संजान : महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी स्थळ. ते ठाणे जिल्ह्यात डहाणू तालुक्यात मुंबई–बडोदे मध्यरेल्वे मार्गावर मुंबईच्या उत्तरेस सु. १२५ किमी.वर वसले आहे. प्राचीन परंपरेनुसार ते गद्ध सिंग नावाच्या राजाने वसविले असून त्याचे क्षेत्रफळ मध्ययुगात सु. ९ x १३ कोस होते. त्यामुळे ते नवतेरी नगर म्हणून प्रसिद्ध होते. तत्संबंधी शिलाहार वंशाचे कोरीव लेख, अरब प्रवाशांचे वृत्तांत व पोर्तुगीज वखारींचे दप्तर यांतून माहिती मिळते. महाभारतात याचा संजयंति-नगरी असा उल्लेख आला आहे. संजय, सहंजन संयान, हंजमान सिंदान, सेंट जॉन सदान वगैरे भिन्न नावांनी त्याचा कागदोपत्री उल्लेख आढळतो.काही अभ्यासकांच्या मते इराणमधून आलेल्या पारशी लोकांनी प्रथम येथे इ. स. ७२० मध्ये वसाहत केली. या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता उत्तर कोकणात दृढतर झाली होती. त्यामुळे नवव्या शतकात संजान येथे त्यांचे सामंत कारभार करीत. राष्ट्रकूटांनी येथे भगवती देवीचे मंदिर बांधले. राष्ट्रकूटांचे मांडलिक शिलाहार राजे या देवीचे निस्सीम भक्त होते. शिलाहारांच्या तीन तामपटांत संजानविषयी विश्र्वसनीय माहिती मिळते. वप्पुवन्न या शिलाहार राजाच्या कारकीर्दीत (कार. ८८०-९१०) त्याचा समाट राष्ट्रकूट नृपती दुसरा कृष्ण याने संजान ( संयान ) व त्याजवळचा प्रदेश मधुमती ( मुहम्मद ) नामक ताजिक( अरब ) मांडलिकाला देऊन त्याची तेथील सामंत म्हणून नियुक्ती केली होती. पुढे त्याचा मुलगा सहियारहार ( शहरिअर) व नातू सुगतिप ( सुबक्त ) अशा अरबांच्या तीन पिढयंनी येथील सत्ता भोगली. मुहम्मद, शहरिअर व सुबक्त या मुसलमान नावांची मधुमती, सहियारहार व सुगतिप ही संस्कृत रूपांतरे कोरीव लेखांत आढळतात. सुबक्त याने राज्यकारभारासाठी हिंदू मंत्री व अधिकारी संजानमध्ये नेमले. त्याने काही धर्मादाय कृत्ये केल्याचा उल्लेख तामपटात आढळतो. संजान येथे त्याने एक अन्नछत्र उघडले होते. तसेच संजानजवळच्या दोन नदया पार करण्याकरिता साकवांची सोय केली होती. संजान येथील भगवती देवीच्या सर्वोपकरणांनी युक्त अशा उपभोगाकरिता आणि मंदिराच्या डागडुजीकरिता आपला मालक राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याच्या संमतीने गामदान व भूमिदान केले होते. त्याने येथे जामा मशीद बांधली. हे अरबांचे सामंत घराणे राष्ट्रकूटांच्या पतनापर्यंत सयान ( संजान ) मंडळात राज्यकर्ते होते. ह्यानंतर शिलाहार राजा अपराजित ( कार. ९७५-१०१०) याने त्यांचा उच्छेद करून तेथे मोढवंशी विज्जराणक नामक सामंताची नियुक्ती केली. पुढे त्याचा मुलगा चामुंडराज संजानचा सत्ताधीश झाला. मध्यंतरी शिलाहार राजे दुर्बल झाल्याचे दिसताच, संजानचे मोढवंशी सामंत शिरजोर झाले. चिंचणी येथे सापडलेल्या तामपटात विज्जल या सामंताने ‘ तगरपूर-परमेश्वर ’ आणि ‘ शरणागत वजपंजर ’ या शिलाहारांनी धारण केलेल्या बिरूदांनी स्वत:चा उल्लेख केला आहे. दुसऱ्या एका कोरीव लेखात ( इ. स. १०३४)चामुंडराजाने संजान येथील भगवती देवीच्या कौतुकमठिकेला एका तेल घाण्याचे दान केले होते. त्या तेलाचा उपयोग मंदिरातील दिव्यांकरिता आणि तेथे येणाऱ्या श्रोत्रिय बाह्मणांच्या पायांना लावण्याकरिता करावा, असे नमूद केले आहे. पुढे मुम्मुणी ( कार. १०४५-७०) या पराकमी शिलाहार राजाने मोढवंशी बंडखोर सामंतांचा उच्छेद करून संयान मंडळ आपल्या राज्याला जोडले.

