सहल : मनोरंजनार्थ केलेला प्रवास. सोबत्यांसमवेत सहप्रवासाचा सामुदायिक आनंद देणारा व अनुषंगाने सहलस्थळाची प्रत्यक्षदर्शी माहिती व ज्ञान मिळवून देणारा, हा रंजनप्रकार प्राचीन काळापासून शतकानुशतके लोकप्रिय ठरत आला आहे. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित असे इहलोकीचे भव्य व रम्य सौंदर्य प्रत्यक्ष डोळे भरून पाहावे, ही इच्छा व कुतूहल मानवी मनात सहजप्रेरणेने वसत असते.अशी सौंदर्यस्थळे पाहण्याच्या तीव्र ओढीतून व आकांक्षेतून सहलीची कल्पना अधिकाधिक विकसित होत व विस्तारत गेली आणि त्यातून पर्यटन-व्यवसायास चालना मिळाली. [⟶पर्यटन].
सहली विविध उद्दिष्टांनी, विविध ठिकाणी काढल्या जातात. आवडती ठिकाणे पाहणे, विशिष्ट प्रेक्षणीय स्थळांना खास ठरवून व नियोजनबद्ध भेटी देणे, केवळ करमणुक आणि मौजमजेखातर केलेली स्वच्छंद भटकंती-ह्यांत प्रवासाचा मार्ग व ठिकाणे निश्चितपणे ठरविलेली नसतात. धार्मिक स्थळांच्या यात्रा, आरोग्याच्या कारणासाठी केलेला प्रवास व आरोग्यधामातील निवास, अभ्यास व संशोधन यांसाठी विशिष्ट स्थळांचा केलेला प्रवास-म्हणजे अभ्यास-सहल (स्टडी टूर) होय. अशी अनेकविध उद्दिष्टे व हेतू सहलींच्या आयोजनामागे असतात. त्यावरून सहलींचे अनेकविध प्रकार संभवतात. उदा., धार्मिक यात्रा, अभ्यास-सहली, शैक्षणिक सहली इत्यादी. शैक्षणिक सहली शालेय, महाविदयालयीन इ. स्तरांवर तसेच विशिष्ट शैक्षणिक प्रकल्पाचा भाग म्हणूनही काढल्या जातात.
मानवाने प्राचीन काळापासून स्वदेशातील अज्ञात प्रदेश तसेच परदेशांतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या उद्दिष्टांनी मनमुराद, स्वैर भटकंती केली असल्याचे दिसून येते. प्राचीन काळी ग्रीस व रोम येथील अनेक लोक ज्ञान आणि मनोरंजन अशा दुहेरी हेतूंनी जवळपासच्या, तसेच दूरदूरच्या पदेशांत गटागटांनी प्रवास करीत. मध्ययुगात आणि नंतरच्या काळातही यूरोप व आशिया खंडांतील बहुसंख्य यात्रिक ख्रिस्ती तसेच मुस्लिम धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी समुदायाने प्रवास करीत असत. पश्चिमी प्रबोधनकाळात एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन हा इहलोकनिष्ट होऊ लागला व सांस्कृतिक, ऐतिहासिक, कला-वाङ्मयीन नव्या-जुन्या निर्मितीबद्दल नवे आकर्षण निर्माण झाले. त्यातून सर्वसामान्य लोकांत सहली आणि पर्यटन यांविषयीची आस्था व आवड वाढीस लागली. अठराव्या शतकात संपूर्ण यूरोप खंडाची सफर करणे, हा इंग्रज व्यक्तींच्या सर्वांगीण शिक्षणाचा एक अविभाज्य भाग मानला जात असे व आर्थिक दृष्टया ऐपत असलेल्या व्यक्ती असा प्रवास आवर्जून करीत असत. एकोणिसाव्या शतकात प्रवासाच्या व वाहतुकीच्या साधनांत जसजशा सुधारणा होत गेल्या, तसतसा पर्यटन उदयोग भरभराटीला येऊ लागला. सुसंघटित व नियोजनबद्ध सहलींची लोकप्रियता वाढत गेली. एकोणिसाव्या शतकात टॉमस कुक (१८०८-९२) ह्या इंग्लिश पर्यटन व्यावसायिकाने मोठया प्रमाणात बहुसंख्य प्रवाशांसाठी रेल्वे-सहली आयोजित केल्या. त्याने ६०० लोकांची लिसेस्टर ते लॅपबरो ही रेल्वे-सहल आयोजित केली. महाप्रदर्शन (१८५१) व पॅरिस प्रदर्शन (१८५५) पाहण्यासाठी त्याने बहुसंख्य प्रवाशांच्या प्रचंड सहली आयोजित केल्या. यूरोपची भव्य सहल (१८५६) त्याने यशस्वीपणे घडवून आणली. टॉमस कुक अँड सन्स (१८६४) ही यूरोपमधील पहिली व्यावसायिक पर्यटन संस्था त्याने स्थापन केली. अशा प्रकारे पर्यटन व्यवसायाची सुनियोजित व पद्धतशीर बांधणी करण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.
