संधिवात : सांधे दुखणे हे प्रमुख लक्षण असलेल्या अनेक विकारांच्या समूहासाठी संधिवात ही संज्ञा सामान्यत: वापरली जाते. पाश्चात्त्य वैदयकात ऱ्हुमॅटिझम या शब्दाचा वापर प्रथमदर्शनी साम्य दाखविणाऱ्या अशा अनेक रोगांसाठी एकोणिसाव्या शतकात होत असे परंतु त्यांपैकी तीन प्रमुख रोगांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झाल्यावर हळूहळू संधिवात या शब्दाचा वापर मर्यादित झाला. ð गाऊट (१८५९), अस्थिसंधिशोथ (१८८८) व संधिवाताभ (१९०७) हे तीन रोग स्वतंत्रपणे अभ्यासले जाऊ लागले. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये सांधे सुजून येणाऱ्या तापाला तीव्र संधिवात किंवा संधिज्वर असे नाव पडले.

सध्या संधिवातीय विकार या नावाने ओळखले जाणारे सर्व दीर्घकालिक विकार पुढील वैशिष्टये दाखवितात: सांधे, स्नायू , स्नायुबंध (स्नायुरज्जू ,कंडरा), संधिबंध आणि इतर काही संयोजी ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या व जोडणाऱ्या कोशिकासमूहांमध्ये म्हणजे पेशीसमूहांमध्ये) वेदना जाणवणे ऊतकशोथाची (शोथ म्हणजे दाहयुक्त सूज) इतर लक्षणे आढळणे- उदा., सूज, लाली, स्पर्श केल्यास वा थोडा दाब दिल्यास दुखल्यामुळे सहन न होणे (स्पर्श असह्यता) सांध्यांच्या हालचालींस मर्यादा पडणे, विकारगस्त अवयवाच्या तापमानात वाढ होणे.

यांपैकी एक किंवा अधिक वैशिष्टये आढळल्यास त्यांची सांगड क्ष-किरण प्रतिमा व रक्ततपासणी यांच्याशी घालून विकाराच्या तीव्रतेचे मापन करण्यासाठी निकष ठरविण्याचे कार्य संधिवात वैज्ञानिकांच्या संस्था करीत असतात. संधिवाताच्या विकारप्रक्रियेमध्ये प्रामुख्याने दिसून येणारे ऊतकीय बदल किंवा विकारनिर्मितीस प्रारंभ करणाऱ्या घटना यांचा विचार करता पुढील चार वर्गांत हे विकार विभागले जातात : (१) शोथप्रधान संधिविकार, (२) ऱ्हसन (विृहास) प्रधान संधिविकार, (३) स्फटिक अवसादन विकार आणि (४) सार्वदेहिक संयोजी ऊतक विकार किंवा कोलॅजेन विकार.

शोथप्रधान संधिविकार : या वर्गात सर्वांत महत्त्वाचा विकार संधिवाताभ संधिशोथ असून जगातील सु. २% व्यक्तींमध्ये तो २० ते ५० वर्षे या वयोगटात केव्हाही उद्‌भवू शकतो. स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण पुरूषांच्या २ ते ३ पट अधिक असते. विषाणुसंसर्ग व त्यामुळे होणारे प्रतिरक्षा [→ रोगप्रतिकारक्षमता] यंत्रणेचे सकियण आणि काही जनुकीय घटकांमुळे आधीच असलेली आनुवंशिक प्रवृत्ती ही कारणे आता सिद्ध झाली आहेत.मूलत: सांध्यांच्या गुळगुळीत संधिपटलात (संधिकलेत) सुरू होणारी शोथ- प्रक्रिया कमाकमाने सांध्यातील स्नायुबंधांभोवती असलेल्या आवरणात, कूर्चांमध्ये आणि स्यूनांत पसरते, समीपच्या हाडांचा भागही नंतर रोगगस्त होऊन सांध्यांचा आकार बदलतो. लहान व मध्यम आकारमानाचे सांधे प्रामुख्याने सुजू लागतात. दोन्ही बाजू (डावी-उजवी) एकाचवेळी सारख्या प्रमाणात लक्षणे दाखवितात.

