सरीसृप वर्ग : सर्व सरपटणाऱ्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) चतुष्पाद प्राण्यांचा समावेश या वर्गात होतो. हे फुप्फुसांनी श्वसन करणारे, शरीरावर खवले किंवा अस्थिपट्टिका असणारे, अनियततापी, कवचयुक्त अंडज प्राणी आहेत. वर्गीकरणात या प्राण्यांचे स्थान उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या) आणि नियततापी प्राण्यांच्या मध्ये समजले जाते.

सरीसृप प्राण्यांचे उल्लेख पुराणकथांत, धर्मग्रंथात व दंतकथांत आढळतात. श्रीविष्णूचा दहा अवतारांपैकी दुसरा अवतार कूर्मावतार हा कासवाचा आहे. नृग राजाने मृत गायीचे दान केले म्हणून त्याला शाप मिळून सरडयाचे रूप प्राप्त झाले. श्रीविष्णू क्षीरसागरात शेषनागावर विश्रांती घेत आहेत तर श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात राहणाऱ्या दुष्ट, विषारी कालिया नागाचे मर्दन केल्याची कथा भागवतपुराणा त आहे. गजेंद्रमोक्षाच्या कथेत गजेंद्राचा पाय नकाने (मगरीने) पकडला होता. गजेंद्राने धावा केल्यामुळे श्रीविष्णूने त्याला नक्रापासून वाचविले.

बायबल या क्रिस्ती धर्मग्रंथामध्ये आदिमानव आदम याला बागेतील ज्ञानाचे फळ खाण्यास सर्पानेच ईव्हकडून उद्युक्त केले, असे नमूद केले आहे. ईजिप्तमधील देवळात अनेक जातींच्या सरीसृपांची चित्रे आढळतात.ज्यू, चिनी व मुसलमान लोकांच्या धर्मग्रंथामधून सरीसृपांचे उल्लेख आढळतात.

सरीसृपांच्या अधिवासामध्ये विविधता आढळते. ते सबंध जगभर पसरलेले आहेत. मात्र ते दोन्ही ध्रूवांवर आढळत नाहीत. त्यांच्या सु. ६,००० जाती आहेत. हे प्राणी प्रामुख्याने जमिनीवर राहतात. उदा., सरडे, पाली, घोरपड, साप इत्यादी. काही प्राण्यांना जमीन व पाणी या दोन्हींची आवश्यकता असते. उदा., कासव, सुसर, मगर इत्यादी.

  

आकार, आकरामान आणि रंग यांमध्ये विविधता असलेल्या सरीसृप वर्गातील प्राण्यांच्या काही जाती.

क्रोकोडिलस ॲक्युटस या अमेरिकन मगरीची लांबी ६·१ मी. असते. समुद्राच्या पाण्यात राहणाऱ्या क्रोकोडिलस पोरोसस या मगरीची लांबी ९·१५ मी. असते. मरीन लेदरबॅक या जातीच्या कासवाची लांबी २·७१ मी. व वजन सु. ६८० किगॅ. असते. जमिनीवर राहणाऱ्या कासवांमध्ये गालॅपागस बेटावरील कासवे सर्वांत मोठी असून त्यांचे वजन २५५ किगॅ. असते [→कासव]. मॉनीटर हा सर्वांत मोठा सरडा असून त्याला ‘कोमोडो ड्रगन’ असे म्हणतात. त्याची लांबी ३·०५ मी. असते.


 दक्षिण अमेरिकेत आढळणारा ⇨ ॲनॅकाँडा हा सर्वांत मोठा व लांब साप असून त्याची लांबी ९·१५ मी. असते. ⇨ नागराज (किंग कोबा) हा विषारी सापातील मोठा साप असून त्यांची लांबी ५·३९ मी. असते. ईस्टर्न डायमंड बॅक रॅटल स्नेक हा विषारी साप वजनाने मोठा असून त्याची लांबी २·४१ मी. व वजन १५·५ किगॅ. असते. बिनविषारी सापांमध्ये ओरिएंटल रॅट स्नेक हा सर्वांत मोठा साप असून त्याची लांबी ३·७२ मी. असते.

सरीसृपांमध्ये सर्वांत लहान प्राणी गेको हा सरडा असून त्यांची लांबी ३ सेंमी. असते. ⇨ आंधळ्या सापा ची (टिफ्लॉपिडी कुल) लांबी १० सेंमी. असते. लहान कासवाचे वजन ४५० गॅ. व लांबी १२·५ सेंमी. असते. लहान मगर ऑस्टिओलीमस टेट्रॅस्पिस ही असून तिची लांबी १·७१ मी. असते.

वृक्षवासी प्राण्यांमध्ये अजगर, ओरिएंटल पीट व्हायपर, वाईन स्नेक, फ्लाईंग स्नेक व काही मॉनिटरासारखे सरडे यांचा समावेश होतो. उडणाऱ्या सरीसृपांमध्ये ड्रकोसारखे सरडे पंखांच्या साहाय्याने हालचाल करतात. त्यांमध्ये आर्कोसॉरिया डायनोसॉराचाही समावेश करता येतो. आर्कोसॉर, टेरोसॉर यांमध्ये शरीराच्या दोन्ही बाजूस पंखांसारखे भाग तयार झाले होते.

बहुतेक सरीसृप चार पायांच्या साहाय्याने हालचाल करतात. मगर आपले शरीर पायांच्या साहाय्याने जमिनीपासून थोडे वर उचलते व मध्यम गतीने हालचाल करते. लहान सरडे वेगाने हालचाल करतात. मोठया आकारमानाचे सरडे त्यांच्या लहान पायांमुळे वेगाने हालचाल करू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी सापांना लहान पाय होते, परंतु साप बिळात राहत असल्याने त्यांना पायांचा अडथळा होऊ लागला व कमविकासात हळूहळू सापांचे पाय नष्ट झाले. सापाच्या शरीराला S आकाराची अनेक वळणे तयार होतात. तो खडक, जमीन अशा कठीण भागांवर दाब देऊन सरपटत हालचाल करतो. अजगर व घोणस सरळ रेषेत पुढे सरपटत जातात. अमेरिकेत आढळणारे गळपट्टी असलेले सरडे व ऑस्ट्रेलियातील फिलेड सरडे द्विपाद प्राण्यांप्रमाणे दोन पायांनी हालचाली करतात. याचा डायनोसॉरामध्ये जास्त विकास झाला व द्विपाद डायनोसॉर निर्माण झाले.