अरब प्रवाशांच्या बाराव्या-तेराव्या शतकांतील वृत्तांतात संजानचा उल्लेख सिंदान-संदान असा केला असून ते पश्र्चिम समुद्रकिनाऱ्यावरील आयात–निर्यात करणारे एक समृद्ध व्यापारी बंदर असल्याचा निर्देश आढळतो. अरबस्तानातून या बंदरात अनेक मौल्यवान वस्तू विकीसाठी येत. त्यांत पाचूचे खडे असत. येथून मसाल्याचे पदार्थ व तलम कापडाची निर्यात होत असे. अल-इद्रिस्त या अरबी प्रवाशाने संजानला भेट दिली होती. त्याने संजानचे लोक पराकमी, श्रीमंत व व्यापारी वृत्तीचे असून हे बंदर समृद्ध असल्याचे नोंदविले आहे. अलाउद्दीन खल्जी याचा सेनापती अलफ खान याने हे नगर लुटले आणि तेथील धार्मिक वास्तूंची मोडतोड केली. शिवाय अनेक पारशांना कंठस्नान घातले. जे काही यातून वाचले, त्यांनी जवळच्या नार्गोल गावी आश्रय घेतला. पोर्तुगीजांच्या आगमनापर्यंत ते गाव ओसाड होते.पोर्तुगीजांचा सेनापती नूद कून्या याने गुजरातच्या बहादुरशाहा या सुलतानाबरोबर संघर्ष करून १५३४ साली वसई प्रांत जिंकला आणि संजान त्यांच्या आधिपत्याखाली आले. पोर्तुगीजांच्या कागदोपत्री त्याचा उल्लेख सेंट जॉन बंदर असा आढळतो. या सुमारास त्याचे प्राचीन वैभव नष्ट झाले होते. लोकसंख्याही घटली होती आणि उत्पन्नही फारसे नव्हते. पोर्तुगीजांनी येथे सहा भव्य बुरूजांचा वर्तुळाकार भुईकोट किल्ला बांधला (१६१३). त्यात एक विहीर, दोन तळी, काही घरे, दारूगोळ्यासाठी कोठार व एक चर्च बांधले होते, असा उल्लेख मिळतो. मराठयांनी १७३९ मध्ये वसईवरील मोहिमेत तेही जिंकले होते. पुढे पेशवाईच्या पतनानंतर (१८१८) ते ब्रिटिश अंमलाखाली आले.विदयमान संजान हे एक उद्ध्वस्त झालेल्या प्राचीन अवशेषांचे ओसाड गाव असून तेथे गाळाने भरलेली शुष्क झालेली तळी आणि सरोवरे आढळतात. त्याचा स्थानिक लोक शेतीसाठी उपयोग करतात. येथे पारशांची अग्यारी, किल्ला, मंदिरे, मशिदी व कबरस्थाने इत्यादींचे प्राचीन अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत.

देशपांडे, सु. र.