सेव्हर्न : ग्रेट ब्रिटनमधील एक प्रमुख नदी. लांबी सु. ३३६ किमी. पाणलोटक्षेत्र ११,२६६ चौ.किमी. ही नदी मध्य वेल्समधील प्लिन्लीमॉनच्या ईशान्य उतारावर सस.पासून ६०० मी. उंचीवर उगम पावते. उगमानंतर ती आग्नेय दिशेने वाहत लॅंड्रिडॉड वेल्सजवळ येते. येथपर्यंत ती सस.पासून १५० मी. खाली आलेली असते. येथून ती ईशान्येकडे वळून व्हेल, न्यू टाऊन, वेल्शपूल या शहरांजवळून वाहते. सदरचा भाग शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लिव्ह्यमिनेकजवळ हिला व्हर्नूई नदी मिळते. या नदीसंगमानंतर ती पूर्वेकडे श्रूझब्रीपर्यंत वाहत जाते. नंतर ती दक्षिणवाहिनी होते. हिला स्टोअरपोर्ट येथे स्टोअर, वुस्टरनजीक टेम्स व टुक्सबरीजवळ ॲव्हन या नद्या मिळतात. टुक्सबरीजवळ ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन अटलांटिक महासागराच्या ब्रिस्टल खाडीस मिळते. नदीमुखाशी बूवडालीजवळ हिच्याद्वारे सरासरी प्रति सेकंद ६१.०५ घ.मी. पाण्याचा विसर्ग होतो.

ग्लॉस्टरशर ते नदीमुखखाडीपर्यंत हिच्या प्रवाहात अनेक मोठी नागमोडी वळणे आहेत. यामुळे येथे जलवाहतूक करणे कठीण होते. यासाठी येथे शार्पनिस ते ग्लॉस्टरशरपर्यंत जहाजासाठी कालवा तयार केला आहे (१८२७). सेव्हर्नमधून औद्योगिक क्षेत्राशी जोडलेल्या कालव्यातून होणाऱ्या जलवाहतुकीस औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभीच्या कालावधीत महत्त्व होते. ट्रेट व मसी या नद्यांशी सेव्हर्न नदी कालव्यांद्वारे जोडलेली आहे. शार्पनिस ते लिडने दरम्यान बर्कली व्हीडक्ट हा लोहमार्ग पूल बांधण्यात आलेला आहे. तसेच या नदीवर ७ किमी. लांबीचा लोहमार्ग बोगदा बांधण्यात आलेला आहे (१८८६). सेव्हर्नवर लंडन ते साऊथ वेल्सला जोडणारा एम-४ या मोटार वे चा भाग बनलेला सेव्हर्न ब्रिज बांधण्यात आलेला आहे (१९६०). सेव्हर्न नदीमुखखाडीशी समुद्रलाटा व नदीच्या पाण्याचा विसर्ग यामुळे लाटांची विशिष्ट स्थिती निर्माण होते. येथे यास “सेव्हर्न बीर’ म्हणतात. १९६२ मध्ये बर्कली येथे बांधण्यात आलेल्या अणुवीज केंद्रातील वीजनिर्मितीसाठी सेव्हर्नच्या पाण्याचा उपयोग करण्यात येतो. बुस्टर, स्टोअरपोर्ट, न्यू टाऊन, वेल्शपूल, ग्लॉस्टरशर, बूवडाली, श्रूझब्री, टुक्सबरी हो या नदीच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.

गाडे, ना. स.