कीटक, मृदुकाय प्राणी, बेडूक, सस्तन प्राणी, मासे हे सरीसृपांचे अन्न आहे. जमिनीवर आढळणारी कासवे ही शाकाहारी असून ती गवत, पाने व वनस्पती खातात. दक्षिण अमेरिकेतील गीन इग्वाना (इग्वाना इग्वाना ) काटेरी शेपूट असलेले ॲगॅमिडी (यूरोमॅस्टिक्स) हे सर्व शाकाहारी प्राणी आहेत. मांसाहारी सरीसृप त्यांच्यापेक्षा लहान प्राण्यांचे मांस खातात. अजगर [रेटिक्युलेटेड (जाळीदार नक्षी असलेला) पायथॉन, इंडियन पायथॉन] आणि ॲनॅकाँडा (यूनेक्टिस म्यूरिनस) हे लहान डुकरे, हरीण यांसारखे सस्तन प्राणी खातात. नाईल क्रोकोडाइल, ईस्ट इंडियन सॉल्ट वॉटर क्रोकोडाइल आणि ओरिनोको क्रोकोडाइल ह्या मगरीच्या जाती माणसावर हल्ल करतात व त्यास खातात.

सरीसृपांची प्रमुख लक्षणे :त्वचा : या प्राण्यांची त्वचा जाड, शुष्क, कांतीहीन व खरबरीत खवल्यांनी युक्त असते. अशा प्रकारच्या त्वचेमुळे हे प्राणी उभयचर प्राण्यांपेक्षा वेगळे दिसतात. खवल्यांमुळे शरीरातील पाणी बाष्परूपाने बाहेर पडण्यास प्रतिबंध केला जातो. वातावरणातील उष्णतेचा अगर थंडीचा या प्राण्यांच्या अंतर्गत शरीरक्रियांवर विपरित परिणाम होत नाही. चालताना प्राण्यांचा पोटाचा भाग जमिनीवर घासला जातो. या घर्षणामुळे पोटाला इजा होऊ न देण्यासाठी त्वचेवरील खवल्यांचा उपयोग होतो.

शरीर : या प्राण्यांचे शरीर डोके, मान, धड व शेपटी यांमध्ये विभागलेले असते. मानेमुळे या प्राण्यांना कोणत्याही दिशेला डोके वळविणे शक्य होते. या प्राण्यांमध्ये जिभेचा विकास झालेला असून तिची मुक्तपणे हालचाल होते. सरडयासारखे प्राणी जिभेच्या साहाय्याने भक्ष्य पकडतात. सरीसृप जमिनीवर चालू लागल्याने त्यांच्या पायांचा विकास झाला. पायांच्या बोटांना असलेल्या नख्या काही प्राण्यांना भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी उपयोगी पडतात.

तापमान : हे अनियततापी प्राणी आहेत. त्यांच्यात शरीराचे तापमान एका विशिष्ट पातळीवर ठेवण्याची क्षमता असते. वातावरणातील तापमानात जसजसे चढ-उतार होतात त्यानुसार ठराविक मर्यादेपर्यंत या प्राण्यांच्या तापमानात बदल होतात. तापमान विशिष्ट पातळीच्या खाली गेल्यास हे प्राणी जास्त तापमान असलेल्या भागात स्थलांतर करतात. ते शक्य न झाल्यास या प्राण्यांच्या हालचाली मंद होतात.

कंकाल तंत्र : या प्राण्यांचे कंकाल तंत्र (अस्थिपंजर) पृष्ठवंशी प्राण्यांसारखे असते. ते अस्थियुक्त असून मेरूदंड (कशेरूक दंड) लांब असतो. उरोस्थी व बरगड्या यांपासून छातीचा पिंजरा तयार होतो. या प्राण्यांच्या प्रत्येक गटाची वेगळी वैशिष्टये आहेत. सापामध्ये पाय पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये पायांचे रूपांतर पंखासारख्या किंवा वल्ह्यासारख्या अवयवांत झाले आहे उदा., सागरी कासवे. मगरीच्या खालच्या व वरच्या जबड्यांत दातांची एक रांग असते. त्यांचा उपयोग मांसाचे लचके तोडण्यासाठी केला जातो. कीटकभक्षी प्राण्यांमध्ये दातांचा उपयोग कीटकाचे तुकडे करण्यासाठी होतो.

पचन तंत्र : सरीसृपांचे पचन तंत्र पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे असते. यामध्ये तोंड, लालागंथी, गसिका, जठर, आतडे व अवस्कर (आतडे, मूत्रमार्ग व प्रजोत्पादक नाळ यांतील -उत्सर्ग – मोचन – जेथे येतात ते कोटर) यांचा समावेश होतो. विषारी सापांमध्ये लाल गंथीच्या एका जोडीचे रूपांतर विषगंथीत झालेले असते.

रूधिराभिसरण तंत्र : महानीला एकत्र येऊन होणारे एक कोटर, दोन अलिंदे आणि पडदयाने अपुरे विभागलेले एक निलय असे यांच्या हृदयाचे भाग असतात. निलयाच्या प्रत्येक कप्प्यापासून एक रक्तवाहिनी निघते. हृदयात शुद्ध व अशुद्ध रक्ताचे मिश्रण थोडयाफार पमाणात होत असते. रक्तवाहिन्यांमार्फत असे रक्त शरीराच्या सर्व भागांना पुरविले जाते.

श्वसन तंत्र : बहुतेक सरीसृप फुप्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात. कासव, सुसर, मगर यांसारखे पाण्यात राहणारे प्राणी श्वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन हवा मिळवितात.

उत्सर्जन तंत्र : या तंत्रामध्ये पश्चवृक्कक वृक्कांची V आकाराची एक जोडी, उत्सर्जन नलिका, मूत्रवाहिनी, मूत्राशय व अवस्कर यांचा समावेश होतो. मूत्र अवस्कराव्दारे शरीराच्या बाहेर टाकले जाते. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या टाकाऊ द्रव्यात अमोनिया असतो, तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या टाकाऊ द्रव्यात यूरिक अम्ल असते.

तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). या तंत्रामध्ये मेंदू व मेरूरज्जू यांचा समावेश होतो. सरीसृपांतील मेंदू सस्तन प्राण्यांच्या मेंदूपेक्षा आकारमानाने लहान असतो. या प्राण्यांमध्ये प्रमस्तिष्क गोलार्धाचा विकास सस्तन प्राण्यांच्या तुलनेत कमी झालेला आहे. मस्तिष्क तंत्रिकांच्या (मेंदूपासून निघणाऱ्या मज्जातंतूंच्या) १२ जोडया असतात. मस्तिष्क तंत्रिका व मेरूरज्जूपासून निघणाऱ्या तंत्रिकांचे मिळून परिसरीय तंत्रिका तंत्र बनते.

