शेपू : [बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू हिं. सोवा गु. सुवा सं. शतपुष्पी क. सब्बसिगे इं. ॲनेट, डिल लॅ. प्युसिडॅनम गॅविओलेन्स (ॲनेयम सोवा), कुल-अंबेलिफेरी]. या ३० – ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. दक्षिण यूरोप व पश्चिम आशियात ती लागवडीत आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. शेपूची पाने संयुक्त त्रिगुण-पिच्छाकृती, शेवटचे दलक रेषाकृती, देठ तळाजवळ रूंदट, फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये येतात. फळ (आंदोलिपाली) ४ २ मिमी. कंगोरे व अरूंद-पंखाचे बिया सपाट. तैलनलिका व कंगोरे एकाआड एक असतात. [→ अंबेलेलीझ].

बियांपासून बाष्पनशील तेल मिळते. ते वायुसारी असून मुलांना उदरवायूवर देतात. फळ (बी) उष्ण, भूक वाढविणारे, मूत्रल व सारक असते बाळंतशोपा स्त्रियांना प्रसूतीनंतर शक्तिवर्धक म्हणून देतात. बी कुटून पाण्यात उकळून व त्यामध्ये त्याची मुळे मिसळून संधिवात व सुजेवर लावतात. पानांना एक प्रकारचा वास येतो. पालेभाजी तिखट, कडवट, कफवातनाशक, शुकदोषनाशक, कृमिनाशक समजतात.

भारतामध्ये पालेभाजीसाठी पाण्याखाली उन्हाळी व हिवाळी हंगामांत लागवड करतात. बागायती जमीन दोनदा नांगरून हेक्टरी २०- २२ टन शेणखत घालून कुळवून तिच्यात ३.५ २ मी. आकाराचे वाफे तयार करतात. हेक्टरमधील वाफ्यांत ४-५ किग्रॅ. बी मुठीने फोकून वाफ्यांना पाणी देतात. चार-पाच आठवडयांत पीक विक्रीसाठी तयार होते. हेक्टरी ४-५ हजार किग्रॅ. पालेभाजी मिळते.

पाटील, ह. चिं.