नानेटी : हा वृक्षसर्पांपैकी एक असून कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या डिप्सॅडोमॉर्फिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव ड्रायोफिस मिक्टेरिझान्स असे आहे. ड्रायोफिस या वंशाच्या सहा-सात जाती भारतात आढळतात. सबंध भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश आणि थायलंडमध्ये हा आढळतो. जंगलात आणि डोंगराळ प्रदेशांत १,८३० मी. उंचीपर्यंत तो आढळतो.

याची लांबी साधारणपणे १५० सेंमी. असते, पण यापेक्षाही जास्त लांबीचे नमुने आढळतात. शरीर अतिशय सडपातळ असून शेपटू इतर सापांच्या शेपटापेक्षा सापेक्षतेने जास्त लांब असते; शरीराच्या एकंदर लांबीच्या एक तृतीयांशापेक्षाही कधीकधी त्याची लांबी जास्त भरते. डोके बरेच लांबट असून मानेजवळ रुंद व पुढे बरेच निमुळते होत गेलेले असते; मुस्कटावर लांबट व मांसल उपांग (अवयव) असून ते चोचीसारखे दिसते; हे या सापाचे विशेष लक्षण समजता येईल. डोळे मोठे असतात, बाहुली आडवी व लांब असून तिच्या भोवतालचा पडदा सोनेरी असतो. तोंड आतून गुलाबी असते; जीभ गुलाबी पण तिची टोके पांढरी असतात. पाठीचा रंग पानांच्या रंगाप्रमाणे हिरवा असून पोटाचा हिरवा रंग फिका असतो. पोटाच्या प्रत्येक बाजूवर पांढरा किंवा निळसर बारीक पट्टा असतो.

हा दिवसा हिंडणारा साप असून झाडाझुडपांमध्ये तो नेहमी दिसतो. उंच झाडांवर तो सहज चढतो. नारळीच्या शेंड्यावर तो अनेकदा दृष्टीस पडतो; त्याच्या संरक्षक हिरव्या रंगामुळे झाडांवर तो लवकर दिसून येत नाही. हा साप फार चपळ आहे. शेपटीने झाडाच्या फांदीला घट्ट विळखे घालून तो आपल्या शरीराचा पुढचा भाग लोंबत ठेवतो आणि तो निरनिराळ्या बाजूंना हालवून भक्ष्यांची टेहळणी करीत असतो. या स्थितीत तो एखाद्या लोंबत्या वेलासारखा दिसतो. यामुळे एखादा बेसावध पक्षी किंवा सरडा त्याच्या तडाख्यात सापडतो. सामान्यतः उंदीर, सरडे व पक्षी खाऊन हा राहतो; पण कधीकधी बेडूक आणि इतर सापदेखील तो खातो.

भारतातील आणि श्रीलंकेतील पुष्कळ लोकांची अशी समजूत आहे की, माणसाच्या डोळ्यावर प्रहार करून तो चावतो; इतर कोणत्याही भागाला तो चावत नाही. महाराष्ट्रात ही अशी एक समजूत प्रचलित आहे की,  हा साप माणसाच्या टाळूला चावतो. भीती दाखविण्याकरिता हा आपले शरीर फुगवतो, डोके वर उचलतो व आ वासतो; या स्थितीत तो भयानक दिसतो. इतर साप फक्त दंश करण्याच्या वेळीच आपले तोंड उघडतात. हा साप विषारी नाही, पण त्याच्या लाळेत विष असते. लहान प्राण्यांवर जरी या विषाचे घातक परिणाम होत असले, तरी माणसाला याच्या दंशामुळे फारशी विषबाधा होत नाही. 

या सापाची मादी अंडी घालीत नाही. मादीला एका खेपेला ३–२० पिल्ले होतात.

पाहा : वृक्षसर्प.

कर्वे, ज. नी.