालेल्या भागात आढळते.  अशा तऱ्हेने हे खनिज सामान्यतः द्वितीयक (नंतरच्या) पद्धतींनी तयार झालेले असले, तरी प्राथमिक स्वरूपातही आढळते.  सामान्यतः हे कॅल्कोपायराइट, बोर्नाइट, कोव्हेलाइट, टेट्राहेड्राइट इत्यादींच्या जोडीने आढळते.  कॉर्नवॉल (इंग्लंड) व ब्रिस्टल (कनेक्टिकट, अमेरिका) येथे याचे चांगले स्फटिक आढळतात.

ठाकूर, अ. ना.