संभ्रमकारके : जागृत अवस्थेत आसपासच्या वास्तवाची  जाणीव बदलून बाह्य संवेदनाच्या अनुपस्थितीत आभासी संवेदन निर्माण करणाऱ्या द्रव्यांना संभ्रमकारके म्हणतात. ही द्रव्ये संवेदनातील बदलाबरोबरच व्यक्तीची मनःस्थिती, विचारप्रक्रिया आणि वर्तन यांच्यावरही  परिणाम करतात. त्यांच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक अवस्थांचा विचार करून अनेक अभ्यासकांनी त्यांना मनोविस्फारक, मनोदुर्दशा  किंवा मनोविकृती अनुकारक अथवा मनोविकृतिजनक अशी विविध नावे  दिली आहेत. जगातील सर्व संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्ये अशा द्रव्यांचा उपयोग प्राचीन काळापासून गूढ, धार्मिक अनुभूती निर्माण करण्यासाठी केला गेला आहे. १९४३ साली एलएसडी (लायसर्जिक ॲसिड डाय-एथिलअमाइड) हे संश्लेषणजन्य शुद्ध स्वरूपातील संभ्रमकारक उपलब्ध झाल्यापासून अशा प्रकारच्या औषधी द्रव्यांच्या अभ्यासास चालना मिळाली.

औषधोपचारासाठी वापरलेल्या काही द्रव्यांमुळे संभ्रमकारकांसारखा परिणाम कधीकधी निर्माण होतो परंतु तो प्रमाणाबाहेर दिलेल्या मात्रेची विषाक्तता दर्शविणाऱ्या मनोदुर्दशेचाच एक भाग असतो. उदा., ॲट्रोपीन किंवा हायोसायमीन, मॉर्फीन आणि अफूपासून मिळणारी इतर द्रव्ये. अशा औषधांचे मानसिक परिणाम गोंधळ व संवेदनांची अस्पष्टता किंवा लोप  यांमुळे फारसे सुखद नसतात. तसेच शारीरिक दुष्परिणाम धोकादायक असतात. त्यामुळे त्यांचा जाणूनबुजून वापर होण्याची शक्यता कमी  असते. ‘विषाक्त संभ्रमकारके’ असा त्यांचा उल्लेख केला जातो.

याउलट खरी वा अस्सल संभ्रमकारके जाणिवेच्या पातळीत फारसा बदल घडवीत नाहीत संवेदनांच्या जाणिवेतील तीव्रता काहीशी वाढले-लीच असते आत प्रवेश करणाऱ्या संवेदनांवरील नियंत्रण कमी होते ध्वनी, प्रकाश, गंध यांसारख्या निराळ्या प्रकारांमधील फरक नाहीसा होऊन त्यांचे एकमेकांच्या संदर्भात अर्थ लावले जातात (जसे ‘श्वेत संगीत’, ‘गोड रंगसंगती’) मानवजाती किंवा विश्व यांच्याशी आपण एकात्म आहोत, अशी अनुभूती व्यक्तीला होते. उत्कट अशा धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुभूतीशी ती समतुल्य असते.

रासायनिक संरचना व नैसर्गिक उपलब्धतेचे स्रोत किंवा संश्लेषण-जन्यता यांच्या बाबतीत संभ्रमकारकांमध्ये बरीच विविधता आढळते. मान-सिक परिणामही निरनिराळ्या तीव्रतांचे व प्रकारांचे असू शकतात. त्यामुळे त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केवळ स्थूलमानाने करणेच सोयीस्कर ठरेल : (१) लायसर्जिक ॲसिड डायएथिलअमाइड (एलएसडी) हे मानवनिर्मित द्रव्य त्याच्यासारखाच परिणाम घडविणारी मेक्सिकन अळिंबीपासून (भूछत्र्यांपासून) मिळणारी सायलोसायबिन व सायलोसिन सायलोसाइब, पेओट या मेक्सिकन निवडुंगापासून मिळणारे मेस्कलीन इपोमिया व्हायोलासी च्या बियांमधील लायसर्जिक ॲसिड अमाइड. (२) अँफेटामीन या अनुकंपी अनुकारक द्रव्याशी (झोप व भूक यांवर अनिष्ट परिणाम करणारे) रासायनिक साम्य असलेली डायमिथॉक्सी अँफेटामीन (डीओएम), डायमिथॉक्सी मेथ्अँफेटामीन (डीएमए), मिथिओनीन डायऑक्सी  अँफेटामीन (एमडीए), मेंदूत आढळणाऱ्या सिरोटोनीन या द्रव्याशी साम्य असलेले डायमिथिल ट्रिप्टामीन (डीएमटी). (३) कॅनाबिस (गांजा) वनस्पतीपासून मिळणाऱ्या चरस (हशिश), भांग, गांजा इ. पदार्थां-मधील टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (टीएचसी) सारखी संयुगे. (४) भूल देण्यासाठी  विकसित केलेली, परंतु त्या क्षेत्रात निरूपयोगी ठरलेली फेनसायक्लिडीन (पीसीपी) व केटामिनासारखी औषधे, ॲट्रोपिनाप्रमाणे कोलीनरोधी क्रिया असलेले डायट्रान. (५) नैसर्गिक रीत्या आढळणारी इतर द्रव्ये, उदा., जायफळ (मिरिस्टिसीन), दक्षिण अमेरिकन वेल हार्माला (हार्मालीन),  बेडकाची त्वचा व लाला गंथी (ब्युफोटेनीन).