सहलींसाठी उद्दिष्टांनुरूप विविध आकर्षक व वैशिष्टयपूर्ण ठिकाणे निवडली जातात. देशातील वा परदेशांतील पुरातन वास्तू, स्मारके, इतिहासप्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, पवित्र धार्मिक स्थळे, मोठे औदयोगिक प्रकल्प, वसाहती व कारखाने, अन्य महत्त्वाचे प्रकल्प, देशातील वा परदेशांतील कलासंग्रहालये, वस्तुसंग्रहालये, प्राणिसंग्रहालये, अभयारण्ये इत्यादींचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल.
आधुनिक शिक्षणपद्धतीमध्ये शैक्षणिक वा शालेय सहलींना खूप महत्त्वाचे स्थान आहे. अभ्यासेतर कार्यकमांमध्ये शालेय, निरनिराळ्या वर्गांच्या सहलींचे आयोजन हा प्रमुख भाग असतो. विदयार्थ्यांना सहलींमधून प्रवासाचा, एकत्रित सहजीवनाचा आनंद मिळावा सहलींतील खेळ, गाणी, गप्पागोष्टी यांतून मनोरंजन व्हावे सहलस्थळाची प्रत्यक्षदर्शी माहिती व ज्ञान यांचा लाभ व्हावा सामाजिक जाणिवा जोपासल्या जाव्यात, अशा अनेकविध उद्दिष्टांनी शाळांमधून सहलींसारखे उपक्रम राबविले जातात. सहलींमुळे विदयार्थ्यांमध्ये सामूहिक जीवनाची गोडी वाढते. विदयार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्तप्रियता, सहकार्याची वृत्ती, स्वावलंबन, नेतृत्वगुण, सामाजिक जाणिवांचे संवर्धन इ. गुण सहलींमधून जोपासले जातात. समाजात कसे वावरावे, चारचौघांत मिळून-मिसळून कसे वागावे, ह्याचे धडे सहलींच्या अनुभवातून प्रत्यक्षपणे मिळतात. ‘ केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार’,या प्रसिद्ध उक्तीनुसार निरनिराळ्या प्रदेशांत फिरल्याने तेथील लोकजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. वेगवेगळ्या समाजांची वैशिष्टये, चालीरीती यांचे ज्ञान निरीक्षणातून मिळू शकते. विविध ठिकाणे प्रत्यक्ष पाहून ज्ञानात व माहितीत भर पडते. प्रेक्षणीय स्थळे, प्रसिद्घ वस्तुसंग्रहालये, प्राणिसंग्रहालये, औदयोगिक प्रकल्प व कारखाने, कलासंग्रहालये, ऐतिहासिक वास्तू, किल्ले इ. ठिकाणी सहली आयोजित करण्यामध्ये त्या त्या विशिष्ट स्थळाचा व तत्संबद्ध विषयाचा विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षणातून आणि माहिती मिळवून अभ्यास करावा, ही भूमिका असते. उदा., ललित कलांचा अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांनी कला प्रदर्शने, जुनी-नवी वास्तुशिल्पे, प्राचीन कलावशेषांची स्थळे, निसर्गदृश्ये इ. प्रत्यक्ष पाहून अनुभवजन्य ज्ञान मिळवावे, हे अशा अभ्यास-सहली आयोजित करण्यामागचे मुख्य प्रयोजन असते. इतिहासाच्या अभ्यासकाने प्राचीन ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके इ. ठिकाणांच्या सहली केल्याने त्याच्या इतिहासविषयक ज्ञानात भर पडते. शेतीचे विविध प्रकार, नदया, तलाव, धबधबे, डोंगर, झाडे, पशू, पक्षी, उदयाने, वनस्पती इ. अनेक गोष्टींच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून निसर्गविषयक ज्ञान वाढीस लागते. अशा अभ्यासातून त्या त्या विषयात जास्त रस निर्माण होतो.
सप्ताहाअखेरच्या सुट्ट्यांमध्ये योजलेल्या छोटया सफरी ( वीकएन्ड टूर ), पायी सहल वा पदभ्रमण, गिर्यारोहण, अडथळ्यांच्या क्षेत्रपार ( क्रॉसकंट्री) सहली, अडथळे पार करून पायी केलेली भटकंती ( हिच् हायकिंग ) हे सहलींचे काही वैशिष्टयपूर्ण प्रकार होत.
