पॉनटॉपिडान, हेन्‍रिक : (२४ जुलै १८५७- २१ ऑगस्ट १९४३). श्रेष्ठ डॅनिश कथा-कादंबरीकार. डेन्मार्कमधील फ्रेडरिशिआ येथे एका धर्मगुरूच्या कुटुंबात जन्मला. १८७३ मध्ये तो कोपनहेगन येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी आला. तथापि ते सोडून देऊन (१८७९) आपल्या भावाच्या शाळेत शिक्षकाचे काम करू लागला. ह्याच सुमारास तो कथालेखनही करू लागला. १८८१ मध्ये त्याचा पहिला कथासंग्रह Staekkede Vinger प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर सु. १५ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. तत्कालीन डेन्मार्कमधील ग्रामीण तसेच शहरी जीवनाचे वेधक चित्रण त्याच्या कथांतून आढळते. पॉनटॉपिडानची कीर्ती ह्या कथांप्रमाणेच त्याच्या Det forjaettede Land (१८९१-९५, इं.भा. द प्रॉमिस्ड लँड, १८९६), Lykke-Per (१८९८-१९०४, इं.शी. लकी पीटर) आणि De Dodes Rige (१९१२-१६, इं.शी. द रेल्म ऑफ द डेड) ह्या तीन प्रमुख कादंबऱ्यांवर अधिष्ठित आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास संपादण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या एका स्वप्नाळू धर्मगुरूचे चित्र द प्रॉमिस्ड लँड मध्ये आहे, तर ‘लकी पीटर’ काहीशी आत्मचरित्रात्मक आहे. पॉनटॉपिडानप्रमाणेच तिचा नायक घरातील धार्मिक वातावरणाविरुद्ध बंड करतो व अभियांत्रिक म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो. ‘द रेल्म ऑफ द डेड’ या कादंबरीत निराशेची दाट छाया आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात डेन्मार्कमध्ये असलेले राजकीय वातावरण ह्या कादंबरीत चित्रित केलेले असून उदारमतवाद्यांच्या विजयानंतरच्या घटनांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.

पॉनटॉपिडानच्या कादंबऱ्यांतील लेखनशैली वस्तुनिष्ठ व महाकाव्यसदृश आहे. तत्कालीन डॅनिश जीवनाचे सखोल विश्लेषण त्याच्या कादंबऱ्यांत आढळते. ते करताना डॅनिश लोकांच्या काही प्रवृत्तींवर त्याने उपरोधपूर्ण आघात केले. ‘ऑन वे टू माय सेल्फ’ अशा नावाने (इंग्रजी शीर्षकार्थ) त्याने आपल्या आठवणीही लिहिल्या आहेत (१९३३-४०). १९१७ मध्ये कार्ल गेल्लेरूप ह्या डॅनिश कादंबरीकाराबरोबर पॉनटॉपिडानला साहित्याचे नोबेल पारितोषिक विभागून देणयात आले. डेनमाकमधील ऑर्ड्रप येथे तो निधन पावला.

यानसेन, एफ्.जे.बिलेस्कॉव्ह (इं)कुलकर्णी, अ.र.(म)