अर्नाळकर,   बाबुराव : (९ जून १९०९-  ). लोकप्रिय मराठी गुप्तहेरकथाकार. जन्म ठाणे जिल्ह्यातील आर्नाळा गावी. शिक्षण मुंबईस मॅट्रिकपर्यंत. काही काळ नोकरी. १९२८ पासून स्वातंत्र्यचळवळीत भाग घेऊन कारावास भोगला. मुंबईस स्वातंत्र्यसैनिक संघाचे अध्यक्ष. १९४१ ते ६४ पर्यंत मुंबईत एक चष्म्याचे दुकान चालविले. सध्या लेखन हाच व्यवसाय. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांना ते गुरुस्थानी मानतात. सर्वसामान्य लोकांसाठी लिहिण्याची प्रेरणा अच्युतरावांनीच त्यांना दिली. १९३३ साली एडगर वॉलिस ह्या इंग्रज लेखकाची द फोर जस्ट मेन (१९०६) ही कादंबरी अर्नाळकरांनी वाचली व सामान्य लोकांसाठी योग्य तो विषय त्यांस मिळाला. तो विषय म्हणजे गुप्तहेरकथा. तथापि चौकटची राणी ही त्यांची पहिली गुप्तहेरकथा मात्र १९४२ च्या फेब्रुवारीत प्रसिद्ध झाली. त्यानंतर सु. एक हजार गुप्तहेरकथा लिहून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळविली. आपल्या गुप्तहेरकथांतून त्यांनी निर्माण केलेल्या धनंजय, छोटू, झुंजार, विजया, काळा पहाड, दर्यासारंग, चारुहास, दिलीपकुमार, भीमसेन, विलास, जयंत, भद्रंभद्र, कृष्णकुमारी इ. नायक-नायिकांनी

–‍ विशेषतः धनंजय, झुंजार आणि काळा पहाड यांनी –‍ अनेक मराठी वाचकांच्या मनाची पकड घेतली. गुप्तहेरकथांसारखा वेधक विषय आणि चित्तवेधक कथानक, उत्कंठावर्धक कथनशैली, ओघवती भाषा, आटोपशीर वर्णने आणि एकूण रचनेतील सुटसुटीतपणा इ. गुण यांमुळे सर्वसामान्य वाचकवर्गाचे ते आवडते लेखक ठरले. आज त्यांचा वाचकवर्ग सु. अडीच लाखांचा आहे.

महाराष्ट्र शासनाने १९६२ साली दहा हजार रुपयांचे मानधन देऊन त्यांचा गौरव केला. १९६४ मध्ये ते जे. पी. झाले. 

अर्नाळकरांनी लघुकथा, नाटिका असेही इतर लेखन केलेले आहे. मराठा ह्या नावाने एक मासिकही ते काही काळ चालवीत होते.

त्यांचे बंधू मधुकर अर्नाळकर हेही एक प्रथितयश गुप्तहेरकथाकार आहेत.

कुलकर्णी, अ. र.