संगमेश्वर : महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहास-प्रसिद्ध स्थळ. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हे ठिकाण रत्नागिरीच्या ईशान्येस सु. ३० किमी.वर शास्त्री नदीकाठी वसले आहे. लोकसंख्या कसबा व नावडी मिळून ६,६०७ (२००१). पूर्वी येथून रत्नागिरीपर्यंत बोटीने जाता येत होते. १८७८ मध्ये येथील शासकीय कार्यालये आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, तेव्हा ती देवरूख येथे हलविण्यात आली. शास्त्री नदीच्या खोऱ्यातील जमीन सुपीक असल्याने संगमेश्वराच्या परिसरात भात व कडधान्ये ही पिके चांगली येतात. येथे खारवलेल्या माशांचा व्यापार मोठया प्रमाणावर चालतो. तालुक्यात उष्ण पाण्याचे झरे आहेत त्यामुळे पर्यटकांची येथे वर्दळ असते. छत्रपती संभाजी महाराजांना येथील धूतपापतीर्थ येथे कवी कलशासह मुक्कामी असताना मोगलांनी पकडले होते.
स्कंदपुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये संगमेश्वरचा उल्लेख रामक्षेत्र असा केला असून येथे परशुरामाने (भार्गवरामाने) अनेक मंदिरे बांधली, असे म्हटले आहे. इ. स. सातव्या शतकात येथे चालुक्य घराण्यातील कर्ण राजाची राजधानी होती, त्याने येथे एक किल्ला व काही मंदिरे बांधली, असा उल्लेख मिळतो. त्यांपैकी कर्णेश्वर हे मंदिर अवशिष्ट आहे. वीरशैव पंथाचे प्रवर्तक बसवेश्वर (११३१-६७) यांचे काही काळ येथे वास्तव्य होते.
देशपांडे, सु. र.