हाताची बोटे (शेवटचे पेर सोडून), तळहाताचे सांधे, मनगटे यांमध्ये सकाळी उठल्यावर सांधे आखडणे, वेदना इ. लक्षणे दिसून येतात. कोपरे, खांदे, गुडघे, पायांची बोटे, मानेचे सांधे यांमध्ये (प्रगत अवस्थेत) लक्षणे कालांतराने निर्माण होऊ शकतात. वजन घटणे, अल्परक्तता, अशक्तपणा यांसारखी सार्वदेहिक लक्षणे रूग्णाची स्थिती अधिक गंभीर करतात. कूर्चा व हाडे यांच्या सीमारेषेच्या आसपास ऊतकांची अतिरिक्त वाढ झाल्यामुळे सांधे कायम सुजल्यासारखे दिसतात. हालचाली मर्यादित होतात. सांध्यां-शिवाय इतरत्र अशीच प्रक्रिया सुरू झाल्यास परिफुप्फुसीय पटलाच्या शोथामुळे छातीत दुखणे, पायांना मुंग्या येणे, तंत्रिकांच्या- मज्जांच्या- पटलाचा शोथ यांसारखी लक्षणे उद्‌भवतात. सुमारे २०% रूग्णांमध्ये त्वचेखाली विशेषत: हाडांच्या पृष्ठभागालगतच्या त्वचेत लहानलहान गाठी आढळतात.

‘संधिवाताभ घटक’ या नावाने ओळखली जाणारी काही प्रथिने प्लाविका कोशिका व बी लसीका कोशिका निर्माण करतात. जनुकीय नियंत्रणाखाली निर्माण होणारे हे घटक रक्तरसात व संधिजलात आढळल्यास निदानास पुष्टी मिळते. हे घटक इम्युनोग्लोब्युलीन-जी (IgG) या प्रथिनांशी जोडले जाऊन त्यामुळे होणारी संयुगे संधिवाताभाच्या प्रक्रियेस प्रारंभ करून देतात, असे मानले जाते.

संधिवाताभ संधिवाताप्रमाणेच भासणारा, पाठीच्या मणक्यांपासून सुरू होणारा (कशेरूकशोथ स्पाँडिलायटिस) हा विकार याच वर्गात मोडतो. तरूण वयात, प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळणाऱ्या या विकाराचा प्रारंभ कंबरेतील पाठीमागच्या बाजूस त्रिकास्थीला श्रोणिफलकास जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सांध्यांत होतो तेथून पाठीच्या कण्याच्या सांध्यांमधून पसरत ही प्रक्रिया मानेपर्यंत पोहोचू शकते. कंबर दुखणे, मांडीतून पायापर्यंत चमक उठणे, पाठ धरणे, पाठीच्या आणि बरगड्यांच्या हालचालींस मर्यादा पडणे यांसारख्या लक्षणांची तकार रूग्ण करतात. प्रगत अवस्थेत, मणक्यांच्या पृष्ठभागापासून वाढणाऱ्या अस्थिमय प्रवर्धांचे (वाढींचे) मीलन होऊन मणके एकमेकांस जोडले जातात. पाठीचा कणा बांबूसारखा ताठ किंवा पुढे झुकून (कुबड येऊन) त्याची हालचाल फारच कमी होते. या बदलांमुळे या विकाराला ‘संधिगही कशेरूकशोथ’ या नावाने ओळखले जाते. संधि-वाताभापेक्षा भिन्न अशा HLA – B27 प्रतिजनाच्या उपस्थितीमुळे अचूक निदान शक्य होत आहे. खांदा, गुडघा आणि श्रोणी यांसारख्या मोठया सांध्यांमध्येही विकार पसरू शकतो. काही रूग्णांमध्ये डोळ्यातील कनीनिका तीव्र शोथाने गस्त होऊन वेदना निर्माण होतात. आनुवंशिक प्रवृत्ती लक्षात घेऊन योग्य उपचार आणि व्यायाम यांच्या मदतीने शारीरिक व्यंगाची निर्मिती टाळता येते.


