सहजप्रेरणा : ( इन्‌स्टिंक्ट ). मानवांच्या तसेच मानवेतर प्राण्यांच्या वर्तनामागे काही उपजत, वंशागत (इनहेरिटेड ) आणि असंपादित, म्हणजे शिकून न संपादिलेल्या अशा सहजप्रेरणा असतात, अशी धारणा बरीच जुनी आहे. कुंभारमाशीसारखे काही कीटकसुद्धा विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट प्रकारची अशी आपली घरे बनवितात. घरासाठी योग्य जागा निवडणे, ते बनविण्यासाठी योग्य सामग्री जमविणे, घराला विवक्षित आकार देणे, त्यात अंडी घालण्यासाठी सोयीची अशी व्यवस्था करणे इ. गोष्टी ती टप्प्याटप्प्याने करत जाते पण तिला कोणी शिकवलेले नसते. हे सर्व ती सहजप्रेरणेने करत असते.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी प्रख्यात ब्रिटिश मानसशास्त्रज्ज्ञ ⇨ विल्यम मॅक्डूगल (१८७१-१९३८) ह्याने सहजप्रेरणांसंबंधीची आपली प्रणाली मांडली. मॅक्डूगलने सहजप्रेरणेची जी व्याख्या केली तिचा आशय असा : सहजप्रेरणा ही एक उपजत, वंशागत प्रवृत्ती असते. ह्या प्रवृत्तीमुळे जीवाचे उदा., माणसाचे लक्ष एखादया विशिष्ट वस्तूकडे वेधले जाते. तिचा बोध झाल्यानंतर माणसाला काही भावनात्मक आंदोलनांचा अनुभव येतो आणि मग त्या संदर्भात त्याच्याकडून एका विवक्षित पद्धतीने कृती घडते. म्हणजे सहजप्रेरणेला तीन पैलू असतात. पहिला बोधाचा वा बोधनांचा (कॉग्निटिव्ह), दुसरा भावात्मक (ॲफेक्टिव्ह) आणि तिसरा कारक वा कियेचा ( कॉनेटिव्ह ) म्हणजे सहजप्रेरणेमुळे माणसाला विशिष्ट चेतकांचे बोधन होते त्यानंतर विशिष्ट भावनांचा त्याला अनुभव येतो आणि तो विशिष्ट प्रकारे कृती करतो. उपजत अशा ह्या सहजप्रेरणा माणसाच्या सर्व कियाशीलतेच्या मूलचालक ( प्राइम मूव्हर्स ) होत.

मॅक्डूगलच्या मते भावना हा प्रत्येक सहजप्रेरणेचा गाभा होय. त्यामुळे एखादी सहजप्रेरणा जागृत होणे, म्हणजे तिच्याशी निगडित असलेली विशिष्ट भावनाही जागृत होणे. समोर धोका दिसला, तर माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करतो. ही पलायनाची प्रवृत्ती भीती ह्या भावनेशी निगडित असते.

मॅक्डूगलने पुढील सहजप्रेरणा अंतिम म्हणून नमूद केल्या : (१) पलायन, (२) जुगुप्सा (निर्भर्त्सना), (३) कुतूहल, (४) युद्धप्रवणता, (५) आत्मप्रभाव ( सेल्फ-ॲसर्शन ), (६) आत्म-अवमानीकरण ( सेल्फ अबेसमेंट-आपल्या ‘ स्व ’ विषयी नकारात्मक भावना ), (७) वात्सल्य, (८) कामप्रेरणा, (९) अन्नसंपादन, (१०) समूहजीवन, (११) संपादन, (१२) निर्मिती.