एलएसडी हे रसायन स्वित्झर्लंडमध्ये ⇨अरगट मधील अल्कलॉइड (अल्काभ) द्रव्यांपासून गर्भाशयसंकोची औषधांचा शोध घेत असताना आल्बर्ट होफमान यांना योगायोगाने प्राप्त झाले. त्याचा संभ्रमकारक परिणाम २५ ते ५० मायकोगॅम इतक्या अत्यल्प मात्रेने होऊ शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. या द्रव्याचा कोणताही उपचारात्मक उपयोग नसल्यामुळे बेकायदेशीरपणे त्याची निर्मिती व दुरूपयोग सुरू राहिला. इतर सर्व संभ्रमकारकांचा मापदंड म्हणून त्याच्या परिणामाचा अभ्यासही विस्ताराने झालेला आहे.

मेंदूच्या ऊतकांमधील (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका-समूहांमधील-पेशीसमूहांमधील) सिरोटोनीन (५- हायड्रॉक्सि-ट्रिप्टा-मीन ५HT) निर्माण करणाऱ्या कोशिकांचे कार्य आणि सिरोटोनिनाची इतर कोशिकांवर होणारी क्रिया यांमध्ये बाधा आणून एलएसडी आपला परिणाम घडविते. त्याच्या प्रभावामुळे सुखभम, अत्यानंदी वृत्ती, स्थलकालाचे भान हरपणे, रंगांची संवेदना अधिक भडकपणे जाणवणे, स्पर्श व गंधाची अधिक उत्कट अनुभूती यांसारखे परिणाम त्वरित निर्माण होतात. दोन-तीन तासांनंतर मानसिक बदलाप्रमाणेच शारीरिक क्रियांमध्येही बदल घडतात. विशेषतः अधिक मात्रेमुळे स्नायूंमध्ये अशक्तता जाणवणे, रक्तदाब व नाडीचा वेग वाढणे, तापमानात वाढ यांसारखे अनुकंपी तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) उत्तेजनाचे परिणाम जाणवतात. [→ तंत्रिका तंत्र].

काही वेळानंतर सुखद परिणामांच्या ऐवजी चिंतातुरता, घबराट, रडू  कोसळणे, मनोवृत्ती क्षणोक्षणी बदलत राहणे असा अनुभव येऊ शकतो. चार-पाच तासांनी हे सर्व ओसरून व्यक्तीचे विचार व वर्तन यांत अलिप्तपणा येतो. व्यक्तिमत्त्व फार बदललेले आढळते. सुमारे बारा तासांनी परिणाम पूर्ण ओसरून कोणताही कायम स्वरूपाचा बदल टिकत नाही. आपण एका इंद्रियातीत अनुभवातून गेलो होतो, अशी आठवण शिल्ल्क राहते. तीन-चार दैनंदिन मात्रांनंतर सह्यता निर्माण झाल्यामुळे परिणाम कमी होऊ लागतो. शारीरिक परिणामांना तितकीशी सह्यता निर्माण होत नाही. शारीरिक व  मानसिक अवलंबित्व नसल्याने व्यसनाची शक्यता नसते.

एलएसडीमुळे काही व्यक्तींमध्ये दुःखद परिणामांची स्मृती प्रकर्षाने टिकते (वाईट सफर). तसेच मानसिक अवसादन, छिन्नमनस्कता यांसारख्या मनोविकारांचा उद्भव होऊ शकतो. कधीकधी काही काळानंतर (किंवा वर्षानंतर) हे द्रव्य घेतलेले नसतानाही चिंतातुरतेमुळे पूर्वीचा सर्व अनुभव उफाळून येतो व क्लेशकारक ठरतो (अनुभवाची पुनरावृत्ती).

