सकल-आफ्रिकावाद : आफ्रिका व आफ्रिकेतर देशांतील सर्व कृष्णवर्णीय आफ्रिकी (आफ्रिकन) लोकांचे ऐक्य, समानहक्क, पारस्परिक हित आणि श्र्वेतवर्णीय वसाहतवादाचे उच्चटन करून स्वातंत्र्य संपादना-साठी उदभवलेले एक आंदोलन. हे आंदोलन ही एक गुंतागुंतीची संकल्पना असून तिची व्याप्ती, अर्थ व विचारसरणी यांसंबंधी मतभिन्नता आहे. काही विव्दानांच्या मते या संज्ञेत क्षोभ, संकल्प, भावभावना आणि सैद्धांतिक विचार यांचा अंतर्भाव होतो तर काही तज्ज्ञ या आंदोलनाचा मुख्य हेतू आफ्रिकनांचे ऐक्य व पारस्परिक हित साधणे, हा मानतात. सकल आफ्रिकावादाचा अध्वर्यू डब्ल्यू. इ. बी. द्यूबॉईस याच्या मते सर्व आफ्रिकनांच्या भावना समजावून घेऊन परस्परांना सहकार्य करण्याच्या हेतूने उद्‌भवलेले हे एक बुद्धीवादी आंदोलन होय. आश्चर्याची बाब म्हणजे या संकल्पनेचा उगम आफ्रिका खंडात न होता, अमेरिका व वेस्ट इंडीजमध्ये झाला. अठराव्या शतकात बार्बेडोसचा रहिवाशी, पण बॉस्टनमध्ये राहात असलेल्या प्रिन्स हॉल या कृष्णवर्णीय निग्रोने मॅसॅचूसेट्सच्या विधिमंडळात १७८७ मध्ये स्वदेशी (आफ्रिका) जाण्यासाठी विनंती अर्ज केला. पुढे ही स्वदेश – प्रत्यवर्तनाची चळवळ क्वेकर व्यापारी पॉल कफी (१७५९-१८१७) याने सिएरा लिओन (पश्र्चिम आफ्रिका) या गावास दोनदा भेट देऊन पुढे नेली. शिवाय त्याने एक संस्था काढून स्वखर्चाने सुमारे चाळीस कृष्णवर्णीयांना आफ्रिकेत नेले. ओलाडाह इक्विनो या अमेरिकेतील नायजेरियन गुलामाने मुक्ती मिळवून इंग्लंड गाठले. तिथे त्याने गुलामगिरी जीवनातील कटू अनुभव आत्मवृत्ताव्दारे प्रसिद्ध केले. परिणामत: ‘ आफ्रिकन एमिग्रशन असोसिएशन ’ ही संस्था स्थापन झाली. याच सुमारास जेम्स आफिकॅनस हॉर्टन याने यूरोपियनांच्या जुलूमाविरूद्ध आफ्रिकन राष्ट्रवादाची घोषणा केली पण त्याचा उघडपणे प्रसार – प्रचार लायबीरियातील एडवर्ड ब्लायडन या निग्रो पत्रकार-संपादकाने केला. यामुळे १८९३ मध्ये अमेरिकेतील आफ्रिकन लोकांची शिकागो येथे परिषद झाली. तीत ‘ पॅन आफ्रिकन ’ ही संज्ञा प्रथम वापरली. तीमधूनच पुढे ‘ आफ्रिकन असोसिएशन ’ इंग्लंडमध्ये स्थापन झाली (१८९७). तिचा उद्देश वसाहतवादी साम्राज्यशाही विरोधी प्रचार-प्रसार व कृती होता. यानंतर एच्. एस्. विल्यम्स नावाच्या वेस्ट इंडियन वकीलाने लंडनमध्ये पहिले अखिल आफ्रिका ऐक्य संमेलन भरविले. त्यात उपस्थित असलेल्या द्यूबॉईस या अमेरिकन निग्रो पुढाऱ्याने या कल्पनेस पहिल्या महायुद्धानंतर जोराची चालना दिली.