ह्या सहजप्रेरणा उगमस्थानी असलेले वर्तनाविष्कार आपल्याला दिसतात. उदा., माणसांना परस्परांच्या सहवासाची, तसेच समूह निर्माण करण्याची इच्छा, ही समूहजीवाच्या सहजप्रेरणेतून आलेली आहे. ज्ञानार्जन, वैज्ञानिक संशोधन, कुतूहल इ. या सहजप्रेरणेचा परिणाम आहे. कुटुंब ही संस्था कामप्रेरणा, वात्सल्य आणि संपादन ह्या सहजप्रेरणांशी निगडित आहे.

मॅक्डूगलची ही सहजप्रेरणा-प्रणाली प्रभावी ठरली. संशोधनाच्या अनेक क्षेत्रांत तिचा गृहीतक म्हणून उपयोग करण्यात आला परंतु ह्या प्रणालीवर टीकाही होऊ लागली. नाइट डनलॅप आणि जे. बी. वॉटसन हे प्रणालीचे प्रमुख टीकाकार होत. माणसाचे बहुतेक वर्तन त्याच्या ज्ञानसंपादनाने प्रभावित असल्यामुळे हे उपजत नाही. अनेक भये ही संपादित असतात. त्याप्रमाणे चालणे, उभे राहणे, सरपटणे अशा अनेक कियाही कमावलेल्या असतात. मानवशास्त्रज्ञांनीही जगभरची अनेक उदाहरणे देऊन हे दाखवून दिले आहे की, माणसांचे वर्तन आणि उर्मी ह्या माणसे ज्या वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीत राहतात, त्याप्रमाणेच वेगवेगळी असतात. काही जमातींत आईवडिलांना आपल्या मुलांबद्दल प्रेम नसते काही जमाती अशाही आहेत की, जिथे मुलांना आपले आईवडील कोण हे माहीत नसते. कुटुंबात मुले जास्त झाली, म्हणून एखादे मूल मारून टाकणारे लोकही आहेत. त्यामुळे आईवडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटणारे प्रेम हे काही सहजप्रेरणात्मक नाही, असे मानवशास्त्रज्ञ म्हणतात. तसेच काही आदिम जमातींत युद्धप्रवृत्ती नसते. युद्ध करण्याऐवजी आपल्यातले वाद ते सामंजस्याने सोडवतात. त्यामुळे युद्घप्रवणता अशी काही सहजप्रेरणा मानता येत नाही, असेही दाखवून देण्यात आले आहे. उपजत अशा काही प्रेरणा असतील आणि त्यांतून सापेक्षतः अपरिवर्तनीय आणि सार्विक (युनिव्हर्सल) असे वर्तन जीवांकडून घडून येत असेल, तर माणसाच्या वर्तनाबाबत सहजप्रेरणा ही संज्ञा वापरणे अवघड होईल कारण माणसाचे वर्तन बदलते असते एकाच प्रकारचे नसते. सहजप्रेरणा ह्या संज्ञेचा वापर आता मानसशास्त्रज्ञ फारसा करीत नाहीत.

मॅक्डूगलने बोधन, भावना आणि कृती ह्या सहजप्रेरणेच्या तीन पैलूंमधील विभेदरेषा काहीशा अधिकच स्पष्ट ठेवल्या आहेत. वस्तुतः हे तीनही पैलू एकाच प्रकियेचे भाग आहेत.

फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ आंरी बेर्गसाँ (१८५९-१९४१) ह्याने सहजप्रेरणा ही शक्ति-बुद्धीप्रमाणेच उत्कांतीच्या ओघात विकसित झाली असे प्रतिपादले. त्याच्या मते बुद्धी माणसाकडे आली, तर सहजप्रेरणेचा उत्कर्ष कीटकांत झाला सहजप्रेरणेच्या आधारे कीटक आश्चर्यकारक गोष्टी करतात सहजप्रेरणेला होणारे ज्ञान आंतरिक असते वस्तूंशी तादात्म्य पावून ती ज्ञान प्राप्त करून घेते पण तिचे ज्ञान आवश्यक त्या कृतीपुरतेच असते.

कुलकर्णी, अ. र.