ज्ञानेंद्रिये : आजूबाजूच्या वातावरणातील उद्दीपनांचे आकलन होण्याकरिता इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे सरीसृपांत ज्ञानेंद्रिये असतात. ज्ञानेंद्रिये तंत्रिकांशी संलग्न असतात. दृष्टी, श्रवण व गंध यांची ज्ञानेंद्रिये या प्राण्यांत असतात.

दृष्टी : बहुतेक सरीसृपांची दृष्टी मुख्यत: एकनेत्री असते. या प्राण्यांच्या डोळ्यांची रचना सर्वसाधारणपणे इतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांप्रमाणे असते. डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांची हालचाल होते. पापणीचा आकार विविध प्रकारचा असतो. तो कासवामध्ये गोल छिद्रासारखा, मगरीमध्ये लहान फटीसारखा असतो. सापामध्ये पापण्या नसतात. डोळ्यावर पारदर्शक खवला असतो. मगरीमध्ये डोळ्यांवर संरक्षणासाठी निमेषक पटल असते.

नेत्रभिंगाचे आकारमान स्नायूंच्या दाबाने कमी-जास्त होते. त्यामुळे या प्राण्यांना एखादया वस्तूचे चित्र दिसते. बिळात राहणारे सरडे व सापांना चित्र स्वच्छ दिसत नाही अंधुक दिसते. दिनचर जातींमध्ये चित्र जास्त स्पष्ट दिसते कारण त्यांच्या डोळ्यांचे आकारमान मोठे असते.

श्रवण: मगर, सरड्याच्या अनेक जातींमध्ये श्रवणशक्ती चांगली विकसित झालेली असते. सरीसृपांमध्ये बाह्यकर्ण, मध्यकर्ण, आंतरकर्ण, असे तीन भाग असतात. बाह्यकर्ण कर्णपटलाच्या स्वरूपात असतो. सापांमध्ये बाह्यकर्ण व गसनी कर्णनलिका नसते. साप हवेच्या कंपनांपेक्षा जमिनीच्या कंपनांव्दारे आवाज गहण करतात. मोठया आवाजाचा सापावर फारसा परिणाम होत नाही. आवाज करणाऱ्या वस्तूने हालचाल केल्यास सापाला धोक्याची जाणीव होते. बिळात राहणारे सरडे जमिनीच्या कंपनांव्दारे आवाज ऐकू शकतात.

घाणेंद्रिय : सरीसृपांमध्ये नासीय कप्पा हे गंधेंद्रिय असून त्याच्यामार्फत वासाची संवेदना कळते. ते बाहेरील बाजूस नासीय छिद्र म्हणून उघडतात, तर आतील बाजूस मुखगुहिकेत उघडतात. नासीय कप्प्यात असणाऱ्या कोशिकांमुळे (पेशींमुळे) वास ओळखता येतात.

याकॉबसन अवयवाची एक जोडी नासीय कप्प्यात असते. ते मुखगुहिकेत नलिकेच्या साहाय्याने उघडतात. या अवयवामुळे अन्नाचा वास व त्याची चव समजते. साप व सरडयासारख्या प्राण्यांत या अवयवाचा जास्त विकास झालेला आहे. तीव कंपने वा तीव वास आल्यास साप त्याची जीभ सतत आत-बाहेर काढीत असतो. प्रत्येक वेळी जीभ याकॉबसन अवयवास स्पर्श करते. जिभेला चिकटलेले रसायनाचे कण तोंडात घेतले जातात. यामुळे सापाला अन्न कोणत्या दिशेला आहे ते समजते. सरीसृपांमध्ये या अवयवाचा उपयोग भक्ष्य शोधण्यासाठी, शत्रू ओळखण्यासाठी आणि प्रजननाकरिता जोडीदार निवडण्यासाठी होतो.


 जनन तंत्र : सर्वसाधारणपणे सरीसृप अंडी घालतात. अंडयाच्या निषेचनानंतर नवीन प्राण्याची उत्पत्ती होते. यावरून हे प्राणी अंडज आहेत. ते एकलिंगी प्राणी असून प्रजोत्पादन लैंगिक प्रकाराने होते. नरामध्ये देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस लंबगोल वृषणे असतात. यांत शुकाणू तयार होतात. प्रत्येक वृषणापासून शुकनलिका निघते. तिच्यातून शुकाणूचे वहन होते. दोन्ही बाजूंच्या शुकनलिका एकत्र येऊन त्यांतील रेत मूत्रनलिकेत सोडले जाते. ती नलिका अवस्करामध्ये असलेल्या मैथुनांगामध्ये उघडते. नर मिलनाच्या वेळी मादीच्या अवस्करात रेत सोडतो.

मादीमध्ये देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस अंडाशय असतात. यांमध्ये अंडी तयार होतात. अंडाशयाच्या बाजूस अंडनलिका असतात. अंडनलिका अवस्करात उघडतात.

मिलन : गोडया पाण्यातील नर कासव मादीला अडवितो, नर पुढच्या पायाच्या नख्या मादीच्या डोक्यावर आपटतो. मादीने प्रतिसाद दिल्यावर तो मादीच्या पाठीवर मागून बसतो, मादीला पायांनी पकडतो व दोघांचे मिलन होते. मगरीमध्ये मिलन पाण्यात होते. नर मादीची मान पकडतो, मादीच्या पाठीवर बसतो व दोघांचे मिलन होते. सरडयामध्ये नराच्या घशाच्या दोन्ही बाजूंस रंगाचे ठिपके तयार होतात. ते निळे, नारंगी, तांबडे किंवा काळ्या रंगाचे असतात. नर प्रतिसाद देणाऱ्या मादीच्या पाठीवर बसतो व मिलन होते. सापामध्ये नर आणि मादी जमिनीवर आडवी पडलेली असतानाच त्यांचे मैथुन होते. नागराजामध्ये नर प्रतिसाद देणाऱ्या मादीवर बसतो. तो सतत जीभ आत-बाहेर काढतो. मादी डोके उचलते व फणा काढते. त्यांचे मिलन सु. दोन तास चालते.

