सवय : नियमितपणे पुनरावृत्त होत राहणाऱ्या वर्तनास सवय म्हटले जाते. त्याला निश्चित अशी विचारांची पार्श्वभूमी नसते. ती सहजप्रवृत्ती असते. उदा., एखादा माणूस एखादया स्त्रीला भेटायला गेल्यानंतर आपली हॅट काढून ठेवतो. हे नियमितपणे घडू लागले की, त्या माणसाला स्त्रियांच्या उपस्थितीत आपली हॅट काढून ठेवण्याची सवय आहे, असे म्हटले जाते. सवयींचा आवाका मोठा असून तिचे बरे-वाईट अनेक प्रकार आढळतात. खाणे, निजणे, विविध कामे शिकणे, अशा अनेक क्रियांपासून ते विचार करणे, विशिष्ट प्रकारच्या चेतकांना विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया देणे, येथपर्यंत सवयी आपला प्रभाव ठेवत असतात. पुनरावृत्तीमुळे आणि प्रबलनामुळेही ( रीइन्फोर्स्मेंट ) सवयी दृढ होत असतात. प्रबलक (रीइन्फोर्सर) हा सवयीची पुनरावृत्ती घडवून आणतो. उदा., आपला अभ्यास पूर्ण केला की, दूरदर्शनवरील आवडता कार्यक्रम पहायला मिळतो, असे सुसंगतपणे लक्षात आले की, विशिष्ट वेळेत अभ्यास करण्याची सवय मुलाला लागते. येथे दूरदर्शनवरील कार्यक्रम हा प्रबलक होय. ह्या सवयींचा आविष्कार घडविणारे वर्तन प्रत्येक पुनरावृत्तीबरोबर अधिकाधिक स्वयंचलित होत जाते. ते जणू काही अनैच्छिकपणे घडते आहे, असे वाटते. उदा., पहाटे उठण्याची सवय.
सवय ही एक संकल्पना आहे वस्तू नाही. त्यामुळे तिचा प्रत्यय आपल्याला तिच्या आविष्कारातूनच येऊ शकतो. शिवाय एखादया सवयीच्या आविष्काराचे तपशील प्रसंगानुरूप काही प्रमाणात बदलू शकतील. उदा., एखादया मनुष्याला आपल्या कार्यालयातून घरी जाताना एका विशिष्ट रस्त्यानेच चालत जाण्याची सवय आहे तथापि प्रसंगानुरूप तो त्या रस्त्याने मंद वा जलद गतीने जाईल किंवा धावेलही.
ज्ञानप्रक्रियेशी सवयींचा महत्त्वाचा संबंध असतो. ज्ञानप्रक्रिया ही धिम्या गतीने चालते आणि सवयीही हळूहळू प्रस्थापित होतात. मात्र अगदी मूलभूत अर्थाने विचार केल्यास, ज्ञान एकाच अनुभवातून वा प्रयत्नातून प्राप्त होऊ शकते, असाही एक पर्यायी विचार मांडला जातो. तो मांडणाऱ्यांचे म्हणणे असे की, ज्ञान मिळविताना एकच सवय नव्हे, तर अनेक लहान लहान सवयींचा समूह कार्यरत असतो. ज्ञान मिळविताना अगदी आरंभी ज्या सवयी आवश्यक असतात, त्या एकाच वेगाने आत्मसात होत नाहीत, तर त्या सर्व प्राप्त होण्यास बराचसा वेळ जातो. त्यामुळे ज्ञानप्रक्रियेची गती धिमी असल्याचा प्रत्यय येतो. काही सवयी एकेक अवस्था पार करीत विकसित होतात. टंकलेखनाची सवय होण्यासाठी आधी टंक-लेखन यंत्रात बसविलेल्या अक्षरांवर नेमके बोट पडण्याची सवय करावी लागते.
सवयी ज्यांच्याममुळे दृढ होतात, ते प्रबलक आणि पुनरावृत्ती ह्यांच्या संदर्भांतील परिस्थितीवर सवयीच्या बलाचा कमीजास्तपणा अवलंबून असतो. ज्या सवयी खूप बळकट असतात, त्यांची वैशिष्ट्ये-उदा., अचूकपणा, चिवटपणा यांच्याशी निगडित असणाऱ्या चेतकांना त्वरित प्रतिसाद-त्यांच्या आविष्कारांतून लक्षणीयपणे प्रकट होतात.
