सरदेशमुख, त्र्यंबक विनायक : (२२ नोव्हेंबर १९२२-१२ डिसेंबर २००५). श्रेष्ठ मराठी साहित्यिक. त्यांचा जन्म अक्कलकोट (सोलापूर जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील विनायकराव हे संस्थानिकांचे खाजगी सचिव होते. शिक्षण सोलापूर आणि पुणे येथे एम्. ए. बी. टी. पर्यंत. आरंभी माध्यमिक विद्यालयात आणि नंतर सोलापूरच्या दयानंद महाविदयालयात त्यांनी अध्यापन केले. त्यांचे वडील साहित्यप्रेमी होते. त्यांनी काही लेखनही केले होते. त्यांच्या घरातील ग्रंथसंगह समृद्ध होता. साहित्य-निर्मितीला प्रेरणादायी असे हे वातावरण होते. स्वत: सरदेशमुख ह्यांनी मराठी साहित्याबरोबरच रवींद्रनाथ टागोर, जे. कृष्णमूर्ती, व्हिक्टर ह्यूगो, स्पॅनिश विचारवंत मीगेल दे ऊनामूनो ई हूगो, रशियन तत्त्वज्ञ निकोलाई ब्यरदयायेव्ह इत्यादींच्या साहित्याचे आणि विचारांचे प्रभावस्त्रोत आत्मसात केले होते. कोणत्या तरी एकाच साहित्यप्रकारात लिहीत जावे, असा सरदेशमुखांच्या मनाचा कल नव्हता मात्र जे लिहायचे ते मनापासून अशी त्यांची मनोधारणा होती आणि तिला अनुसरून त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. सखोल चिंतनात्मकता त्यांच्या ठायी होती आणि तिचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येत राहतो.
महाविद्यालयात विदयार्थिदशेतच ते लेखन करू लागले. १९४४ साली त्यांची ससेमिरा ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर उच्छाद (१९७८), बखर एका राजाची (१९७२), डांगोरा एका नगरीचा (१९९८) ह्या कादंबर्या प्रसिद्ध झाल्या. शिवाय हेर्मान हेस ह्या जर्मन कादंबरीकाराच्या सिद्धार्थ ह्या कादंबरीचा अनुवाद त्यांनी नदीपार (१९५९) ह्या नावाने केला. उत्तररात्र (१९५५) आणि कविता चंद्रकेतू ची (१९९९) हे त्यांचे कवितासंग्रह. त्यांच्या समीक्षाग्रंथांत अंधारयात्रा (१९६८), गडकर्यांची संसारनाटके (१९७०), प्रदेशसाकल्याचा (१९७९), रामदास: प्रतिमा आणि प्रबोध (१९८४), धुके आणि शिल्प (१९८५), शारदीय चंद्रकळा (१९९२) आणि स्फटिकदिवे (२००१) ह्यांचा समावेश होतो. टाहो (१९८२) आणि थैमान (१९८६) ही दोन नाटकेही त्यांनी लिहिलेली आहेत. नदीपार ह्या उपर्युक्त कादंबरीखेरीज खलील जिबान, व्हिक्टर ह्यूगो आणि अझॅन योनेस्को ह्यांच्याही काही साहित्याचा त्यांनी अनुवाद केला आहे.
नोकरीपलीकडे सरदेशमुख यांच्या वडिलांचे आणि राजेसाहेबांचे संबंध मित्रत्वाचे होते. त्यांच्या चर्चेतून राजे ज्या व्यथावेदना व्यक्त करीत, त्यासंदर्भात बखर एका राजाची आणि डांगोरा एका नगरीचा ह्या दोन कादंबर्यांकडे पाहता येते. कादंबरी हा साहित्यप्रकार सरदेशमुखांना मुख्यतः सामाजिक विषयाच्या विवरणासाठी सोयीचा वाटत होता.
सरदेशमुखांच्या उत्तररात्र मधील कविता सर्व दृष्टींनी सघन आहेतच. कवितेला वैचारिकतेचे वावडे असू नये आणि तो आशय तीतून सहजपणे व्यक्त व्हावा अशी त्यांची धारणा होती. तसा प्रयत्न त्यांनी त्यांच्या ‘धिंड’ ह्या दीर्घकवितेत केला. ह्या एका कवितेवर ते दहा वर्षे संस्कार करीत होते.
त्यांच्या अंधारयात्रा ह्या गंथात त्यांनी आधुनिक मराठी कवितेचा एक अन्वयार्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी आणि मर्ढेकर ह्या कवींच्या कवितांच्या अंतरंगाविषयीचे आपले चिंतन त्यांनी ह्या ग्रंथात प्रकट केले आहे. अंधारयात्रा ह्या ग्रंथनामाचा अर्थ ह्या चार कवींच्या भावविश्वात शोधता येतो. पुस्तकाच्या उत्तरभागात कवितेबद्दलचे मूलभूत विचार त्यांनी मांडले आहेत. गडकर्यांची संसारनाटके ह्या ग्रंथात पुढल्याही पिढयांना प्रेरक ठरतील, अशी गडकऱ्यांची बलस्थाने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रदेश साकल्याचा मध्ये साहित्याचा आणि समीक्षेचा जीवनाशी असलेल्या विविधांगी संबंधांचा शोध त्यांनी घेतला आहे. रामदास : प्रतिमा आणि प्रबोध हा ग्रंथ लिहिताना महानुभाव पंथप्रवर्तक चक्रधर आणि ज्ञानदेव ते रामदास ह्या संतांचे साहित्य समाजाच्या सर्व थरांतील लोकांना आजही का प्रिय वाटते, ह्याचा शोध घेण्यास समीक्षेने पुढे आले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. धुके आणि शिल्प- मध्ये गोविंदागज, नारायण सुर्वे, कवी गेस आणि अमेरिकन कवयित्री एमिली डिकिन्सन ह्यांच्यावरचे लेख आहेत. ह्यांशिवाय एका बेचैन, अस्वस्थ जीवनावस्थेत आत्महत्या केलेल्या एका तरूण कवीवरही त्यांनी लिहिले आहे.
त्यांच्या समीक्षेला कधी कधी ‘अध्यात्मवादी’ हे विशेषण लावले गेले आहे. अध्यात्मविचार हा सर्वजीवनस्पर्शी विचार आहे, असे ते मानत. समीक्षा आणि साहित्य यांना जीवनाच्या समग्रतेपासून तोडून पाहता येत नसल्यामुळे आपली समीक्षा आध्यात्मिक विचाराशी कुठे कुठे जोडली गेली असेल, असे ते म्हणत.
उच्छाद, बखर एका राजाची, डांगोरा एका नगरीचा या त्यांच्या कादंबऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार मिळाले. डांगोरा … ला प्रियदर्शनी अकादमीचा पुरस्कार, केशवराव कोठावळे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार (२००३) इ. लाभले. एकूण साहित्यसेवेबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार त्यांना मिळाला. रामदास : प्रतिमा आणि प्रबोध आणि शारदीय ग्रंथकळा ह्या त्यांच्या गंथांना प्रा. रा. श्री. जोग पुरस्कार व महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला तसेच बखर … या त्यांच्या कादंबरीला दमाणी पुरस्कार लाभला.
सोलापूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन झाले.
कुलकर्णी, अ. रा.