शेमटी : (मेफ्लाय). एफिमेरोप्टेरा गणातील मऊ अंगाचे कीटक. तळी, सरोवरे, नाले, नदया यांच्या काठांवर सायंकाळी सूर्यास्तानंतर ते थव्याथव्याने दिसतात. ते दिव्याकडे फारच आकर्षिले जातात. त्यांचे आयुष्य फक्त शेमटी (प्रौढ नर)काही तासांचे असते परंतु त्यांची डिंभकावस्था मात्र तीन वर्षांपर्यंत असते. या कीटकांची अंडी व डिंभकावस्था पाण्यात पूर्ण होतात. डिंभक माशांचे उपयुक्त अन्न असल्यामुळे हे कीटक उपयोगी असतात. यांचे नर उडताना खालीवर अशा हालचाली करतात की ते एक प्रकारचा नाच करतात असे वाटते. इतर दुसऱ्या कीटकांत न आढळणारा गुणधर्म या कीटकात असतो तो म्हणजे डिंभकावस्था पूर्ण झाल्यावर पूर्ण वाढलेला शेमटी कीटक होण्यापूर्वी आणखी एक अवस्था असते. या अवस्थेत त्यांना पूर्ण वाढलेल्या कीटकाप्रमाणेपंख व पाय असले तरी त्यांची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यांचा रंग फिकटअसतो व जननेंद्रियांची पूर्ण वाढ झालेली नसते. या अवस्थेत हे कीटक पुन्हा एकदा कात टाकून पूर्ण वाढलेले शेमटी होतात. आणखी महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे मादीला सातव्या-आठव्या खंडकांवर दोन जननछिद्रे असतात. नराला नवव्या खंडकावर दोन शिश्ने असतात.शेमटीचे पंख कलामय असून शृंगिका आखूड असतात. शरीराच्या शेवटी दोन लांब गुद पुच्छिका असतात.काही जातींमध्ये दोन पुच्छिकांच्या मधोमध तिसरीही असते.

पोखरकर, रा. ना.