सकल आफ्रिकन काँग्रेसच्या १९००-४५ दरम्यान पाच परिषदा अमेरिका – यूरोपमधील विविध शहरांतून भरल्या. त्या परिषदांत यूरोपीय देशांच्या आफ्रिकेतील प्रदेश बळकविण्याच्या झोंबाझोंबीविषयी निषेध नोंदविण्यात येऊन, कृष्णवर्णीयांत परस्परहितैक्य साधण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. त्या प्रकियेस गती देण्याचे ठरले. पहिल्या महायुद्धानंतर पॅरिसच्या शांतता तहाच्या काळात (१९१९) द्यूबॉईसच्या अध्यक्षतेखाली सकल आफ्रिकावादयांची दुसरी परिषद झाली. तीत वुड्रो विल्सन याच्या स्वनिर्धार तत्त्वाचा पुरस्कार आफ्रिकेतील देशांनी करावा, असे ठरले. द्यूबॉईसने या आंदोलनास, विशेषतः कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी साहाय्यभूत ठरतील अशा ‘ नायगरा मूव्हमेन्ट ’ आणि ‘ नॅशनल असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेन्ट ऑफ कलरड पीपल ’ या दोन संस्था काढल्या. या आंदोलनात मार्क्स गार्व्हे (१८८७-१९४०) या कृष्णवर्णीय विचारवंताने ‘युनिव्हर्सल निग्रो इम्प्रूव्हमेंट असोसिएशन ’ (यूएन्आय्ए) ही संस्था किंग्स्टन (जमेका) येथे स्थापून नवचैतन्य आणले. या संस्थेची घोषणा होती, ‘ आफ्रिकेला परता ’ आणि ‘ आफ्रिका आफ्रिकनांसाठी आहे ’. त्याच्या विचारांचे मुख्य सूत्र आफ्रिकनांना आर्थिक-धार्मिक दृष्टया समर्थ करून त्यांच्यात स्वाभिमान जागृत करणे हे होते. त्याने आफ्रिकन राष्ट्रगीत आणि ‘ ड्यूक ऑफ नाईल ’, ‘ अर्ल ऑफ काँगो ’ यांसारखी काही बिरूदेही रचली होती. गार्व्हेच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव अमेरिका, यूरोप व आफ्रिका येथील कृष्णवर्णीयांवर पडला. त्याने या बुद्धीवादी आंदोलनास जनसामान्यांचे आंदोलन केले. यानंतरच्या १९२१, १९२३ व १९२७ या परिषदा द्यूबॉईसच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. त्यांतून वर्णविव्देष व वसाहतवाद यांवर टीका करण्यात आली. काही निंदाविषयक ठरावही संमत झाले. या सुमारास ‘ हार्लेम प्रबोधन ’ या नावाने अमेरिकेत प्रसिद्धीस आलेल्या चळवळीत सकल – आफ्रिकावादाचे सांस्कृतिक प्रकटीकरण दिसते. त्यात कृष्णवर्णीयांच्या स्वाभिमानाला प्रतिष्ठा लाभली.

या आंदोलनातील महिलांची भूमिकाही महत्त्वाची आहे. मार्क्स गार्व्हेच्या यूएन्आय्ए या संस्थेत स्त्री अध्यक्षा होती. गार्व्हेची पहिली पत्नी ॲमी ॲशवड हिने यूएन्आय्ए संस्थेच्या स्थापनेत – कार्यात सक्रिय सहभाग घेतला. तिने या विषयावर विपुल लेखन केले असून इटलीने जेव्हा इथिओपियावर आकमणाचा बेत केला (१९३४), तेव्हा त्याचा जाहीर निषेध ॲमीने केला. गार्व्हेची दुसरी पत्नी ॲमी जॅक्विस हिने गार्व्हे तुरूंगात असताना यूएन्आय् ही संस्था चालविली. दुसऱ्या एका हेन्रिटा व्हिंटॉन डेव्हिस या स्त्रीने ‘ ब्लॅक स्टार लाइन ’ या संस्थेचे संचालकपद भूषविले. डी मेना, हेलन कर्टिस, जेसी फॉसेट, अँडी हंटन, क्वीन मदर मून वगैरे तत्कालीन महिलांचे या चळवळीतील योगदान उल्लेखनीय आहे.

