सरस्वतीदेवी, इल्लिंदला : (१५ जून १९१८- ). एक प्रसिद्ध संवेदनशील तेलुगू लेखिका. त्यांचा जन्म पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नरसपूर (आंध्र प्रदेश) येथे झाला. नरसपूर येथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. विदयार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. त्यांना वाचनाची आवड बालपणापासून असल्यामुळे लेखन हा जणू त्यांचा सहजधर्मच बनला. अवतीभवतीच्या जगातून त्यांना कथांचे विषय मिळत गेले. लग्नानंतर त्यांनी आपल्या कथा पतिराजांना वाचायला दिल्या पण त्यांतील बोली आणि समुद्र किनाऱ्याकाठची उघडीवाघडी भाषा पतीला खटकली. या कथांची शैलीही अगदी सरळ सोपी होती. त्यांवर नवऱ्याने केलेली टीका ऐकून सरस्वतीदेवींनी आपल्या कथा छापावयास दिल्या नाहीत. बरीच वर्षे त्यांच्या कथा तशाच पडून होत्या मात्र त्यांचे संसार सांभाळून सतत काहीना काही लेखन चालू होते. आपली मुले थोडी मोठी झाल्यानंतर त्यांनी उस्मानिया विदयापीठातून (हैदराबाद) पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आकाशवाणी वर विषयानुरूप दहा मिनिटांचे समालोचन करण्याचे काम त्यांना मिळाले. आपल्या या भाषणांचाच विस्तार करून सरस्वतीदेवींनी कृष्ण पत्रिका या नियतकालिकातून कथांची लेखमाला लिहिली. भारती आणि सुजाता या दोन मान्यवर पत्रिकांमधूनही त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या आणि मुक्त पत्रकर्मी (फ्रीलान्स जर्नलिस्ट) म्हणूनही त्यांचा नावलौकिक झाला. कथांबरोबरच त्यांनी कादंबरी हा लेखनप्रकार हाताळला. मुथयालु मानलु (१९६०) ही कादंबरी आणि राज हंसलू हा त्यांचा कथासंग्रह विशेष गाजला. स्वर्णू कमललू (१९८१) या कथासंग्रहाला १९८२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला मात्र सरस्वतीदेवींची सर्वांत लोकप्रिय कादंबरी ठरली ती दारिजेरिना प्राणुलु (१९६३). या कादंबरीला अनेक जण त्यांची उत्कृष्ट साहित्यकृती मानतात. स्त्रियांना समाजात कशी वागणूक मिळते आणि त्यांच्या जीवनावर इतरांची सत्ता कशी चालते, याचा चालताबोलता आलेखच यामध्ये त्यांनी रेखाटला आहे. या कादंबरीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेली स्त्री आयुष्यात अनेक गोष्टी गमावून बसलेली हतबल व्यक्ती आहे पण आपले आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी ती महिलांसाठी एक शुश्रूषा केंद्र चालविते आणि आजारी स्त्रियांसाठी एक विसाव्याचे ठिकाण निर्माण करते. केन्द्रात येणाऱ्या एकेका रूग्णाईत स्त्रीच्या हकीकतीचा लेखाजोखा प्रस्तुत कादंबरीत लेखिकेने साकारला आहे. अगदी वेगळी अशी पार्श्वभूमी घेऊन समाजातील वास्तवावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. या कादंबरीमुळे तेलुगू साहित्य वर्तुळात त्यांचे एक संवेदनशील लेखिका म्हणून नाव झाले. अर्थात कथाकादंबरीपुरतीच या लेखिकेची लेखणी सीमित नव्हती. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. कुमार साहित्याच्या क्षेत्रातही भरीव लेखन केले आणि अनेकविध विषयांवर स्वतंत्र निबंधलेखन केले.
त्यांनी १९९८ पर्यंत एकूण तेहेतीस पुस्तके लिहिल्याची नोंद साहित्य अकादमी प्रकाशित हूजहू ऑफ इंडियन रायटर्स या कोशात मिळते. वरील कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांची आणखी काही मान्यवर पुस्तके अशी: वैजयंति (१९७२), रंगवल्ली (१९७६), मब्बू विदिना मोग्ग (१९८०) सर्व कादंबऱ्या तेजो मुर्थुलू (१९७८ आत्मचरित्र) नारी जगत्तू (१९७८), व्यास तरंगिणी (१९८०), तुलसी दललू (१९९३), सर्व निबंधात्मक.
त्या ‘आन्ध्र युवती मंडळी’च्या पंधरा वर्षे सचिव होत्या. तसेच आंध्र राज्याच्या विधान सभेच्या १९५८-६६ दरम्यान सदस्य होत्या. या काळात या संस्थेव्दारे स्त्रियांना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यास त्यांनी प्रेरणा दिली. घराच्या भिंतीआड चौकटीतले जीवन हे आपले कर्तव्य न मानता स्त्रीने हिरिरीने नव्या क्षेत्रात प्रवेश करून मोकळा श्वास घ्यावा, असा त्यांनी आगह धरला. आपल्या लेखनामधून स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीवर आणि समाजाच्या मानसिकतेवर त्यांनी बोट ठेवले. त्यामुळे त्यांच्या कथाकादंबऱ्यांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. एका सजग, संवेदनशील स्त्रीचे मन त्यात प्रतिबिंबित झाले आहे. त्यांनी न्यूयॉर्क आणि शिकागो या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील शहरांना सांस्कृतिक मंडळांतून भेटी दिल्या.
त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराव्यतिरिक्त इतरही अनेक मानसन्मान मिळाले. त्यांत आंध्र प्रदेश राज्याचे उत्तम लेखिका पारितोषिक (१९७४), आंध्र प्रदेश राज्याचा साहित्य अकादमी पुरस्कार (१९८२), आंध्र प्रदेश राज्याचा तेलुगू वेलुगू पुरस्कार (१९८३) वगैरेंचा अंतर्भाव असून तेलुगू विदयापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट ही पदवी दिली (१९९७).
देशपांडे, सु. र.