सक्सिनिक अम्ल : (HOOC.CH2CH2.COOH). हे संतृप्त डायकार्बॉक्सिलिक अम्ल असून निसर्गात वनस्पती आणि प्राणी यांच्या ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांत म्हणजे पेशीसमूहांत) एस्टररूपात किंवा मूळ स्वरूपात आढळते. टोमॅटो, कच्ची द्राक्षे, रेझिने, टर्पेंटाइन तेल यांमध्ये हे अम्ल आढळते. ⇨ अंबर (लॅटिन नाव सक्सिनिकम) या खनिजाचे ऊर्ध्वपातन करून ३ – ८% सक्सिनिक अम्ल ॲगिकोला यांनी १५५० मध्ये प्रथम मिळविले. याचे स्फटिक प्रचिनाप्रमाणे असून ते रंगहीन व गंधहीन असतात. यांचे रंगहीन त्रिनताक्ष प्रचिन (आल्फा प्रकार) आणि एकनताक्ष प्रचिन (बीटा प्रकार) असे दोन प्रकार आहेत. एकनताक्ष स्फटिक घर्षणाने दीप्तिमान होतात आणि १३७° से. तापमानापर्यंत स्थिर असतात. त्रिनताक्ष स्फटिक १३७° से. तापमानाच्या वर स्थिर असतात[⟶ स्फटिकविज्ञान]. दोन्ही प्रकार पाणी, अल्कोहॉल, डायएथिल ईथर, निर्जल ग्लिसरॉल, ॲसिटोन यांमध्ये विद्राव्य (विरघळणारे) आहेत. याचा वितळबिंदू १८५° से., उकळबिंदू २३५° से., २ मिमी. हवेच्या दाबास संप्लवन बिंदू (घनरूपातून थेट वायुरूपात परिवर्तित होण्याचे तापमान) १५६° से. आहे. लोणारी कोळसा विद्रावातील सक्सिनिक अम्ल ताबडतोब शोषून घेतो.
दोन कार्बॉक्सिलिक गटांमुळे होणाऱ्या सर्व विक्रिया सक्सिनिक अम्लापासून मिळतात. त्याचप्रमाणे दोन कियाशील मिथिलीन गटांमुळे होणाऱ्या काही विशेष विक्रियाही त्यापासून मिळतात. [⟶ कार्बॉक्सिलिक अम्ले].
सक्सिनिक अम्ल तापविले असता पाणी निघून गेल्यामुळे स्थिर वलय संरचना असलेले सक्सिनिक ॲनहायड्राइड तयार होते. पुढे आणखी उष्णता दिली असता डायलॅक्टोन मिळते.
सक्सिनिक अम्ल सामान्यपणे मॅलेइक ॲनहायड्राइड किंवाफ्यूमेरिक अम्ल यांच्या हायड्रोजनीकरणाने तयार करतात. मेदांचे (वसांचे) रासायनिक आणि जीवरासायनिक ऑक्सिडीकरण करून, कॅल्शियम मॅलेट किंवा अमोनियम टार्टारेट यांचे ⇨ किण्वन करून आणि साखरेचे अल्कोहॉली किण्वन करून सक्सिनिक अम्ल तयार करता येते.
उपयोग : सक्सिनिक अम्लाची विषाक्तता फार कमी असल्यामुळे त्याचा वापर अन्न आणि औषधे यांमध्ये मोठया प्रमाणात करतात. सक्सिनिक अम्ल आणि त्याचे अनुजात यांचे रासायनिक आणि भौतिकीय गुणधर्म वैशिष्टयपूर्ण असल्यामुळे त्यांचा औदयोगिक उत्पादनांमध्ये उपयोग करतात. अनेक प्रकारचे रंग, आसंजके (चिकटविणारे पदार्थ), कीटकनाशके, प्रत्यास्थताकारके, वंगणे, प्लॅस्टिकीकारके इत्यादींच्या संश्लेषणात त्यांचा वापर करतात. छपाईच्या शाईमध्ये वाहक म्हणून, मार्मालेड तयार करण्याकरिता जिलेटीनकारक म्हणून आणि पायस रंगलेपांमध्ये संमीलनकारक म्हणून सक्सिनिक अम्लाचा उपयोग करतात. N–क्लोरोसक्सिनिमाइड हे तीव्र जंतुघ्न असून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. ॲलिलीक ऑक्सिडीकरण व विशिष्ट त्रिमितीय हॅलोजनीकरण यांकरिता N–ब्रोमोसक्सिनिमाइड हा महत्त्वाचा विक्रियाकारक आहे.
पहा : कार्बॉक्सिलिक अम्ले.
कुलकर्णी, रं. सि.