मादीच्या शरीरात अंडयाचे फलन होते. मादी फलनानंतर सुरक्षित ठिकाणी अंडी घालते. अंडयामध्ये गर्भाची वाढ होते. या प्राण्यांमध्ये गर्भाची वाढ अंडयातील पीतकावर होते. काही सरीसृप प्राणी जरायुज (पिलाला जन्म देणारे) आहेत.

अंडयांची संख्या व आकारमान : सरीसृपांमध्ये एकपासून दोनशेपर्यंत अंडी घातली जातात. मगराची मादी २०-७० अंडी घालते. कासवाची मादी २०० अंडी घालते. अमेरिकेत आढळणाऱ्या बॅन्डेड रॉक लिझार्ड या सरडयाची अंडी १ सेंमी. लांबीची असतात. कोमोडो ड्रगन सरडयाची व भारतीय अजगराची अंडी ११·२५ सेंमी. लांबीची असतात. अंड्यांची संख्या प्राण्याच्या जातीवर व त्यांच्या आकारमानावर अवलंबून असते.

सरीसृपांमध्ये घरटे तयार करण्याचे काम मादी करते. मादी सुरक्षित जागा बघून अंडी घालते. कासवाची मादी वाळूमध्ये मागच्या पायाने खड्डा तयार करून त्या खड्डयात अंडी घालते व अंड्यांवर वाळू टाकून ती झाकते. मगराची मादी नदीच्या काठावर खड्डा तयार करते. त्या खड्डयात अंडी घालते व ही अंडी झाडाच्या फांदया, काटक्या यांच्या साहाय्याने दडविते. नागराजाची मादी बांबूची पाने, काटक्यांचा वापर करून शंक्वाकार घरटे तयार करते व त्यात अंडी घालते.

अंडी उबविणे : मगरीमध्ये (अमेरिकन ॲलिगेटर) अंडयातून ६३ दिवसांनी पिले बाहेर पडतात. यूरोपियन व्हायपर सापामध्ये हा कालावधी ६०-९० दिवसांचा आहे. भ्रूणाची वाढ होण्याकरिता अंडयाला उष्णता पोहोचविणे आवश्यक असते. अंडयांना किती काळ उष्णता मिळाली यावर पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधी अवलंबून असतो. समुद्रातील कासवामध्ये ३०-७५ दिवसांत अंडयातून पिले बाहेर पडतात.

मगराची मादी अंडी घातलेल्या ठिकाणाच्या जवळ राहते व त्यांचे संरक्षण करते. सरडयामध्ये मादी अंडी घातलेल्या ठिकाणास वारंवार भेट देते. अजगराची मादी स्वतःच्या अंगातील उष्णतेने अंडी उबविते. नाग, मण्यार, नागराज या जातीचे साप अंडयातून पिले बाहेर पडेपर्यंत अंडयाच्या जवळपास राहतात. अंडयातील पिलांची पूर्ण वाढ झाली की, ती अंडयाचे कवच फोडून त्यांतून बाहेर पडतात. पिले अंडयांतून बाहेर पडताच मादी त्यांना सोडून निघून जाते. साधारणपणे पिले आठवडाभर एकत्रित राहतात व नंतर वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात.

वाढ व जीवनकाल : सुरूवातीच्या काळात सरीसृपांची वाढ वेगाने होते. नंतर वाढीचा वेग मंदावतो. या प्राण्यांमध्ये आयुष्यभर वाढ होत असते. अमेरिकन मगरीची पहिल्या वर्षाच्या अखेरीस लांबी ६० सेंमी. व वजन १·८ किगॅ. असते. सहाव्या वर्षी तिची लांबी १९० सेंमी. व वजन ३६ किगॅ. होते. रेड डायमंड रॅटल स्नेक या सापाच्या पिलाची लांबी ३० सेंमी. असते. पहिल्या वर्षाच्या अखेरीस ती ६५ सेंमी. होते व दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस ती ८५ सेंमी. होते. पिलांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. नंतरच्या वर्षात मृत्यूचे प्रमाण बरेच कमी होते. नैसर्गिक परिस्थितीत कोणता प्राणी किती वर्षे जगतो हे सांगणे कठीण आहे. नैसर्गिक वस्तीस्थानात राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा बंदीवासात राहणारे प्राणी जास्त जगतात. बंदीवासातील मगरी ५० वर्षे जगतात व अजगर २० वर्षे जगतात.

सरीसृपांचा पूर्वेतिहास : सु. २८ कोटी वर्षांपूर्वी पुराजीव महाकल्पाच्या शेवटच्या काळात सरीसृप पृथ्वीवर निर्माण झाले. मध्यजीव महाकल्पात म्हणजेच २२·५-७ कोटी वर्षांपूर्वीचा कालावधी या प्राण्यांचा सुवर्णकाल होता, असे म्हणता येईल. (भूवैज्ञानिक महाकल्प, कल्प इत्यादींच्या काळासाठी ‘पुराजीवविज्ञान’ ही नोंद पहावी). या महाकल्पात मुबलक अन्न, भरपूर पाणी, स्वच्छ हवा आणि इतर जातींच्या प्राण्यांचा अजिबात विरोध नाही अशा अनुकूल परिस्थितीमुळे या प्राण्यांची संख्या अगणित झाली. डायनोसॉरासारखे प्रचंड आकारमानाचे सरीसृप या काळात पृथ्वीवर वावरत होते. त्यांपैकी काही शाकाहारी, काही मांसाहारी, काही कीटकभक्षी तर काही सर्वभक्षी होते. ते जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांत सर्वश्रेष्ठ ठरले. काही सरीसृप जमिनीवर, काही वृक्षावर व काही हवेत संचार करू लागले. काही बोजड शरीराचे सरीसृप पाण्यात राहू लागले. अशा रीतीने सरीसृपांत वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची क्षमता निर्माण झाली : (१) हवेत संचार करणारे सरीसृप चिमणीच्या आकारमानापासून ते प्रचंड आकारमानाचे होते. त्यांच्या पुढच्या पायांवर असलेल्या विशिष्ट कातडी पडदयामुळे पायांचा पंखासारखा उपयोग करून हे प्राणी हवेत उडू शकत असत. (२) जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी कासव, सुसर यांसारखे प्राणी रहात होते. (३) प्लेसिओसॉरस, इक्थिओसॉरस यांसारखे प्राणी फक्त पाण्यात संचार करीत. त्यांना माशासारखे पोहता येत असे. (४) कॉटिलोसॉरस आणि पेलिकोसॉरस यांसारखे प्राणी जमिनीमध्ये बिळे करून रहात असत.