वर दिलेल्या यादीमधील सर्व संभ्रमकारकांचा परिणाम साधारणपणे एलएसडीप्रमाणेच आणि त्याच क्रियापद्धतीमुळे (सिरोटोनिनाशी संबंधित) घडून येतो. मात्र त्याची उत्कटता आणि विविधता कमी असते. तसेच अनेक द्रव्यांचे अन्नमार्गातील शोषण तितकेसे पूर्ण नसल्याने परिणाम उशिरा सुरू होतो. काहींचे सेवन धूम्रपानातून किंवा सुईने टोचून केले जाते. अँफेटामीन वर्गातील द्रव्ये सिरोटोनिनाबरोबरच इतर तंत्रिका-प्रेषकांच्या माध्यमातूनही आपला परिणाम घडवू शकतात.

पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे पेओट, मॉर्निंग ग्लोरी (निळवेल)  किंवा मेक्सिकन जादूपूर्ण भूछत्र यांचा वापर पुरातन काळापासून प्रचलित होता, तसाच उपयोग पौर्वात्यांमध्ये चरस, गांजा इत्यादींचा होत आला आहे. कॅनाबिसच्या पानांची मानसिक परिणामांसाठी उपयुक्तता सु. २,००० वर्षांपूर्वीपासून चीनमध्ये ज्ञात असावी तेथून ती भारतात व सोळाव्या शतकात यूरोपपर्यंत पोहोचली. दोरखंड, पोती इत्यादींसाठी धागा, जनावरांच्या अन्नात वापरल्या जाणाऱ्या बिया आणि तेलापासून केलेला साबण यांसारख्या उपयोगासाठी विपुल प्रमाणात ही वनस्पती वाढविली जाते. तिच्या सर्व भागांत कमी-अधिक प्रमाणात टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल हे संभ्रमकारक व त्याच्याशी साम्य असलेली इतर सु. ६० द्रव्ये आढळतात. फुले धारण करणाऱ्या शिरोभागात त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. मानसिक परिणामांसाठी उपलब्ध पदार्थ खालीलप्रमाणे आहेत :


(१) भांग : कॅनाबिसची पाने व फुले वाळवून केलेला चुरा. पेय किंवा मिठाईच्या स्वरूपात हा पदार्थ घेतला जातो. पाश्चात्त्य देशांत मारिजुहुआना  या नावाने ओळखला जाणारा व सिगारेट किंवा पाइपमधून धूम्रपानाच्या  रूपात घेतला जाणारा पदार्थ असाच असतो. यात २% टीएचसी असून एकूण द्रव्ये (कमी प्रभावकारक) ८ टक्क्यांपेक्षा कमी असतात. गास, पॉट, हर्बल कॅनाबिस इ. नावांनी हा उपलब्ध असतो. (२) गांजा : फक्त मादी वनस्पतीची फुले वापरून भांगेप्रमाणेच केलेला पदार्थ. टीएचसीचे प्रमाण  अधिक असलेली ही पूड चिलीम, पाइप इत्यादींमध्ये घालून ओढली  जाते. (३) चरस : फुले, वरच्या भागातील पाने यांच्यापासून काढलेला अर्क, काळसर रंगाचा रेझिन (राळ) रूप निःस्राव असलेला हा पदार्थ अत्यंत प्रभावकारक असून त्यात सु. १५% कॅनाबिनॉल व तत्सम द्रव्ये असतात. भांगेच्या ५-१० पट परिणाम घडविणारा आणि धूम्रपानातून सेवन होणारा हा पदार्थ मोठया प्रमाणावर चोरटया पद्धतीने विकला जातो. [→ गांजा]. (४) यांखेरीज रासायनिक कार्बनी विद्राव (विरघळविणारे पदार्थ) वापरून काढलेले ६० टक्क्यांपर्यंत कॅनाबिनाभ द्रव्ये असलेले अर्क ‘ कॅनाबिस तेल ’ या नावाने उपलब्ध असतात. त्यांचा उपयोग अत्यल्प प्रमाणात करून इतर सेवनीय पदार्थ निर्माण करतात.