संधिशोथाच्या इतर कारणांमध्ये मूत्रमार्गाचे गोनोकॉकस (परम्याचे जंतू) किंवा अन्य सूक्ष्मजीवांमुळे होणारे संक्रामण, दीर्घकालिक आमांश अथवा विषाणुजन्य संकामणे (उदा., रूबेला), बृहदांत्राचा (मोठया आतडयाचा) वणप्रधानशोथ आणि विसर्पिकेसारखे त्वचारोग यांचा समावेश होतो. अशा सर्व संधिशोथांना प्रतिक्रियात्मक संधिशोथ म्हणून ओळखले जाते. मूळच्या विकारामुळे उत्तेजित झालेल्या प्रतिरक्षा यंत्रणेच्या प्रतिसादाचा हा एक अनिष्ट परिणाम असावा, असे मानले जाते. अनेकदा त्यांची लक्षणे आणि प्रतिरक्षावैज्ञानिक रक्ततपासणीचे निष्कर्ष संधिगही कशेरूकशोथाशी साम्य दाखवितात.

ऱ्हसनप्रधान संधिविकार : सांध्यामधील कूर्चा आणि लगतचा हाडाचा भाग यांचे ऱ्हसन सर्व व्यक्तींमध्ये चाळिशीच्या सुमारास अल्प प्रमाणात होऊ लागते. क्ष-किरण चित्रात ते ओळखू येते परंतु त्याचा त्रास होत नसतो. सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांमध्ये (वटवाघूळ सोडून) ही प्रक्रिया आढळते परंतु ऱ्हसनजन्य संधिविकार मात्र काही व्यक्तींमध्येच आढळतात. काही प्रमाणात ऱ्हसनाबरोबरच संधिशोथाची प्रक्रियाही या विकारांमध्ये आढळते. अस्थिसंधिशोथ आणि कशेरूकविकृती हे दोन प्रकार या वर्गात प्रमुख आहेत. ते अनुकमे संधिकलायुक्त आणि कूर्चायुक्त सांध्यांमध्ये निर्माण होतात. पुरूषांमध्ये या विकारांचा प्रारंभ लवकर होतो.

अस्थिसंधिशोथ अनेक व्यक्तींमध्ये सांध्यांचे जंतुसंक्रामण, उपजत विद्रूपता, अपघातजन्य दोष, उठण्या-बसण्याच्या चुकीच्या सवयी, शस्त्रक्रियेतील त्रूटी किंवा व्यावसायिक हालचालींत विशिष्ट सांध्यावर पडणारा ताण या कारणांमुळे उद्‌भवू शकतो. इतरांमध्ये अशी कोणतीच कारणे दाखविता येत नाहीत. कूर्चेच्या ऊतकाचे घटक म्हणजे कोलॅजेन आणि प्रोटिओग्लायकेन निर्माण करणाऱ्या कोशिकांचे कार्य सदोष झाल्यामुळे कूर्चेत भेगा पडून विकृतीची प्रक्रिया सुरू होते. कूर्चा अनेक ठिकाणी झिजून तिच्याखालील हाडाचा पृष्ठभाग उघडा पडल्यावर वेदना जाणवतात. हाडांच्या सांध्याजवळील भागात लहानलहान गोलाकार पोकळ्या तयार होतात तसेच सांध्याभोवती हाडांची अतिरिक्त वाढ होऊन कठीण गाठी (अस्थी उद्वर्ध) तयार होतात. काही वर्षांनी सांध्याच्या रचनेतील सर्व घटक पूर्णपणे वाकडेतिकडे होऊन सांधा निकामी होऊ शकतो.