पुराजीवविज्ञानाच्या आधारे आजपर्यंत सापडलेल्या जीवाश्मांवरून (शिलाभूत जीवावशेषांवरून) सरीसृपांचे १६ निरनिराळ्या गणांमध्ये वर्गीकरण केले आहे. मध्यजीव महाकल्पाच्या शेवटच्या काळात या प्राण्यांवर मोठे संकट आले. त्यांच्या अगणित संख्येमुळे परस्परांतील अन्न आणि निवारा यांसाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे त्यांच्यापैकी अवजड आणि प्रचंड आकारमानाचे लहान मेंदू असणारे व भोवतालच्या वातावरणाशी जुळवून न घेणारे प्राणी नष्ट झाले. त्यांच्यापैकी नैसर्गिक निवडीमध्ये जे राहिले तेच नंतर पृथ्वीवर जगू शकले. यांपैकी फक्त चार उपवर्गांतील प्राणी महत्त्वाचे आहेत उरलेले नामशेष झाले. त्या चार उपवर्गांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : (१) ॲनॅप्सिडा, (२) पॅरॅप्सिडा, (३) डायॉप्सिडा, (४) सिनॅप्सिडा. सरीसृपाचा मेंदू शरीराच्या आकारमानानुसार न वाढता लहान आकारमानाचा राहिला. त्यामुळे बौद्धीक दृष्टया हे प्राणी मागे पडले, म्हणून पृथ्वीवर पक्षी आणि सस्तन प्राणी निर्माण झाल्यावर सरीसृपांची निसर्गात पिछेहाट होऊन त्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्या.


सरीसृप प्राणिवर्गाचा उदय आणि विकास : सु. ३५-२७ कोटी वर्षांपूर्वी कार्बॉनिफेरस कल्पात पृथ्वीवर दलदलीच्या भागात नेचे या वनस्पतींची दाट जंगले होती. कालांतराने या जंगलांचे नैसर्गिक पद्धतीने कोळशात रूपांतर झाले. जंगलात जे प्रचंड जलाशय होते त्यांत विविध जातींचे उभयचर प्राणी रहात असत. कार्बॉनिफेरस कल्पाच्या आधी असलेल्या डेव्होनियन कल्पात असणाऱ्या कॉसोप्टेरिजी जातीच्या माशापासून हे उभयचर निर्माण झाले होते. या उभयचरांपैकी लॅबिंथोडोंशिया या जातीचे उभयचर प्रामुख्याने आढळत होते. या उभयचरांचे दात घडया पडल्यासारखे दिसत म्हणून त्यांना हे नाव दिले आहे. हे प्राणी निरनिराळ्या आकारमानाचे आणि रूपांचे होते. काही प्राणी सुसरीसारख्या प्रचंड आकारमानाचे होते, तर काही सॅलॅमँडरासारख्या लहान आकारमानाचे होते. काही जातींचे प्राणी जमिनीवर तर काही जातींचे जमिनीवर आणि पाण्यात रहात होते.

लॅबिंथोडोंशिया प्राणी कार्बॉनिफेरस आणि पर्मियन कल्पांमध्ये प्रामुख्याने पृथ्वीवर वावरत होते परंतु ट्रायासिक कल्पाच्या शेवटी हे प्राणी नष्ट होऊन दुर्मिळ होऊ लागले. या प्राण्यांपासूनच सरीसृप वर्गातील सैमुरिया या प्राण्यांची निर्मिती झाली. हे प्राणी सॅलॅमँडरासारखे दिसत. त्यांच्या शरीराची लांबी ६० सेंमी. होती. या प्राण्याला सरीसृप वर्गीय प्राण्यांचा पूर्वज मानण्यात येते, कारण उभयचर आणि सरीसृप या दोन्ही वर्गांतील प्राण्यांची लक्षणे या प्राण्यांत आढळून येतात. सैमुरिया व उभयचर प्राणी यांच्या कंकाल तंत्रात खूप साम्य असल्याने या प्राण्यांचा समावेश प्राणिशास्त्रज्ञांनी उभयचर प्राण्यांमध्ये केला होता. सैमुरिया प्राण्यांच्या अंडयाच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर या प्राण्यांचा समावेश सरीसृपांत करण्यात आला. आता हा प्राणी उभयचर व सरीसृप या दोन्ही वर्गांतील दुवा सांधणारा प्राणी समजला जातो.

कॉटिलोसॉरस हे प्राणी कार्बॉनिफेरस कल्पात निर्माण झाले. त्यांचा विकास व वाढ पर्मियन कल्पात झाली. ट्रायासिक कल्पात सरीसृपांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली. प्रेसिओसॉरस हे जमिनीवर राहणारे पहिले सरीसृप असावेत. सरीसृपांचा उदय झाल्यावर सुरूवातीला या प्राण्यांची संख्या अत्यंत कमी होती परंतु कालांतराने त्यांच्या संख्येत व प्रकारांत वाढ होत गेली.

सरीसृपांचे प्रमुख चार उपवर्ग :ॲनॅप्सिडा : या उपवर्गात उभयचर प्राण्यांसारखे दिसणारे प्राणी आणि कासवे यांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या कवटीवर शंखक रिक्ती (कवटीतील छिद्रे) नसते. या उपवर्गातील सैमुरिया हे प्राणी सध्या अस्तित्वात नाहीत. ते नष्ट झाले आहेत. यामध्ये दोन गणांचा समावेश होतो.

कॉटिलोसॉरिया : हे प्राणी लॅबिंथोडोंट उभयचर प्राण्यांसारखे असून ते सध्या अस्तित्वात नाहीत. त्यांची कवटी पुष्कळदा दबलेली (खोलगट) असून माथा उभयचर प्राण्याप्रमाणे सलग असतो. त्यांना सरीसृपांचे पूर्वज समजले जाते. ते कार्बॉनिफेरस काळात निर्माण झाले व ट्रायासिक कल्पाच्या शेवटी नष्ट झाले. उदा., सैमुरिया.

किलोनिया : या गणामध्ये काही नष्ट झालेल्या तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या जातींचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये पाठीवर कठीण कवच व पोटाकडील हाडे एकमेकांस घट्ट जोडल्याने पेटी तयार होते. या प्राण्यांना दात नसतात. ते अंडज प्राणी आहेत. उदा., समुद्र कासवे (टेस्ट्यूडो), गोडया पाण्यातील कासवे (टर्टल) इत्यादी.

