सर्मा, बेणुधर : (१६ नोव्हेंबर १८९४-१९८१). असमिया इतिहास-संशोधक व गदय-शैलीकार लेखक. चारिंग (जि. सिबसागर ) येथे एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. कलकत्ता येथील बंगबासी महाविदयालयात शिक्षण. महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकारितेच्या आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले व पदवी घेता आली नाही. १९२०-२१ व १९३०-३१ सालच्या दोन राष्ट्रीय आंदोलनांत त्यांनी भाग घेतला व त्याबद्दल त्यांना कारावासही भोगावा लागला. त्यांनी १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात दै. बातारीच्या संपादकपदावर काम केले. तसेच तरूण आसाम ह्या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. धुब्री येथे भरलेल्या ‘आसाम साहित्य सभे’च्या पंचविसाव्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले (१९५६). बेणुधर सर्मा यांची वाङ्मयीन कामगिरी इतिहासकार, चरित्रलेखक व बालसाहित्यकार अशी त्रिविध स्वरूपाची आहे. आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीची सुरूवात त्यांनी रॉबिन्सन कुसो चे असमिया भाषांतर, एका मित्रासमवेत करून, केली (१९१८). डॉ. जे. पी. वेड यांचा ॲन अकाउंट ऑफ आसाम हिस्टरी (१७९३-९४) हा इंग्रजी गंथ बेणुधर सर्मांनी संपादित व प्रकाशित केला (१९२७). तत्कालीन नियतकालिकांतून त्यांनी अनेक ऐतिहासिक लेख लिहिले. ते त्यांच्या सूक्ष्म व भेदक मर्मदृष्टीचे व विश्लेषक वृत्तीचे निदर्शक आहेत. ह्यांपैकी काही लेख पुढे दूरबिण (१९५१) व सतावन साल (१९४७) ह्या गंथांत समाविष्ट करण्यात आले. सतावन साल हे आसाममधील १८५७ च्या बंडावर आधारित आहे. त्यांनी सु. ६ चरित्रे लिहिली त्यांपैकी गंगागोविंद फूकन (१९४८), मणिराम दिवान (१९५०), हेमचंद्र गोस्वामी ही उल्लेखनीय आहेत. १८५७ मध्ये ब्रिटिशांविरूद्ध उठाव करणारा आसाममधील आदय कांतिकारक हुतात्मा मणिराम दिवान याचे ऐतिहासिक चरित्र संशोधनात्मक ऐतिहासिक पुराव्यांमुळे विशेष लक्षणीय ठरले. अर्वाचीन असमिया साहित्याचे जनक हेमचंद्र गोस्वामी यांच्या जीवनाचा व वाङ्मयीन कारकीर्दीचा आढावा घेणारे त्यांचे चरित्रही उल्लेखनीय आहे. अर्घ्यावली (१९६७) हा त्यांनी लिहिलेल्या चरित्रलेखांचा संग्रह आहे. बेणुधर सर्मांच्या काँगेसर काचियाली शदत (१९५९) ह्या गंथाला साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला (१९६०). काँगेसच्या प्रारंभीच्या चळवळीचा आसाममधील ग्रामीण जनजीवनावर जो प्रभाव पडला, त्याचे अतिशय रोचक संस्मरणीय शैलीतील वर्णन ह्या गंथात आहे. त्यांचे दखिनपत सत्रार बुरंजी (१९६८) हे वैष्णव पंथाच्या इतिहासाविषयीचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक असून, त्यात इतिहासाबरोबरच मध्ययुगीन आसामच्या समृद्घ सांस्कृतिक वारशाचेही दर्शन घडते.
बेणुधर सर्मा यांनी आसाममधील ऐतिहासिक साधनांचा धांडोळा घेऊन अनेक अज्ञात ऐतिहासिक घटना उजेडात आणल्या आणि आहोम राजे, सेनापती, राजकन्या यांची व्यक्तिचित्रे, तसेच ऐतिहासिक घटना-घडामोडी मनोवेधक शैलीत प्रसिद्घ केल्या तथापि त्यांच्या ऐतिहासिक अनुमानांविषयी-अन्वयार्थांविषयी इतिहासकारांत मतभेद आहेत. त्यांचे रांगपता (१९४९) हे बालकथांचे पुस्तक विशुद्ध व प्रवाही भाषाशैलीसाठी प्रसिद्ध आहे. देशद्रोही कोन, पूर्णानंद ने बदन ही त्यांची अन्य पुस्तकेही उल्लेखनीय आहेत. आसामच्या मध्ययुगीन इतिहासातील काही व्यक्ती व घटना ह्यांचे सूक्ष्म, मर्मभेदक विश्लेषण व मूल्यमापन करणारे इतिहास-संशोधक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांची गदयशैली आकर्षक, प्रवाही व वाक्प्रचारयुक्त असून दैनंदिन बोलीभाषेतील सुभाषिते व म्हणी यांचा समर्पक व प्रभावी वापर त्यांच्या एकूण लिखाणात आढळतो. एक श्रेष्ठ गदय शैलीकार म्हणून असमिया साहित्यात त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना पद्मभूषण हा किताब मरणोत्तर बहाल करण्यात आला (१९८३).
इनामदार, श्री. दे.