आठवडयाच्या अखेरीस येणाऱ्या छोटया सुट्या, दीर्घकालीन सुट्या, रजाकालावधी इत्यादींतून लाभणारा फावला वेळ आनंदात मौजमजेत घालविण्यासाठी कुटुंबियांच्या, मित्रमंडळींच्या वा स्नेही-परिवारांच्या एकत्रित सहली, लहान-मोठया प्रमाणात योजिल्या जातात. दैनंदिन जीवनातील चाकोरीबद्धता, कामाचा शिणवटा यांपासून घडीभराची सुटका मिळावी, निसर्गरम्य परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद लुटावा, अशा हेतूंनी ह्या सहली योजिल्या जातात. निखळ करमणूक हाच त्यांचा एकमेव उद्देश असतो.
शालेय विदयार्थ्यांच्या पदभ्रमण-सहली जर्मनीमध्ये विशेषत्वाने प्रचलित आहेत. तेथे मुलांना जर्मनीच्या सर्व प्रांतांतून तसेच आल्प्स पर्वतराजीतून पायी सहलीसाठी नेतात. अशा सहलींची योजनाबद्ध आखणी व नियोजन केले जाते. अशा योजना आखताना त्या विदयार्थ्यांच्या शिक्षणक्रमातील इतिहास, भूगोल, भूरचना इ. विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान मुलांना त्या सहलींद्वारा मिळावे, ही दृष्टी ठेवली जाते. पायी चालणे, डोंगर चढणे इ. क्रियांमुळे विदयार्थी शारीरिक दृष्टयाही सक्षम व सुदृढ बनतात. जास्त दिवसांच्या मोठया सहली दीर्घ सुट्ट्यांमध्ये, तर लहान-लहान सहली शाळा चालू असतानाच जवळपासची ठिकाणे पाहण्यासाठी काढल्या जातात. अशा सर्व प्रकारांच्या सहलींमध्ये शिक्षकही सहभागी होत असल्याने, विदयार्थी व शिक्षक यांच्यात जवळीक आणि जिव्हाळा वाढतो. हा प्रवास पायीच करावयाचा असल्याने विदयार्थी स्वत:च्या पाठीवर पिशव्या बांधून त्यांत खादयपदार्थ शिजविण्याची भांडी, कपडे व इतर गरजेच्या वस्तू ठेवून ते वाहून नेतात. प्रवासात वाटेत ते स्वयंपाक करतात. ठिकठिकाणच्या शाळांमध्ये वा सार्वजनिक वास्तूंमध्ये रात्रीचा मुक्काम करतात. सर्व प्रवास पायीच करावा लागत असल्याने स्वावलंबन, कष्ट, काटकसर, स्वयंशिस्त इ. गोष्टी अनुभवाने शिकता येतात. प्रत्यक्ष पायाखालून सगळा प्रदेश घातल्याने मिळणारे ज्ञान जास्त चांगल्या पद्धतीने प्राप्त होऊ शकते. सर्व प्रकारांच्या सहलींना प्रवासी वाहतूक, निवासस्थाने, उपहारगृहे इ. ठिकाणी खास आर्थिक सवलती दिल्या जातात. त्यामुळे सहलींचा एकूण खर्च कमी येतो. हे खर्चही जर्मनीतील धनिक पालक, शिक्षणसंस्था यांचे आर्थिक साहाय्य तसेच खाजगी देणग्या यांतून भागविले जातात. अशा उपयुक्त उपक्रमांना उत्तेजन देण्यासाठी जर्मनीत राष्ट्रीय व स्थानिक पातळ्यांवरही अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या योगे हजारो विदयार्थी व तरूण सहलींसारख्या उपक्रमांचा लाभ घेऊ शकतात.