पॅरॅप्सिडा :या उपवर्गातील प्राण्यांच्या कानशिलांच्या (शंखक) भागात एक शंखक रिक्ती असते. हे प्राणी सध्या अस्तित्वात नाहीत. नष्ट झालेल्या प्राण्यांच्या जीवाश्मांच्या परीक्षणावरून हे प्राणी पाण्यात व जमिनीवर रहात होते, असे दिसते. या उपवर्गात तीन गणांचा समावेश होतो.

प्रोटोसॉरिया : हे प्राणी पर्मियन ते ट्रायासिक या कल्पात अस्तित्वात होते. ते सरडयासारखे लहान, जमिनीवर राहणारे होते. उदा., आर्कीओस्केलीस.

प्लेसिओसॉरिया : हे प्राणी ट्रायासिक ते किटेशस या कल्पात अस्तित्वात होते. ते पाण्यात राहणारे प्राणी असून त्यांची लांबी सु. १२·१९ मी. इतकी होती. उदा., प्लिओसॉरस, प्लेसिओसॉरस.

इक्थिओसॉरिया : हे प्राणी ट्रायासिक ते किटेशस या कल्पात अस्तित्वात होते. ते समुद्रात राहणारे, माशासारखे प्राणी होते. त्यांना मान नव्हती. त्यांचे पाय वल्ह्यासारखे होते. शेपटी लांब होती उदा., इक्थिओसॉरस, मिक्सोसॉरस.

डायॉप्सिडा : या उपवर्गात अनेक नष्ट झालेल्या तसेच अस्तित्वात असलेल्या सरीसृपांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या कानशिलांच्या (शंखक) भागात दोन शंखक रिक्ती असतात. या उपवर्गात खालील गणांचा समावेश होतो.

ऱ्हिंकोसेफॅलिया : हे सरडयासारखे सरीसृप आहेत. त्यांच्या अंगावर खवले असून त्यांची मान आखूड असते. त्यांचे पाय काहीसे दुर्बल असून मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा किंचित लांब असतात. त्यांचे मणके सामान्यत: दोन्ही बाजूंनी अंतर्गोल आणि नेत्रकोटरे व शंखक रिक्ती काहीशा मोठया असतात. त्यांचे दात अगदंती (हाडावरील उंचवटयच्या माथ्याला सांधलेल्या) स्वरूपाचे असतात. उदा., स्फेनोडॉन.

स्क्वॅमेटा : या प्राण्यांचे मणके पश्चगर्ती (कशेरूककाय मागील बाजूस अंतर्गोल असलेले) व क्वचित दोन्ही बाजूंनी अंतर्गोल असतात. काहींमध्ये त्वचीय अस्थिमय खवले वा प्रशल्क असतात. शेपटी लांब असून सापासारखे प्राणी वगळता इतरांना पाच बोटे असणाऱ्या पायांच्या दोन जोडया असतात. या गणांमध्ये दोन उपगणांचा समावेश होतो.

(अ) उपगण लॅसर्टीलिया : या उपगणातील प्राण्यांचे शरीर लांबट असून पायांच्या दोन जोडया असतात. डोळ्यांच्या पापण्या हालचाल करणाऱ्या असतात. या प्राण्यांमध्ये मैथुनांग असते. उदा., ड्रको, घोरपड, सरडगुहिरा, यूरोमॅस्टिक्स इत्यादी.

(आ) उपगण ऑफीडिया : या उपगणातील प्राण्याच्या कवटीवर शंखक भागात शंखक रिक्ती नसतात. जबत उदा., अजगरडा मोठा असतो. कर्णपटल व निमेषक पटल नसते. जीभ लांब व दोन भागांत विभागलेली असते. मैथुनांग दोन असता, नाग, नागराज इत्यादी.

क्रोकोडिलिया : या गणातील प्राणी पाण्यात राहणारे व मोठया आकारमानाचे असतात. यांच्या शरीरावर खवले किंवा अस्थिपट्ट असतात. हृदयात चार कप्पे असतात. देहगुहेत मध्यपटल असते. पायांच्या दोन जोडयांचा उपयोग हालचालीसाठी होतो. ते जमिनीवर अंडी घालतात. त्यांचे अगत्रिकास्थीय मणके अगगर्ती असतात. उदा., मगर, गेव्हिॲलिस, ॲलिगेटर.

स्यूडोसुकिया, सॉरिशिया, ऑर्निथिशिया, टेरोसॉरीया हे गण नष्ट झालेल्या प्राण्यांचे आहेत.


 स्यूडोसुकिया : हे प्राणी ट्रायासिक कल्पात अस्तित्वात होते. ते आकारमानाने लहान व मांसाहारी होते. त्यांचे पुढचे पाय आखूड व मागचे पाय लांब बळकट होते. ते मागच्या पायांनी हालचाल करीत. या प्राण्यांचे मुस्कट आखूड असून जबड्यांच्या कडांशी खळग्यात रोवलेले दात असत. यांचे त्वचीय चिलखत चांगले विकसित झालेले होते. उदा., एटोसॉरस.

सॉरिशिया : या गणातील प्राणी ट्रायासिक कल्पात निर्माण झाले व किटेशस कल्पात नष्ट झाले. या गणात शाकाहारी व मांसाहारी डायनोसॉर जातींचा समावेश होतो. या प्राण्यांचे दात लांब, दंडगोलाकार आणि धारदार कडांचे होते. मानेतील व पृष्ठीय मणके पश्चगर्ती होते. पायांची हाडे जवळजवळ भरीव होती. सर्व पायांना पाच बोटे होती. या प्राण्यांचे आकारमान सामान्यत: मोठे होते. उदा., टायरॅनोसॉरस, डिप्लोडोकस, बॅकिओसॉरस.

ऑर्निथिशिया : या गणातील डायनोसॉर शाकाहारी व सामान्यत: मोठया आकारमानांचे होते. काही प्राण्यांमध्ये पक्ष्यासारखी चोच असावी. मणके पश्चगर्ती, दोन्ही टोके सपाट असलेले किंवा दोन्ही बाजू अंतर्गोल असलेले होते. कवटी हाडांची बनलेली असे. पाय भरीव किंवा कधीकधी पोकळ होते. काहींमध्ये त्वचीय चिलखत चांगले विकसित झालेले होते. या गणातील काही प्राणी द्विपाद होते. त्यांना लांब व बळकट शेपटी होती. उदा., इग्वॅनोडॉन, स्टेगोसॉर, ट्रायसेरॅटॉप्स, अँकिलोसॉर.