या विकाराची लक्षणे सुरूवातीस भारवाहक सांध्यांमध्ये (उदा., गुडघे) दिसतात. काम पडल्यामुळे वेदना, ताठरपणा, सांध्यांमध्ये करकर आवाज होणे अशा तकारी सुरू होतात. त्यानंतर हालचाल मर्यादित होणे किंवा सांधा आखडणे, सूज, सांध्यात पाणी साचणे, सांध्याची अस्थिरता, तंत्रिकांवर दाब आल्यामुळे काही भागांना मुंग्या येणे, हातापायांची अशक्तता इ. लक्षणे निर्माण होतात. या विकारात प्रामुख्याने गुडघे, श्रोणिसंधी, पायांचे अंगठे, हाताच्या बोटांच्या टोकांचे सांधे, हाताच्या अंगठयचा तळहाता-जवळील सांधा (करभास्थिजवळचा) यांमध्ये विशेष बदल झालेले दिसतात. संधिशोथ हे प्रमुख कारण नसल्यामुळे रक्ततपासणी किंवा सांध्यातील द्रवाचे पृथक्करण शोथजन्य बदल दाखवीत नाहीत. क्ष-किरण छायाचित्र निदानास साहाय्य करते.

कशेरूकविकृती या विकाराच्या प्रक्रियेत ऱ्हसनजन्य बदल प्रामुख्याने मानेच्या आणि पाठीच्या मध्यापासून खालच्या मणक्यांमध्ये घडून येतात. मणक्याच्या पुढच्या भागात (मुख्य भाग) आणि दोन मणक्यांमधील (अंतराकशेरूकीय) चपट्या चकत्यांमध्ये (बिंबांत) घडणाऱ्या ऱ्हसनामुळे मणके अधिक जवळ येऊन पाठीची उंची थोडी कमी होऊ शकते. तसेच चकतीची कड तुटून आतील मऊ मज्जेसारखा पदार्थ बाजूस पसरू लागतो. त्याचा दाब मज्जारज्जूमधून निघणाऱ्या तंत्रिकांच्या मुळांवर पडून अनेक प्रकारची लक्षणे (वेदना, पक्षाघात) उद्‌भवू शकतात. मानेच्या विकारात मेंदूकडे जाणाऱ्या एका रोहिणीवर दाब आल्यामुळे वर पाहिल्यास चक्कर येऊ लागते (कशेरूरोहिणी-तलीय रोहिणी अपर्याप्तता). तसेच मज्जा-रज्जूमधील महत्त्वाच्या तंत्रिकासमूहांवर दाब आल्याने शरीराच्या मोठया भागांवर गंभीर पक्षाघातीय परिणाम होऊ शकतो. अस्थिसंधिशोथासारखीच प्रक्रिया घडून आल्यामुळे या विकारात मणक्यांच्या मागच्या बाजूस असलेले एकमेकांच्या प्रवर्धांना जोडणारे सांधेही रोगगस्त होऊन हालचालींस बाधा आणतात. पोपटाच्या चोचीसारखे बाकदार व तीक्ष्ण अस्थी उद्वर्ध मणक्यांच्या मुख्य भागातून निघालेले क्ष-किरण छायाचित्रात दिसून येतात. प्रगत अवस्थेत कधीकधी मज्जारज्जू असलेली संपूर्ण पोकळी संकुचित होऊन रज्जूवर सर्व बाजूंनी दाब पडू शकतो.

स्फटिक अवसादन विकार : यूरिक अम्लाच्या चयापचयातील (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडीतील) दोषामुळे ‘ मोनोसोडियम युरेट’ या पदार्थाचे स्फटिक सांध्यांमध्ये निर्माण होऊनगाऊट हा विकार उद्‌भवतो. [→ गाऊट].

