संरक्षण मानसिकता : संरक्षण याचा अर्थ प्रतिरक्षा, शत्रूचा प्रतिकार करण्याची शक्ती वापरून स्वत:ला सुरक्षित ठेवणे. व्यक्ती असो वा राष्ट्र-राज्य यांना स्वसंरक्षणाची गरज भासते आणि त्या गरजेच्या स्वरूपावरून त्या त्या समूहाची, राष्ट्राची संरक्षण मानसिकता निर्माण होते. राष्ट्रांचा मूळ विचार स्वत:चे संरक्षण स्वत:च्या ताकदीवर करण्याचा असतो पण अनेकदा परिस्थिती, भौगोलिक स्थान, तंत्रज्ञान अशा अनेक घटनांमुळे हे शक्य होत नाही. याचे परिणाम त्या त्या राष्ट्रातल्या जनतेच्या मानसिकतेवर होतात. यातून जे समूहमानस (ग्रूप माइन्ड) तयार होते, त्याला संरक्षण मनोविज्ञान असे म्हटले जाते.
राष्ट्र-राज्य या संस्थेच्या उदयांनंतर विसाव्या शतकाने दोन महायुद्धे पाहिली. यांतल्या दुसऱ्या महायुद्धाने सर्वंकष युद्ध ही संकल्पना रूजवली. आता दोन राष्ट्रांमधील युद्ध म्हणजे फक्त युद्धभूमीवरील सैनिकांची लढाई असे न राहाता राष्ट्राचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक घटक युद्धांत परोक्ष-अपरोक्ष सहभागी होणे अनिवार्य झाले. याचे खोलवर परिणाम संरक्षण मानसिकतेवर झाले आहेत.
जर शक्य असेल, तर राष्ट्र अशा प्रकारे स्वत:ची संरक्षणव्यवस्था उभी करेल, की कुठल्याही संभाव्य शत्रूला वाकडा डोळा करून पाहाण्याची हिंमतच होणार नाही. संरक्षण धोरण, परराष्ट्र-संबंध, संरक्षण दले, तंत्रज्ञान, कारखानदारी, अन्न-इंधन-कच्च्या मालाचा पुरवठा, हेरव्यवस्था अशा असंख्य घटकांमधून हे साधले जाईल. अशी व्यवस्था उभी राहिल्यास त्या त्या राष्ट्रांमधील नागरिक स्वत:ला नेहमीच संपूर्ण सुरक्षित मानतील.
हे जर शक्य नसेल, तर सत्तेचा समतोल राखणे असा मार्ग चोखाळला जातो. दोन किंवा जास्त राष्ट्रांमध्ये परस्पर-करार करून कुठलेही एक राष्ट्र अरेरावी करू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली जाते. एखादे राष्ट्र अती बलवान होऊन इतर राष्ट्रांचे अस्तित्व धोक्यात आणणार नाही, यासाठी अशा सत्तेचा समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही व्यवस्था टिकते तोपर्यंत बलवान राष्ट्र युद्ध सहसा सुरू करत नाही. संरक्षण मानसिकता टिकते मात्र यातली घटक-राष्ट्रे, आघाडया परिस्थित्यनुसार बदलत राहतात. याचा एक ताण त्या मानसिकतेवर असतो.
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी रशियात एका सर्वव्यापी तत्त्वज्ञानावर आधारित शासनव्यवस्था आली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जग रशिया + मित्रराष्ट्रे विरूद्ध अमेरिका + मित्रराष्ट्रे असे विभागले गेले. दोन्ही गटांनी आपली संरक्षणव्यवस्था, धोरण हे व्यापक पायावर परस्परसंबद्ध केले. त्या त्या गटातल्या राष्ट्रांवर, त्यांच्या संरक्षण मानसिकतेवर याचे परिणाम झाले आहेत.
या व्यवस्थेला पर्याय म्हणून कुठल्याच गटात सामील न होणे, असे धोरण ‘ तटस्थ ’ या नावाखाली नवस्वतंत्र राष्ट्रांपैकी काहींनी स्वीकारले आणि हे धोरण अनुसरणारा एक स्वतंत्र गटही बांधण्याचा प्रयत्न झाला मात्र या पर्यायाचा फार मोठा परिणाम संरक्षण मानसिकतेवर झाला नाही.
संरक्षण या संकल्पनेतच संरक्षण सिद्धतेला प्राधान्य असते. प्रचंड लष्करी सामर्थ्य जमा करून त्याचे प्रदर्शन घडवत राहिल्याने संभाव्य शत्रू दु:साहस करण्यास धजणार नाही, अशी ही मानसिकता आहे. मात्र अशाच मानसिकते-मध्ये संभाव्य शत्रूही असल्यास दोन्ही बाजू शक्ति-संकलन व प्रदर्शनाच्या स्पर्धेत उतरतात. या स्पर्धेतून सतत दुसरी बाजू वरचढ तर होत नाहीना, अशी एक प्रकारची सतत अविश्वास-असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
संरक्षण सिद्घता, संरक्षण मानस हे अशा प्रकारे मानसिक असुरक्षिततेच्या भावनेशी सतत संबंध ठेवून असतात व परस्परांवर परिणाम घडवतात. राष्ट्रांच्या व्यवहारात स्वयंसिद्धता, सत्तेचा समतोल आणि गट करणे, असे सर्व घटक एकत्रही असू शकतात.
आधुनिक जगात आर्थिक, ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, शिक्षण, समरभूमी, संदेशवहन अशा अनेकानेक क्षेत्रांत समर्थ व संपन्न राष्ट्रांचे नागरिकही असुरक्षिततेची भावना अनुभवत आहेत. एक प्रकारे वैयक्तिक व सामूहिक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे व/वा मुद्दाम निर्माण केले जात आहे. सर्वच समाज, त्यांतले थर, वर्ग स्वत:ला असुरक्षित मानत आहेत. अशा वेळी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.
असे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यामागे दुर्बळ राज्यव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञानातून मिळणारी नवनवी साधने असे अनेक घटक आहेत. यांचे परिणामही असाहाय्यतेचे मानस निर्माण करू शकतात. असा व्यापक पट संरक्षण मानसिकतेमागे आहे.
दांडेकर, विश्वास