टेरोसॉरिया : या गणातील प्राणी दात असणारे व हवेत संचार करणारे होते. त्यांची हाडे पोकळ होती. त्यांचे दात बारीक, तीक्ष्ण अणकुचीदार व जबडयांच्या कडांशी खळग्यांत रोवलेले असत. अगत्रिकास्थीय मणके अगगर्ती व शेपटीतील मणके दोन्ही बाजूंनी अंतर्गोल होते. पुढच्या पायांचे पंखासारख्या संरचनेत परिवर्तन झालेले होते. मागील पाय डायनोसॉरांप्रमाणे होते. मागील पायांच्या बोटांना नख्या होत्या. काही प्राण्यांना लांब शेपटी होती. उदा., टेरोडॅक्टीलस, ऱ्हृँफोऱ्हिंकस.

सिनॅप्सिडा : या उपवर्गातील प्राण्यांच्या कानशिलांच्या (शंखक) भागात एक शंखक रिक्ती असते. ते सस्तन प्राण्यांसारखे दिसणारे परंतु सरीसृप प्राणी आहेत. या प्राण्यांमध्ये दातांचे कृंतक, सुळे, उपदाढा व दाढा असे प्रकार असतात. हे प्राणी पर्मियन ते ट्रायासिक कल्पात अस्तित्वात होते. या उपवर्गात तीन गणांचा समावेश होतो.

पेलिकोसॉरिया : हे प्राणी कार्बॉनिफेरस व पर्मियन कल्पात अस्तित्वात होते. त्यांची कवटी लांब-रूंद व कधीकधी बाजूने दबलेली असते. शेपटी लांब असते. मणक्याची काटयासारखी वाढ झालेली असते. उदा., डायमेट्रॉडॉन.

थेरॅप्सिडा : या प्राण्यांत सस्तन प्राण्यांची अनेक वैशिष्टये आढळतात. या प्राण्यांमध्ये दातांचे कृंतक, सुळे, उपदाढा व दाढा असे प्रकार असतात. पाय स्तनी प्राण्यांसारखे असतात. उदा., बिक्यानोडॉन, इस्ट्रॉडॉन.

इक्टिडोसॉरिया : हे प्राणी आकारमानाने लहान होते. कवटीचे व सांगाडयाचे घटक भाग यांबाबत या प्राण्यांचे सस्तन प्राण्यांशी साम्य आढळते. हे प्राणी उभयचर व सस्तन प्राणी यांच्यामधील दुवा ठरतात. उदा., ट्रिटिटोडॉन.

मानव व सरीसृप प्राणी : बहुतेक सरीसृप प्राणी मानवाला उपयुक्त आहेत. ते शेतातील पिकांवरील किडीचे नियंत्रण करण्यासाठी मदत करतात. सागरी कासवापासून चविष्ट सूप तयार करतात. गोडया पाण्यातील अनेक प्राण्यांचा उपयोग अन्न म्हणून करतात.

विषारी साप चावल्याने दरवर्षी हजारे माणसांचा मृत्यू होतो, त्यामुळे या प्राण्यांबाबत फारच गैरसमज आहेत. सरीसृप प्राण्यांच्या कातडीपासून बॅगा, पर्स, पट्टे, बूट, हातमोजे तसेच शोभेच्या वस्तू तयार करतात. मगर, घोरपड, साप यांच्या कातडीला असलेल्या मागणीमुळे या प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

सरीसृप जीवाश्म : नामशेष झालेले सरीसृप एकंदर सरीसृप वर्गाचा मोठा भाग असून जीवाश्मांत संरचनात्मक विविधता मोठया प्रमाणावर दिसून येते. सरीसृपांचे बहुसंख्य जीवाश्म जमिनीवरील प्राण्यांचे आहेत काही जलचर आहेत, तर काही उडणारे असून या जीवनप्रणालीला अनुसरून त्यांच्या पायांमध्ये परिवर्तन झालेले आहे. सरीसृप पूर्वपर्मियन कल्पात अवतरले आणि बहुतेक मध्यजीव कल्पात पृष्ठवंशीं पैकी प्रमुख प्राणी होते. त्यांच्यापैकी बहुतेक किटेशसच्या अखेरीस निर्वंश झाले. ॲलिगेटर, साप, मगरी व सरडे यांसारखे थोडेच प्राणी आता हयात आहेत.

कॉटिलोसॉरिया : हे जमिनीवरचे सर्वांत आदिम सरीसृप आहेत. यांचा काळ पूर्वपर्मियन ते ट्रायासिक असा असून त्यांचे जीवाश्म दक्षिण आफ्रिका, यूरोप, उत्तर अमेरिका येथील पर्मियन कालीन खडकांत आढळले आहेत. पेलिकोसॉरिया हा सरडयासारख्या सरीसृपांचा छोटा गट आहे. यांचे जीवाश्म उत्तर अमेरिकेत व क्वचित यूरोपात आढळले आहेत.

इक्थिओसॉरिया गण : (इक्थिओप्टोरिजिया गण). हा आदिम सागरी सरीसृपांचा गण आहे. या प्राण्यांच्या श्रोणी व वक्षीय कमानी बळकट होत्या. त्यांना अंतर्गोल मणके होते. पायांचे परिवर्तन वल्ह्यांसारख्या अवयवांत झालेले होते. पायांची हाडे आखूड व बळकट असत. या प्राण्यांचे अनेक सांगाडे सापडले आहेत. दक्षिण भारतात उत्तर किटेशस कालीन अरियाळूर मालेच्या खडकांत इक्थिओसॉरसाचे जीवाश्म आढळले आहेत. प्लेसिओसॉरिडी कुलाचे जीवाश्म जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया, इंग्लंड व उत्तर अमेरिका या प्रदेशांत आढळले आहेत. भारतामध्ये कच्छमधील उत्तर जुरासिक ते पूर्वकिटेशस कालीन ऊमिया मालेतील खडकांत प्लेसिओसॉरस प्रजातीचे जीवाश्म सापडले आहेत.

किलोनिया गण : हा गण उत्तर ट्रायासिकमध्ये अवतरला असला, तरी उत्तर जुरासिक काळापासूनचे त्याचे जीवाश्म उत्तर अमेरिकेत व यूरोपात आढळले आहेत. मोठया आकारमानाच्या जीवाश्मांपैकी अर्किलॉन इश्विरॉस या डाकोटातील (अमेरिका) किटेशस कालीन जीवाश्माची लांबी सु. २ मी. होती, तर पंजाबमधील शिवालिक शैलसमूहातील कोलायसोकीलिस ॲटलास ची लांबी २ मी. पेक्षा जास्त होती.