अशाच प्रकारचा विकार कॅल्शियम पायरोफॉस्फेटाचे अवसादन (साच- ण्याची क्रिया) कूर्चेमध्ये झाल्यामुळे होऊ शकतो. त्याला कृतकगाऊट किंवा कूर्चा कॅल्सीभवन असे नाव आहे.

सार्वदेहिक संयोजी ऊतक विकार : ‘कोलॅजेन विकार’ या नावाने एकत्रितपणे ओळखल्या जाणाऱ्या अनेक विकारांच्या या समूहात सांधेदुखी हे एक लक्षण असू शकते. या विकारांमध्ये सांध्यांशिवाय इतर अनेक प्रकारच्या ऊतकांची किंवा इंद्रियांची विकृतिगस्तता आढळते उदा., त्वचा, रक्तवाहिन्या, वृक्क, स्नायू. त्यांच्यापैकी कोणत्याही प्रकारांत निश्चित कारणपरंपरा ठरविता येत नसली, तरी प्रतिरक्षा यंत्रणेतील बदल मात्र सर्व प्रकारांत संभवतात. कारण रक्तामध्ये स्वप्रतिपिंड आणि प्रतिरक्षा तंत्राशी संबंधित रेणूंची संयुगे सर्व रूग्णांमध्ये आढळतात. अनेकदा एका प्रकारच्या ऊतकांनी निर्माण केलेली लक्षणे दुसऱ्या प्रकारच्या लक्षणांमध्ये परिवर्तित होतात.


सांध्यांमधील वेदना, त्वचेची अतिसंवेदनशीलता, रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे विविध ठिकाणच्या वेदना, स्नायुशोथ, वृक्क आणि यकृताच्या कार्यक्षमतेतील घट यांसारखी विविध लक्षणे या विकारांमध्ये उद्‌भवतात. या संयोजी ऊतक विकारांमध्ये पुढील विकारांचा समावेश होतो : (१) सार्वदेहिक आरक्त चर्मक्षय, (२) त्वचादृढता (त्वचाकर्कशता) अथवा सार्वदेहिक ऊतकदृढता, (३) त्वक्स्नायुशोथ आणि बहुस्नायुशोथ, (४) पर्विल बहुरोहिणीशोथ (पर्वयुक्त बहुरोहिणीशोथ), (५) स्योगेन लक्षण-समुच्च्य (नेत्रशुष्कता), मुखशुष्कता व संयोजी ऊतक विकार आणि (६) काही तज्ञांच्या मते संधिवाताभ संधिवात हा विकारही याच यादीमध्ये घालता येईल.

वर उल्लेखिलेले १ ते ५ विकार संधिवातामधील इतर विकारांच्या मानाने कमी प्रमाणात आढळतात परंतु त्यांची प्रगत लक्षणे गंभीर स्वरूपाची असू शकतात. रक्तदाब, रक्तस्राव, वृक्क आणि यकृताची पूर्ण अकार्यक्षमता, दृष्टिहीनता यांसारख्या परिणामांना सामोरे जाण्याची पाळी रूग्णावर येऊ शकते.

संधिवातावरील उपचार : संधिवात या विकारसमूहात विविध प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश होत असला, तरी सांधेदुखी आणि सांध्यांमधील रचनात्मक बदल यांसाठी मुख्यत्वे उपचार करावे लागतात. त्यामुळे उपलब्ध उपचार पद्धती या सर्व विकारांसाठी सारख्याच आहेत. फक्त प्रत्येक विकारांच्या अवस्थेनुसार, तीव्रतेनुसार आणि संभाव्य दोषानुसार या उपचारांपैकी योग्य तेवढे निवडावे लागतात. गरम पाण्याचे झरे (उन्हाळी) आणि खनिज जलचिकित्सा यांसारख्या प्राचीन काळापासून वापरात असणाऱ्या उपचारांपासून आधुनिक किरणोपचार व शस्त्रक्रियांपर्यंत अनेक तंत्रांचा समावेश उपचारात झालेला आढळतो. विकाराच्या निदानाबद्दल आणि विकृतीच्या प्रक्रियेबद्दल रूग्णाला संपूर्ण माहिती देऊन त्याचे सहकार्य प्राप्त करणे आवश्यक ठरते. कारण उपचार दीर्घकाळ चालू ठेवावे लागतात.