शालेय विदयार्थ्यांच्या सहलींचे अनेक प्रकार हे त्यांचे हेतू, स्वरूप व साधने यांवरून निर्माण झाले आहेत. उदा., ⇨ बालवीर संघटनेच्या विस्ताराबरोबरच त्यात अनेक सहलींचे पकार समाविष्ट झाले : बालवीरचाल ( स्काऊट पेस ), उंच व अवघड अडथळ्यांच्या ठिकाणांच्या क्षेत्रपार-सहली (क्रॉसकंट्री हाईक) इत्यादी. या प्रकारांतर्गत माग काढत जाण्याची संकटमय, उच्च स्तरावरील इ. सहली मोडतात. यांत बारा मिनिटांत दीड किमी. अंतर कापणे, गुप्त संकेतांनुसार व खाणाखुणांच्या साहाय्याने गटा-गटाने माग काढणे, संकटसमयी प्रसंगावधान, समयसूचकता, साहस यांची कसोटी लागेल, अशा प्रकारे सहलींची आखणी करणे इ. अनेक उपक्रम राबविले जातात. उच्च स्तरावरील सहलीत दिलेल्या नकाशाच्या, होकायंत्राच्या व सूचनांच्या अनुरोधाने बालवीरांनी दोघादोघांच्या जोडीने बावीस किमी. अंतर पार करावयाची योजना असते. वाटेत रात्रीच्या वेळी राहुटी ठोकून मुक्काम करावयाचा, स्वयंपाक करावयाचा, टिपणे काढावयाची, चित्रे काढावयाची आणि शेवटी आलेल्या अनुभवांचे इतिवृत्त लिहून काढावयाचे इ. गोष्टी बालवीरांना कराव्या लागतात.
पाश्चात्त्य देशांत विशेषत्वाने प्रचलित असलेल्या ‘ हिच् हाईक ’ या सहल प्रकारात वाटेत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना हात करून थांबवून व गाडीतून नेण्याची विनंती करून ( लिफ्ट मागून ) प्रवास केला जातो. अशा सहलीत एक आगळाच रोमांचकारी आनंद सहल करणाऱ्याला लाभतो.
कोणत्याही प्रकारच्या सहलींची योजना आखताना त्या सहलीची विशिष्ट उद्दिष्टे, हेतू, उपयुक्तता इ. बाबी विचारात घेऊन सहलीचे आयोजन करावे लागते. प्रत्यक्ष सहल काढण्यापूर्वी काही पूर्वनियोजन व पूर्वतयारी आवश्यक असते. सहलीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना कोणकोणत्या स्थळांना भेटी दयावयाच्या, तेथे काय काय पाहावयाचे, कोणकोणती माहिती मिळवावयाची, कोणती टिपणे काढावयाची इ. गोष्टींची पूर्वसूचना देणे श्रेयस्कर ठरते. सहभागी व्यक्तींनी सहलीला येताना काय तयारी करावी, कोणत्या वस्तू बरोबर घ्याव्यात, ह्याचीही सूचना आधी देणे इष्ट असते. सहलीचा एकूण कार्यक्रम, निघण्याच्या वेळा, मुक्कामाला पोहोचण्याच्या वेळा, मुक्कामाची ठिकाणे, तेथे पाहण्याची प्रेक्षणीय स्थळे इ. माहिती आयोजकांना सहलीत सहभागी होणाऱ्या प्रवाशांना आधी द्यावी लागते. सहलीचा ठरलेला कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार व्यवस्थित पार पडतो आहे ना, हे पाहण्याची जबाबदारी सहलीच्या संयोजकावर वा व्यवस्थापकावर असते. ज्या ठिकाणी मुक्काम करावयाचा तेथील निवासव्यवस्था, अल्पोपहार व भोजनव्यवस्था यांसारख्या सोयीसुविधा सहलीला येणाऱ्या व्यक्तींना रास्त व माफक दरात उपलब्ध करून देणे, हे सहल व्यवस्थापकाचे कर्तव्य असते. सहलीमध्ये जी प्रेक्षणीय स्थळे पाहावयाची, त्यांसाठी पूर्वपरवानगी घेणे, आवश्यक असल्यास ती आधी घेऊन ठेवणे, ही संयोजकांची जबाबदारी असते. मुख्यत: सहलीतील सहभागी प्रवाशांना प्रवासाच्या वाहतुकीच्या, भोजन -निवासादी सोयीसुविधा सवलतीच्या व रास्त दरांत उपलब्ध करून देणे व एकूणच सहलीचे आर्थिक नियोजन व्यवस्थित रीत्या करणे ही सहल-आयोजकाची प्राथमिक जबाबदारी असते. पेक्षणीय स्थळांच्या वा दीर्घ मुदतीच्या सहलींमध्ये कित्येकदा वाटाडयाची वा मार्गदर्शकाची भूमिकाही महत्त्वाची ठरते. तो त्या-त्या स्थळाची ऐतिहासिक, भौगोलिक, पुरातत्त्वीय, कलासौंदर्यात्मक वैशिष्टये तसेच अन्य महत्त्वाची माहिती आपल्या रंगतदार निवेदनशैलीत वर्णन करून सांगतो. त्यामुळे प्रवाशांच्या ज्ञानात भर पडते.
गोखले, श्री. पु. इनामदार, श्री. दे.