ऱ्हिंकोसेफॅलिया : या गणातील प्राणी सरडयासारखे असून ते ट्रायासिक कालीन आहेत. या गणात आखूड व रूंद कवटी असलेले आणि तुंड चोचीप्रमाणे पुढे आलेले प्राणी आहेत. उदा., स्फेनोडॉन. या प्राण्यांचे जीवाश्म यूरोप व भारतात गोंडवनभूमीत तसेच दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, मादागास्कर इ. प्रदेशांत सापडले आहेत. भारतात गोदावरी खोऱ्यातील उत्तर ट्रायासिक कालीन मालेरी खडकांच्या थरांमध्ये हायपेरॅडॅपेडॉन, पॅराडॅपेरॉन व पॅरासुचस या प्रजातींचे जीवाश्म आढळले आहेत.


 स्क्वॅमेटा : या गणात लॅसर्टीलिया व ऑफीडिया या उपगणांचा समावेश होतो. यांचे उत्तर मायोसीन कालीन जीवाश्म पिकेर्मी (ग्रीस) येथे व भारतातील उत्तर शिवालिक संघात आढळले आहेत. लॅसर्टीलियांचे आकारमान मोठे होते. मॅगॅलोनियन प्रिस्का या सरडयाची लांबी ५ मी. पेक्षा जास्त होती. पॅचिऑप्सिस हा यूगोस्लाव्हियातील पूर्व किटेशस कालीन जीवाश्म ऑफीडिया उपगणाचा सर्वांत जुना जीवाश्म आहे. भारतात पंजाबमधील प्लायोसीन कालीन शिवालिक शैलसमूहात पायथॉन मोलुरस हा जीवाश्म सापडला आहे. विषारी सापांचा सर्वांत जुना जीवाश्म मॉसबाख बायाबिख येथील मायोसीन कालीन प्रोव्हायरा हा आहे.

स्यूडोसुकिया : हे जमिनीवर राहणारे सरडयासारखे लहान प्राणी होते. त्यांची लांबी १ मी. होती. त्यांचे जीवाश्म दक्षिण आफ्रिका, यूरोप, उत्तर अमेरिका व इंग्लंड या भागांतील ट्रायासिक निक्षेपांत आढळले आहेत. नोटोकँप्सा व पेडेटिकोसॉरसमध्ये वक्षीय आढळते. यांचे जीवाश्म दक्षिण आफ्रिकेतील पूर्व जुरासिक कालीन स्टॉर्मबर्ग थरामध्ये आढळले आहेत. क्रोकोडिलिया गण पॅरासुचियापासून उदयास आल्याचे मानले जाते. गेव्हिॲलिडी कुलातील प्राण्यांचे तुंड लांब व निमुळते असून जबड्यांच्या प्रत्येक बाजूला २५-३५ दात असतात. भारत व म्यानमार या देशातील तृतीय ते रीसेंट काळातील खडकांत या कुलाचे जीवाश्म आढळले आहेत. शिवालिक शैलसमूहात आढळलेल्या ऱ्हॅपोसुचस कॅसिडेन्स या राक्षसी प्राण्याची लांबी १५ मी. होती. भारतात शिवालिक शैलसमूहांमध्ये गेव्हि-ॲलिसऱ्हॅपोसुचस या प्रजातीतील प्राण्यांचे जीवाश्म सापडले आहेत.

डायनोसॉर : यांचे सर्वांत पुरातन जीवाश्म ट्रायासिक निक्षेपांतील असून त्यांच्या पायांची रचना व पावलांचे ठसे यांवरून ते द्विपाद होते आणि त्यांच्या दातांवरून ते मांसाहारी होते असे दिसून येते. सॉरोपोडा व ऑर्थ्रोपोडा या उपगणांचे जुरासिक व किटेशस काळातील प्राणी शाकाहारी होते. डायनोसॉरांचे जीवाश्म प्रथम इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या प्रारंभी सापडले. डायनोसॉराचा पहिला संपूर्ण सांगाडा इंग्लंडमधील वीडेन निक्षेपांत आढळला, तो इग्वॅनोडॉनाचा होता. जर्मनीतील ट्रायासिक कालीन पुष्कळ निक्षेपांत डायनोसॉरांच्या आदिम प्रजातींचे जीवाश्म सापडले आहेत. उत्तर अमेरिकेत मध्यजीव कालीन सर्व निक्षेपांत डायनोसॉरांचे जीवाश्म आढळले आहेत. डायनोसॉर ट्रायासिकमध्ये अवतरले, जुरासिक व किटेशस काळांत त्यांचा विकास झाला. किटेशसच्या अखेरीस ते निर्वंश झाले. त्यांचे जीवाश्म दक्षिण आफ्रिका, मादागास्कर, भारत, चीन, बाझील, यूरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका या भागांत आढळले आहेत. मध्य प्रदेशातील उत्तर किटेशस कालीन खडकात डायनोसॉराच्या अंटार्क्टोसॉरस, टिटॅनोसॉरसलाप्लेटासॉरस या प्रजातींचे, तर दक्षिण भारतात अरियाळूर मालेत टिटॅनोसॉरस प्रजातीचे जीवाश्म सापडले आहेत. ऑर्निथिशिया या शाकाहारी डायनोसॉराचे जीवाश्म अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, हंगेरी, मंगोलिया इ. प्रदेशांतील उत्तर जुरासिक व किटेशस काळातील खडकांत आढळले आहेत. टेरोसॉरियांचे जीवाश्म सागरात व नदीमुखांच्या भागात साचलेल्या निक्षेपांत आढळतात. त्यांचे जीवाश्म जर्मनी, बव्हेरिया, इंग्लंड व पूर्व आफ्रिका या प्रदेशांतील जुरासिक काळातील खडकांत आढळले आहेत.

पहा : अजगर ॲनॅकाँडा कासव घोरपड डायनोसॉर ड्रको नाग नागराज पुराप्राणिविज्ञान मगर सरडगुहिरा सरडा.

संदर्भ : 1. Colbert, Edwin H. Evolution of the Vertebrates, New Delhi, 1990.

              2. Daniel, J. C. The Book of Indian Reptiles, Bombay, 1983.

              3. Saxena, O. P. Modern Textbook of Reptilia, New Delhi, 1981. 

              4. Singh, Gurdarshan Bhaskar, H. Advanced Chordate Zoology, Vol. III, New Delhi, 2002.

रानडे, द. र. पाटील, चंद्रकांत प.