संघमित्रा : ( इ. स. पू. तिसरे-दुसरे शतक ). सम्राट अशोकास त्याची पहिली राणी शाक्यकुमारी हिच्यापासून झालेली ज्येष्ठ कन्या. तिच्याविषयीची माहिती बौद्ध साहित्यातून, विशेषत: महावंस, दीपवंस, दिव्यावदान या गंथांतून,तसेच चिनी प्रवासी ⇨ह्यूएनत्संग याच्या प्रवासवर्णनातून व बौद्धांच्या स्थविरवादी परंपरांतून मिळते. भारतात आणि भारताबाहेर बौद्धधर्मप्रसारासाठी प्रचारक पाठविण्याचे ठरविल्यानंतर सम्राट अशोकाने [→ अशोक-२] आपला पुत्र ⇨ महेंद्र (महिंद ) ह्याला सिंहलद्वीपास ( श्रीलंकेस ) त्या कामगिरीवर पाठविले. तेथे स्त्रियांना धार्मिक दीक्षा देण्यासाठी महेंद्राच्या विनंतीनुसार संघमित्रा गेली. जाताना तिने ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला गया येथे परमज्ञान प्राप्त झाले, त्याची एक फांदी बरोबर नेली होती. सिंहलव्दिपाची प्राचीन राजधानी ⇨ अनुराधपुर येथे त्या फांदीचे रोपण करण्यात आले, अशी एक आख्यायिका आहे. त्यातून वाढलेला वृक्ष आजही तेथे आहे, अशी भाविक बौद्धांची श्रद्धा असून तो वृक्ष बौद्धांचे पूजास्थान बनलेला आहे. त्या दोघांच्या प्रयत्नांमुळे अनेक स्त्री-पुरूषांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि संघात अनेक लोक प्रविष्ट झाले. सिंहलव्दिपातील अनुला या राजकन्येने पाचशे महिलांसह संघमित्राकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. संपूर्ण सिंहलव्दिपात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे श्रेय महिंद्राप्रमाणेच संघमित्राकडेही जाते.
बापट, पु. वि.