भौतिक उपचार : विविध प्रकारचे मर्दन (मसाज), शेक, डायाथर्मी, स्वनातीत किरण, ॲक्युपंक्चर, आधारदायक उपकरणे आणि ताण देऊन (कर्षण) सांध्यामधील ऊतकांवरील दाब कमी करणे यांचा भौतिक उपचारांत समावेश होतो. वेदना कमी करणे आणि सांध्यामधील संभाव्य दोष टाळणे हा या उपचारांचा उद्देश असतो.

औषधे : ॲस्पिरिनाच्या गटातील वेदनाशामक औषधे मुख्यत: सुरूवातीस वापरली जातात. शोथ कमी करण्यासाठी आयब्युप्रोफेन वर्गातील शोथ- प्रतिरोधक औषधे उपयुक्त ठरतात. कधीकधी त्यांचा प्रभाव अपुरा पडल्यास अधिवृक्क स्टेरॉइड वर्गातील (हायड्रोकॉर्टिसोन वर्गातील) द्रव्ये पोटात घेऊन किंवा सांध्यात अंत:क्षेपण (इंजेक्शन) देऊन तत्काळ परिणामकारक ठरतात. प्रतिरक्षायंत्रणेचे अवसादन करणारी ॲझाथायोप्रिनासारखी औषधे आणि कर्करोगावरील काही औषधेही (अल्प मात्रेमध्ये) क्वचित प्रसंगी उपयुक्त ठरतात.

शल्यचिकित्सा : विकारांच्या प्रगत अवस्थेत सांध्यांची मर्यादित हालचाल सुधारणे, रचनात्मक दोष काढून टाकणे किंवा तीव्र वेदना निर्माण करणारे दोष (उदा., तंत्रिकेवर दाब पडणे) दूर करणे हे उद्देश शल्यचिकित्सेशिवाय साध्य होणे कठिण असते. त्यासाठी एखादया कूर्चेच्या दुरूस्तीपासून ते संपूर्ण सांधा (उदा., गुडघा) काढून कृत्रिम सांधा बसविण्यापर्यंत अनेक प्रकारची शस्त्रक्रियांची तंत्रे आता विकसित होत आहेत. [→  विकलांग चिकित्सा].

प्रशिक्षण चिकित्सा : योग्य वेळी सांध्यांना विश्रांती देऊन इतर वेळी त्यांची कार्यक्षमता वाढविणारे व्यायाम, स्नायूंना अधिक कार्यक्षम करणारे किंवा ताणणारे व्यायाम, सुयोग्य असे मजबूत पृष्ठभागाचे आसन किंवा शय्या यांचा वापर करणे, सांध्यांवरील ताण कमी करणारी कार्यपद्धती (व्यवसायातील) याबद्दल मार्गदर्शन या चिकित्सेत दिले जाते.

पहा : कोलॅजेन रोग गाऊट, बालकंपवात विकलांग चिकित्सा संधिशोथ.

संदर्भ : 1. Berkow, R., Ed., Merck Manual of Medical Information, 1997.

           2. Curry, H. L. F. Hull, S. Rheumatology for General Practitioners, Oxford, 1987.

           3. Lahita, R. G., Ed., Systemic Lupus Erythematosus, 1992

           4. McCarty, D. J. Arthritis and Allied Conditions : A Textbook of Rheumatology, 1993.

           5. Saklatvala, J. Walport, M. J., Eds., Immunology of Rheumatoid Disease, London, 1995.

           6. Wyngaarden, J. B. Smith, L. H. Bennett, T. C., Eds., Cecil’s Textbook of Medicine, 1992.

श्रोत्री, दि. शं.