सेलेम – २ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मॅसॅचूसेट्स राज्याच्या इसेक्स परगण्याचे एक मुख्यालय, राज्यातील ऐतिहासिक शहर व बंदर. लोकसंख्या ४१,३४० (२०१०). हे मॅसॅचूसेट्स उपसागरावर वसलेले आहे. रॉजर कॉनन्टने १६२६ मध्ये या शहराची स्थापना केली. बायबलमध्ये उल्लेख असलेल्या जेरूसलेम (सिटी ऑफ पिस) यांचे संक्षिप्त रूप सेलेम असे रूढ झाल्याचे मानतात. अमेरिकेतील पहिली सामूहिक धार्मिक प्रार्थना सभा (चर्च) या शहरात १६९२ मध्ये भरविण्यात आली होती. १६३० मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. शहराचा पूर्वेतिहास धार्मिक असहिष्णुतेमुळे झाकोळला असून १६९२ मधील जादूटोणाविषयक न्यायचौकशीमुळे हे प्रसिद्धीस आले. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये सेलेम हे न्यू इंग्लंडप्रमाणे समुद्राकाठचे बंदर आणि जहाजबांधणीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. अमेरिकन क्रांतीच्या कालखंडात (१७७६–८३) आणि १८१२ मधील झालेल्या युद्धांत बंदराचा वापर लढाऊ जहाजांसाठी करण्यात आला. सेलेम बंदराच्या उथळपणामुळे जलप्रवाहाचा परिणाम परकीय व्यापारावर परिणाम होऊन वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा ऱ्हास होत गेला व परकीय व्यापाराला उतरती कळा लागली. त्यानंतर शहरातील बहुतांश व्यावसायिक कापडउद्योग व चर्मोद्योग इ. व्यवसायांकडे वळले. शहरात या व्यवसायांबरोबरच रसायने, विद्युत् साहित्य, यंत्रसामुग्री इ. उद्योग चालतात. याशिवाय पर्यटन हेही उत्पन्न मिळविण्याचे येथील महत्त्वाचे साधन आहे.
शहरात अमेरिकन कांदबरीकार नथॅन्यल हॉथॉर्न याचे जन्मस्थळ, हाथवे व बेकेट यांची निवासस्थाने ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यात आलेली आहेत. विच हाउस (१६४२). पिकरिंग हाउस (१६५१) व जॉन वॉर्ड हाउस या प्रसिद्ध वास्तू स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. येथील पीबॉडी अँड सेलेम स्टेट कॉलेज (१८५४) त्यातील कलावीथी. वेधशाळा. “द क्रोनिकल ऑफ सेलेम ‘ ही भित्तिचित्रे यांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातील पायोनियर व्हिलेजची पुनर्रचना करण्यात आली आहे.
गाडे, ना. स.; राऊत, अमोल