कॅनाबिसच्या क्रियाशील घटकांचे अन्नमार्गातून शोषण संथ गतीने होते. त्यामुळे त्याचा वापर मुख्यतः धूम्रपानातूनच होतो. शरीरात प्रविष्ट झालेली द्रव्ये मेंदूच्या सर्व भागांत पसरतात. त्यामुळे विविध क्षेत्रांमधील तंत्रिकांच्या पटलांवर ती परिणाम घडवू शकतात. सोबत मदयपान केल्यास परिणाम अधिक तीव्र होतात. उत्सर्जनाचा वेग मंद असल्यामुळे एका मात्रे-नंतरही अनेक दिवस रक्तात व मूत्रात कॅनाबिनाभ द्रव्ये व त्यांचे चया- पचयजन्य (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून  निर्माण होणारे) पदार्थ आढळतात.

एलएसडीच्या तुलनेने कॅनाबिसचे परिणाम सौम्य म्हणता येतील. सौम्य, कमी सेवनामुळे किंवा एखादया सिगारेट वा चिलीम यांमुळे पुढील-पैकी काही परिणाम अनुभवास येतात. स्मृतीचा तात्पुरता लोप, हालचालीं-मधील अडखळलेपणा, वेळेचे भान हरपणे (भूत, भविष्य, वर्तमान यांबद्दल  गोंधळ), सुखभम, शिथिलता, झोप येणे, आपले शरीर हा भम आहे असे वाटणे, छाती धडधडणे, रक्तदाब वाढणे, डोळे लाल होणे, श्वसनमार्ग विस्फारणे परंतु श्वसनाची कार्यक्षमता घटणे, ऑक्सिजनाची गरज वाढून हृदयविकारासारखी वेदना निर्माण होणे. ह्यांपैकी बरेचसे आत्मनिष्ठ अनुभव आणि त्यांतून मिळणारा आनंद व प्रकट होणारे वर्तन यांची तीव्रता आसपासचे सहकारी, वातावरण (उदा., संगीत, वसतिस्थान)  आणि व्यक्तीच्या मनाची ठेवण यांवर अवलंबून असते. मादक पदार्थांचा वापर, पूर्वानुभव, जीवनपद्धती यांमुळेही हे अनुभव बदलू शकतात. [→ मादक पदार्थ].

मोठया मात्रेचे सेवन केल्यास संभमावस्था (आभासी संवेदन) निर्माण होऊन विसंगत विचारप्रक्रिया आणि विचित्र वर्तन यांचा आरंभ होतो. अनेकदा याच्या मुळाशी आपल्याला मुद्दाम छळण्यात येत असल्याचा व्यामोह (संभ्रम) असतो. मनोविकारांना विवश होणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅनाबिस छिन्नमनस्कतेची तात्पुरती अवस्था निर्माण करू शकते. अशा स्थितीत इतरांकडे पाठ फिरविणे, व्यामोह, वर्तनाचा विचित्रपणा इ. बदल प्रकर्षाने जाणवतात. दीर्घकाळ या द्रव्यांच्या सेवनाने इतर द्रव्यांचे व्यसन लागण्याची शक्यता वाढते. तसेच उदासीनता, स्मृतिभंश, निर्णयशीलतेचा  ऱ्हास यांसारख्या बदलांमुळे कोणत्याही कामाबद्दल प्रेरण (अभिप्रेरणा) न राहिल्यामुळे नेहमीचे सामाजिक संबंध टिकविणेही अशक्य होते.

मानसिक परिणामांच्या मानाने शारीरिक परिणाम कमी असल्यामुळे कॅनाबिसची अल्पकालिक वा दीर्घकालिक मारकता कमी असते. धूम्रपानातील टार (डांबर) याच्या अंशामुळे श्वसनी कर्करोग, रोगप्रतिकार- क्षमतेची हानी, हॉर्मोनांच्या निर्मितीमधील दोषांमुळे स्त्रीबीजे किंवा पुरूषबीजे यांची निर्मिती अनियमित होऊन वंध्यत्व, गुणसूत्रांमधील (आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून पुढील पिढीत वाहून नेणाऱ्या कोशिकेतील सुतासारख्या सूक्ष्म घटकांमधील) बदलांमुळे गर्भामध्ये व्यंगनिर्मिती, अपत्यात वर्तनदोष यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

