सहरावी अरब प्रजासत्ताक : मोरोक्कोमधील उत्तर अटलांटिक किनारपट्टीच्या प्रदेशातील एक प्रजासत्ताक राज्य. क्षेत्रफळ २,५६,१२० चौ.किमी. लोकसंख्या ३,८२,६१७ (२००६). अल् अलाईयून हे राजधानीचे ठिकाण आहे. १९७६ पर्यंत हा प्रदेश वेस्टर्न सहारा किंवा स्पॅनिश सहारा म्हणून ओळखला जात होता. पूर्वी या प्रदेशावर सुरूवातीला फ्रेचांची सत्ता होती. या प्रदेशाचा बराच भाग वाळवंटी असून काही भागांत फॉस्फेटचे समृद्ध साठे आहेत.
स्पेन, मोरोक्को व मॉरिटेनिया यांच्यात १४ नोव्हेंबर १९७५ रोजी करार झाला. त्यानुसार स्पेनने स्पॅनिश सहारावरील आपला ताबा सोडून तो मॉरिटेनिया व मोरोक्को यांच्या प्रशासनाखाली २८ फेबुवारी १९७६ पासून सुपूर्द केला. त्यानंतर १४ एप्रिल १९७६ रोजी मोरोक्को व मॉरिटेनिया यांच्यात सरहद्दीची मर्यादा ठरविण्याबाबत करार झाला. त्यानुसार मोरोक्कोला यातील २/३ पेक्षा जास्त प्रदेश मिळाला. म्हणून वेस्टर्न सहारा (स्पॅनिश सहारा) या प्रदेशाच्या सामीलीकरणाला येथील मूळ रहिवासी सहरावी या भटक्या जमातीसह पॉप्युलर फंट फॉर द लिबरेशन ऑफ साग्या एल् आमा अँड रिओ दे ओरो ( पॉलिसारिओ ) या संघटनेने तीव्र विरोध केला आणि ‘ सहारन अरब डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ’ म्हणून प्रदेशाची घोषणा केली. यास अल्जीरियाने पाठिंबा दिला. तसेच १ ऑक्टोबर १९८५ रोजी स्थापन झालेल्या नवीन सरकारला भारताने संमती दिली. परंतु या बाबतीत पॉलिसारिओ संघटनेचा सशस्त्र संघर्ष अजूनही चालू आहे. परिणामतः हा प्रदेश लष्करी विभाग जाहीर करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांनी या बाबत वेस्टर्न सहारामध्ये सार्वमत घेण्याचे ठरविले असून त्यानुसार स्वातंत्र्य वा विलीनीकरण याचा निर्णय होईल (२००७).
पहा : मॉरिटेनिया मोरोक्को स्पॅनिश सहारा.
कुंभारगावकर, य. रा.