सवयी एकदा पक्क्या झाल्या की, त्या सहजप्रेरणांसारख्या होतात. त्यामुळे सवय आणि सहजप्रेरणा यांतील विभेदरेषा नेहमीच स्पष्ट नसते. काही काही सवयी इतक्या बळकट होतात की, त्यांच्यामागे कधी काळी असलेला हेतू मागे पडून त्या स्वत:च एक साध्य बनतात. उदा., आर्थिक सुरक्षेसाठी पैशांची बचत करणारा माणूस आवश्यक तेवढी पुंजी साठविल्यानंतरही एक सवय म्हणून पैसे साठवीतच राहतो.
सवयींना आपल्या जीवनात खूप महत्त्व असते. एक तर ज्या कृती आपण सवयीने करतो, त्या आपल्याकडून सहजपणे आणि अगदी कमी वेळात होतात त्या अचूकही होतात. सवयींच्या कृती करताना आपल्याला त्यांच्याबद्दल फारसा विचार करावा लागत नाही. त्या जवळपास यांत्रिकपणेच होतात. त्यामुळे सवयींची कृती करीत असताना दुसरी एखादी कृतीही करता येते. पुष्कळ स्त्रिया एकीकडे विणकाम करीत असताना एकही टाका न चुकविता वाचनही करू शकतात. काही गोष्टी सवयीच्या आधीन झाल्या की, त्या स्वयंचलितपणे होत राहतात आणि इतर काही गोष्टी करायला वेळ मिळतो. एरव्ही केव्हा उठायचे, केव्हा निजायचे, दिनक्रम नेमका कसा ठेवायचा, ह्यांबाबत विचार करण्यात वेळ वाया जाऊन असे प्रश्न अनिर्णितच राहतात.
दृढ झालेल्या सर्वच सवयी इष्ट नसतात. त्यामुळे अनिष्ट सवयी प्रयत्नपूर्वक मोडाव्या लागतात. त्यांसाठी सामान्यत: पुढील पद्धती वापरल्या जातात : (१) जुन्या प्रतिसादाच्या जागी नवा प्रतिसाद निर्माण करणे. उदा., सारखे गोड खावेसे वाटण्याच्या भावनेला चॉकलेट खाऊन प्रतिसाद देण्याऐवजी मधुर फळे खाऊन तो देणे आणि चॉकलेट खाण्याची सवय मोडणे. (२) अनिष्ट प्रतिसाद थकेपर्यंत, कंटाळा येईपर्यंत देत राहणे.उदा., धूमपानाची तीव्र इच्छा होताच न थांबता सारखी सिगारेट ओढत राहणे. कुठल्या तरी क्षणी ते करून थकवा येतो वीट येतो. ह्यातून सिगारेट पाहिल्यावर ती ओढावीशी वाटण्याऐवजी तिची शिसारी येऊ लागते व धूमपानाची सवय सुटते. (३) आसमंत बदलणे-अनिष्ट प्रतिसादाच्या संदर्भापासून स्वत:ला वेगळे करणे. ह्या पद्धतीत अडचणी आहेत. उदा., धूमपानाची सवय मोडण्यासाठी धूमपान न करणाऱ्या एखादया कुटुंबात काही दिवस राहिल्याने धूमपानाचा प्रतिसाद निर्माण करणारा केवळ एक संदर्भ नाहीसा होईल पण ती इच्छा अनेक कारणांमुळे होऊ शकते. उदा., तंबाखूचा वास आणि दर्शन, जेवण झाल्यानंतरची मानसिक अवस्था, एखादया पार्टीला जाणे, पत्ते खेळायला बसणे इत्यादींशी धूमपानाच्या इच्छेचे साहचर्य असते. (४) सहनशक्ती ठेवणे- ह्या पद्धतीत अनिष्ट सवयीची प्रतिक्रिया निर्माण करणारा चेतक हळूहळू निर्माण करीत अखेरीस त्याच्या पूर्ण शक्तीनिशी जेव्हा उभा केला जातो, तेव्हा नको असलेली प्रतिक्रिया नाहीशी झालेली असते कारण तो चेतक धिम्या गतीने निर्माण होत असताना आपली सोशिकताही हळूहळू वाढत असते. उदा., एखादया मुलाला मांजर पाहताक्षणी भीती वाटते. ही सवय घालविण्यासाठी त्याला मांजराचे पिलू दयायचे कारण पूर्ण वाढीच्या मांजराऐवजी ते मूल पिलू स्वीकारण्याचा संभव बराच असतो. त्या पिलाच्या सहवासात ते मूल असताना ते पिलू हळूहळू मोठे होत जाते आणि त्याच्याबद्दलच्या त्या मुलाच्या भावनाही अधिक सकारात्मक होत जातात मांजराची भीती निघून जाते. (५) शासन किंवा दंड करणे-जी बहुतकरून कमीत कमी परिणामकारक पद्धती होय.
कुलकर्णी, अ. र.