अल्पकाळ चालणाऱ्या आणि रूग्णाचे सहकार्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने नियोजित केलेल्या शस्त्रक्रियांसाठी असंवेदनत्व (भूल) निर्माण करण्याच्या प्रयत्नात फेनसायक्लिडिनाचा शोध लागला. रूग्णाची शुद्ध अबाधित ठेवून त्याचा भोवतालच्या घटनांशी संबंध तोडू शकणारे हे असंवेदन वियोजन किंवा विदलन या नावाने ओळखले जाते. वेदनाहरण व शस्त्रकियेच्या काळातील घटनांचा स्मृतिलोप घडविणारे हे औषध नंतर संभ्रमकारक परिणाम व प्रलाप (मुग्धभांति उन्माद) यांसारखे दुष्परिणामही करू शकते. त्यामुळे ते लवकरच मानवी वैदयकातून बाद झाले व केवळ प्राणिवैदयकात वापरले गेले. त्याच वर्गातील केटामीन हे अधिक सुरक्षित द्रव्य नंतर असंवेदनत्वासाठी प्रसारात आले.

फेनसायक्लिडिनाची (एंजल डस्ट पीसीपी) अल्प मात्रा अडखळते संभाषण, अडखळत चालणे यांसारखे परिणाम घडविते. अधिक मात्रेमुळे डोळ्यांवर झापड येणे, उदासीनता, संभ्रम, वियोजन व कधीकधी आकमक वर्तन यांची निर्मिती होते. कधीकधी आकडी आल्यासारखे झटके येतात. वरचेवर घेतल्याने व्यक्तिमत्त्वात बदल घडून येऊ शकतात. कोकेनाचा सुलभ पुरवठा झाल्यामुळे फेनसायक्लिडिनाचा उपयोग मागे पडला.

डायट्रान हे द्रव्यांचे मिश्रण असून त्याला ॲट्रोपिनासारखी (बेलाडोना-पासून काढलेले अल्कलॉइड) कोलीनरोधी क्षमता असते. मेंदूतील ॲसिटिलकोलिनाच्या क्रिया रोखल्यामुळे त्याची संभ्रमकारी क्रिया होत  असावी. भयभीतता, मानसिक गोंधळ, स्थळकाळाचे भान न राहणे वगैरे दुष्परिणाम हे द्रव्य घडविते.

इतर संभ्रमकारकांमध्ये हार्मालीन, मिरिस्टिसीन, ब्युफोटेनीन यांसारखी अनेक सौम्य परिणामकारी द्रव्ये अभ्यासली गेली आहेत. सहज उपलब्ध असलेले अनेक बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारे) विद्राव पाश्चात्त्य  जगात लोकांनी वेळोवेळी आपली तल्ल्फ भागविण्यासाठी वापरल्याचे  आढळते उदा., ॲसिटोन, बेंझीन, कार्बन टेट्राक्लोराइड, टोल्यूइन, ट्रायक्लोरोएथिलीन इत्यादी. रंग, गोंदाचे काही प्रकार, व्हार्निश, नखांवरील रंग काढण्याचा द्रव, लायटरचा इंधनद्रव यांसारख्या कित्येक द्रवांचे वारंवार हुंगून सेवन करण्यामागील उद्देश क्षणिक संभ्रमकारी झिंग मिळविण्याचा असतो. या परिणामात प्रत्यक्ष रसायनाची क्रिया थोडी आणि मानसिक समाधान अधिक अशी परिस्थिती असते. व्यसनकारी औषधे आणि इतर मादक पदार्थ (उदा., मॉर्फीन, कोकेन, अल्कोहॉल, बाउनशुगर) सुखभम निर्माण करून व शारीरिक अवलंबन निर्माण करून सवय लावतात परंतु त्यांच्या मानसिक परिणामांत संभ्रमकारकतेचे प्रमाण कमी असते. तसेच त्यांचे औषधक्रियाशास्त्रीय गुणधर्म व विषाक्तता यांच्या मानाने मनोविस्फारक क्रिया गौण असते.

पहा : अल्कोहॉल औषधासक्ति कोकेन गांजा मदयासक्ति मादक पदार्थ शुद्धीहरण संवेदनाहरण.

संदर्भ : 1.Asaad,G.HallucinationinClinicalPsychiatry :AGuide for Mental Health Professionals, 1990.

            2. Barar, F. S. K. Textbook of Pharmacology, New Delhi, 1994.

            3. Bloom, F. E. and others Brain, Mind and Behaviour, 1985.

            4. Leonard, B. E. Fundamentals of Psychopharamacology, Chinchester, 1992.

            5. Spitzer, M. Hallucination, 1990.

श्रोत्री, दि. शं.