कॅलॅव्हेराइट : खनिज. स्फटिक एकनताक्ष, लांब प्रचिनाकार, प्रचीनाच्या फलकावर त्याच्या लांबीस समांतर रेखा असतात [→ स्फटिकविज्ञान]. पुष्कळदा यमलन (जुळे स्फटिक) आढळते. बहुधा कणमय स्वरूपांत आढळते. अत्यंत ठिसूळ. कठिनता २⋅५. वि. गु. ९⋅३५. अपारदर्शक. रंग पितळेसारखा ते रुपेरी. कस पिवळसर ते हिरवट करडा. चमक धातूसारखी. रा. सं. AuTe2. सोन्याच्या जागी बहुधा अल्प चांदी आलेली असते. सिल्व्हेनाइट व इतर टेल्यूराइडांच्या जोडीने ते आढळते. ⇨ पाटन नसल्याने सिल्व्हेनाइटापासून वेगळे ओळखता येते. सोन्याचे धातुक (कच्ची धातू) म्हणून त्याचा उपयोग होतो. ऑस्ट्रेलिया व कोलोरॅडो येथील याच्या साठ्यांपासून सोने मिळविले जाते. कॅलिफोर्नियातील कॅलॅव्हेरास काऊंटीमध्ये सर्वप्रथम आढळल्यावरून हे नाव पडले.

ठाकूर, अ. ना.