सक्लिंग, सर जॉन : (फेबुवारी १६०९-१६४२). इंग्रज कवी-नाटककार. जन्म इंग्लंडच्या मिड्लसेक्स परगण्यातील व्हिटन येथे. केंब्रिजच्या ‘ ट्रिनिटीकॉलेजा ’ त व नंतर लंडनच्या ‘ ग्रेज इन ’ ह्या संस्थेत त्याने कायदयाचे अध्ययन केले (१६२७-२८). सक्लिंगचे वडील इंग्लंडचा राजा पहिला जेम्स ह्याच्या कारकीर्दीत ‘ सेकेटरी ऑफ स्टेट ’ ह्या हुदयावर होते. त्याला वयाच्या अठराव्या वर्षीच वडिलांची समृद्ध मालमत्ता मिळाली. त्यानंतर त्याने फ्रान्स व इटली ह्या देशांचा दौरा केला. १६३० मध्ये त्याला ‘नाइट ’ करण्यात आले. तत्कालीन एक पराक्रमी सरदार म्हणून त्याची ख्याती होती तद्वतच तो बऱ्यापैकी एक जुगारी होता. १६३१ मध्ये स्वीडनचा राजा दुसरा गस्टाव्हस ऑडॉल्फस (कार. १६११-३२) ह्याला फ्लेमिश सेनापती टिली ह्याच्या विरूद्धच्या लढाईत त्याने मदत केली. टॉमस कऱ्यू , रिचर्ड लव्हलेस आणि सर विल्यम डॅव्हनंट ह्या कवींशी त्याची मैत्री होती. संभाषणचतुर, क्रीडाप्रेमी म्हणून तो प्रसिद्ध होता. ‘ क्रिबेज ’ हा खेळ त्याने निर्माण केला, असे म्हणतात. १६३९ मध्ये इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स ह्याच्या बरोबर तो स्वत:चे घोडदळ पथक घेऊन स्कॉटलंड विरूद्धच्या अयशस्वी मोहिमेत सहभागी झाला. १६४१ मध्ये ‘ टॉवर ऑफ लंडन ’मध्ये बंदिस्त असलेल्या ‘ फर्स्ट अर्ल ऑफ स्ट्रॅफर्ड ’ ह्याला मुक्त करण्याच्या कटात तो सहभागी झाला होता. तो कट फसल्यानंतर सक्लिंग पॅरिसला पळाला. तिथे विपन्नावस्थेत जगण्याची पाळी आल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते.
सक्लिंगने चार नाटके लिहिली. त्यांपैकी अग्लौरा (शोकात्मिका, प्रयोग १६३७, प्रकाशित १६३८) आणि द गॉब्लिन्स (सुखात्मिका, १६३८) ही विशेष उल्लेखनीय होत. त्यांतून शेक्सपिअर, फ्लेचर व ब्यूमॉन्त यांचे अनुकरण दृष्टोत्पत्तीस येते तथापि तो ‘ कॅव्हलिअर ’ म्हणजे दरबारी कवी होता. त्याची अ बॅलन अपॉन अ वेडिंग ही पोवाडासदृश काव्यकृती उत्कृष्ट मानली जाते. त्याच्या बहुतेक कविता छोटया, प्रासंगिक स्वरूपाच्या आहेत पण त्याचा कवी म्हणून नावलौकिक मुख्यत्वे भावकवितांत दृग्गोचर होतो. श्रेष्ठ इंग्रज कवी ⇨ जॉन डन (१५७२ – १६३१) याचे स्मरण करून देणारी प्रतिमायोजना तो अधूनमधूनकरतो तथापि बौद्धीकतेच्या संदर्भात डनच्या तुलनेत तो खूप उणा ठरतो. नैसर्गिक सहजपणा हलकाफुलका, संभाषणात्मक सूर, व्यवहारी शहाणपणा प्रकट करणारा आशय, एक प्रकारचा डौल, नादमाधुर्य आणि विनोदप्राचुर्य ही त्याच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्टये होत. त्याची बोलीभाषेतील विनोदप्रचुर शैलीतील चैतन्यपूर्ण पत्रे उपलब्ध आहेत. त्याचे साहित्य त्याच्या मृत्यूनंतर फाग्मेंता ऑरिआ (१६४६) ह्या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. त्याचे संकलित साहित्य संपादून डब्ल्यू. सी. हॅझलिटने प्रसिद्ध केले (१८४७). अलीकडे टी. क्लेटन व एल्. ए. बोरिन यांनी त्याच्या समग साहित्याची आवृत्ती दोन खंडांत प्रकाशित केली आहे (१९७१).
संदर्भ : Squier, Charles, Sir John Suckling, London, 1978.
भागवत, अ. के.