इथिओपियावर मुसोलिनीने १९३५ मध्ये आकमण करताच, लंडन- मधील आफ्रिकी कृष्णवर्णीयांनी त्या देशाच्या बचावासाठी ‘ इंटरनॅशनल आफ्रिकन फ्रेन्डस् ऑफ ॲबिसिनिया ’ ही संस्था काढली. त्याच वेळी जोमो केन्याटा (केन्या) याने फॅसिझमविरूद्ध मोहीम उघडली. दुसऱ्या महायुद्धानंतर मँचेस्टर (इंग्लंड) येथे आफ्रिकनांची पाचवी परिषद भरली (१९४५). या परिषदेचे वैशिष्टय म्हणजे तीत प्रत्यक्ष आफ्रिकेतील पुढाऱ्यांनी सक्रिय भाग घेतला. इतर ठरावांबरोबर यूरोपीय राष्ट्रांनी अटलांटिक सनदेची तत्त्वे आफ्रिकेतील वसाहतवादी राष्ट्रांना लावून वसाहतवाद संपुष्टात आणावा, अशी खंबीर भूमिका मांडली. पुढे या परिषदेतील अनेक प्रतिनिधी नेत्यांनी आफ्रिकेतील स्वातंत्र्यचळवळीला प्रोत्साहन दिले आणि आंदोलन तीव्र केले. त्यांपैकी क्वामे एनकुमाह (घाना), ओबेंफेमी अवोलोवो (नायजेरिया), हेस्टिंग्ज बांडा (मालावी) या नेत्यांच्या सकल-आफ्रिकावादी आंदोलनास यश लाभले आणि १९५० ते १९६५ दरम्यान बहुतेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. याच काँग्रेसमध्ये अठरा कामगार संघटनांनी भाग घेतला होता. घानाच्या स्वातंत्र्यानंतर (१९५७) एन्क्रूमाह यांच्याकडे या आंदोलनाचे आपाततः नेतृत्व आले. त्याचा आदर्श इतरांनी ठेवून उग्र आंदोलने छेडली. वसाहतवादी साम्राज्यास अधोगती लागली. दारे-सलाम (टांझानिया) येथील १९७४ च्या परिषदेत राजकीय स्थित्यंतरावर चर्चा झाली. वांशिक पृथक्वासन (ॲपर्थिड) नामशेष करून जागतिक स्तरावर कृष्णवर्णीयांना सामाजिक – राजकीय हक्क प्राप्त झाले पाहिजेत, याविषयी आगही भूमिका प्रतिपादण्यात आली. त्यामुळे १९९० च्या दशकात नेल्सन मंडेलांसारख्या नेत्याचे महत्त्व वाढले. इथिओपियातील रस्ताफरी आंदोलनाने (रास तफारी राजाचे) श्र्वेतवर्णीयांच्या जुलूमाविरूद्ध आवाज उठविला. विसाव्या शतकाच्या अखेरीस या प्रणालीचा सर्वत्र फैलाव झाला. आफ्रिकेतील नव-स्वतंत्र देश विकासापासून अदयापि वंचित असले, तरी सकल आफ्रिकावादी चळवळीने त्यांच्यात ऐक्याची भावना पूर्णतः रूजविली आहे.

संदर्भ : 1. Esedebe, P. O. Pan-Africanism : The Idea and Movement : 1776–1963, Washington, 1993.

2. Walters, R. W. Pan– Africanism in the African Diaspora, 1993.

देशपांडे, सु. र.