सस्कॅचेवन नदी : कॅनडाच्या दक्षिण भागातील ॲल्बर्टा, सस्कॅचेवन व मॅनिटोबा प्रांतांतून, पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी सर्वांत मोठी नदी. लांबी सु. १,९३९ किमी. ॲल्बर्टा प्रांतातील रॉकी पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर उगम पावणारे नॉर्थ सस्कॅचेवन ( लांबी सु. १,२८७ किमी.) व साउथ सस्कॅचेवन ( सु. १,३९२ किमी.) हे या नदीचे प्रमुख दोन शीर्षप्रवाह असून ते सस्कॅचेवन प्रांतातील प्रिन्स ॲल्बर्ट शहराच्या पूर्वेस सु. ४० किमी.वर एकत्र मिळतात. हा संयुक्त प्रवाह पुढे सस्कॅचेवन या नावाने पूर्वेस सु. ५५० किमी. वहात जाऊन मॅनिटोबा प्रांतातील विनिपेग सरोवरास मिळतो. साउथ सस्कॅचेवन नदीचा शीर्षप्रवाह बो रिव्हर या नावाने ओळखला जातो. या प्रवाहाच्या उगमापासून सस्कॅचेवन नदीची एकूण लांबी गृहीत धरली जाते. या नदीला एकूण ३,८३,००० चौ. किमी. प्रदेशातून पाणीपुरवठा होतो.
‘जलद प्रवाह ’ या अर्थाच्या ‘ सस्कॅचेवन ’ या की अमेरिकन-इंडियन शब्दावरून नदीला हे नाव पडले. १६९० मध्ये हडसन्स बे कंपनीतील हेन्री केल्सी याने हिचा प्रथम शोध घेतला परंतु ला व्हेरांद्री याने १७४१ मध्ये तिच्या शीर्षप्रवाहाचा शोध घेईपर्यंत सस्कॅचेवनचे समन्वेषण झाले नव्हते. त्यानंतर फरचा व्यापारमार्ग म्हणून ही नदी प्रसिद्ध झाली. नॉर्थ सस्कॅचेवनच्या बॅझू, क्लीअरवॉटर, व्हर्मिलियन आणि बॅटल, तर साउथ सस्कॅचेवनच्या बो, ओल्डमन, रेड डिअर या प्रमुख उपनदया आहेत. सांप्रत जलवाहतुकीपेक्षाही वीजनिर्मिती व जलसिंचन यांसाठी हिचा व हिच्या शीर्षप्रवाहांचा, तसेच उपनदयांचा मोठया प्रमाणात उपयोग करून घेण्यात आला आहे. त्यासाठी या नदीवर, हिच्या शीर्षप्रवाहांवर तसेच उपनदयांवर अनेक धरणे बांधण्यात आली आहेत. त्यांपैकी सस्कॅचेवन प्रांतातील सॅस्काटूनच्या दक्षिणेस बांधण्यात आलेले गार्डिनर धरण सर्वांत मोठे असून त्यामुळे डायफेनबेकर सरोवर निर्माण झाले आहे. या नदीवरील प्रकल्पांमुळे सु. ४,००,००० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. नदीखोऱ्यातील प्रदेश गवताळ प्रेअरी प्रकारचा असून शेतजमिनीतून गहू, ओट, बार्ली इ. पिके मोठया प्रमाणात घेतली जातात. एडमंटन, कॅल्गारी, लेथबिज, रेड डिअर, मेडिसिन हॅट, ड्रमहेलर, सॅस्काटून, प्रिन्स ॲल्बर्ट इ. या नदीवरील व तिच्या उपनदयांवरील प्रमुख शहरे आहेत.
चौंडे मा. ल.