कॅलबाश वृक्ष : (हिं. विलायती बेल लॅ. केसेंशिया कुजेटी कुल-बिग्नोनिएसी). मूळचा दक्षिण अमेरिकेतील व हल्ली बागेतून अनेक ठिकाणी शोभेकरिता लावलेला एक लहान (६–१२ मी. उंच) वृक्ष. याच्या फांद्या जमिनीजवळून येतात व त्यांची वेडीवाकडी वाढ होते. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक) किंवा कधी दोन ते चार एकाच पेर्यावर येतात ती आयतकुंतसम (भाल्यासारखी) व तळाशी निमुळती असून टोके विशालकोनी असतात. फुले विविध रंगांची (म्हणजे पिवळी व त्यावर हिरव्या, जांभळ्या किंवा लाल रेषांची), बुंध्यावर किंवा मोठ्या फांद्यांवर एकेकटी किंवा जोडीने ऑगस्ट–ऑक्टोबरमध्ये येतात ती दुर्गंधीयुक्त असून संवर्त दोन संदलांचा पुष्पमुकुट मोठा, मध्ये चेपल्यासारखा, टोकास पसरट, पाच जुळलेल्या व दंतुर पाकळ्यांचा असतो. केसरदले चार-पाच किंजपुटात एकच कप्पा व अनेक बीजके असतात [→ फुल]. मृदुफळ घनकवची (कलिंगडासारखे), मोठे (५ ते ३० सेंमी. व्यासाचे), फलावरण जाड व कठीण आणि बिया अनेक फळ शीतल असून कवचाचा उपयोग लहान भांडे किंवा वाटीसारखा करतात. बियांचे तेल गोड्या तेलाप्रमाणे किंवा ऑलिव्ह तेलाप्रमाणे असते. बिया शिजवून खातात. फळातील मगज (गर) सारक, वेदनाहारक, स्तभंक (आकुंचन करणारा) आणि कफोत्सारक असून कोवळ्या फळांचे लोणचे करतात.
पहा : बिग्नोनिएसी.
देशपांडे, सुधाकर
“