भिडे, बाळकृष्ण अनंत : (१८७४ -२ मे १९२९). मराठी कवी, समीक्षक आणि संशोधन. कुलाबा (विद्यामान रायगड) जिल्ह्यातील किहिम ह्या गावी जन्मले. त्यांचे प्राथमिक शिक्षण किहिम येथे, तर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईचे विल्सन हायस्कूल आणि विल्सन कॉलेज येथे झाले. १८९६ साली बी.ए. झाल्यानंतर मुरूड-जंजिरा येथील हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापकाची नोकरी पतकरली. पुढे ह्या शाळेत ते मुख्याध्यापकही झाले. मुरूड-जंजिरा येथेच ते निधन पावले.
हरिभाऊ आपटे ह्यांचा करमणूक ह्या पत्रातून भिडे हे प्रथम कवी म्हणून प्रसिद्धी पावले. प्रभुप्रसादन (१९०७) आणि फुलांचे झेले (१९०८) हे त्यांचे काव्यग्रंथ. ह्यांशिवाय जळगाव येथून निघणाऱ्या काव्यरत्नावलीमधून त्यांच्या ‘मैनलदेवी’, ‘शरत्काल’, ‘पद्मिनी’, ‘शांतीचा बोध’ अशा अनेक कविता प्रसिद्ध झाल्या. आपल्या समीक्षात्मक लेखनाचा आरंभ त्यांनी श्रीसरस्वतीमंदिर ह्या नियतकालिकातून केला. पुढे विविधज्ञानविस्तार आणि रत्नाकर ह्यांसारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी समीक्षात्मक लेखन केले. त्यांचे काही समीक्षात्मक लेखन त्यांनी ‘बी’ ह्या टोपणनावानेही केलेले आहे. आधुनिक मराठी कवितेचे ते एक जागरूक समीक्षक होते. काव्यचर्चा ह्या ना. म. भिडे व अनंततनय ह्यांनी संपादिलेल्या ग्रंथात त्यांनी लिहिलेला ‘मराठी काव्याची उत्क्रांती व केशवसुत’ हा लेख महत्त्वपूर्ण ठरला. केशवसुतांनी मराठी काव्यात क्रांती केली नसून केवळ उत्क्रांती केली आहे, असा प्रचलिताहून वेगळाच दृष्टिकोण त्यांनी ह्या लेखात मांडला होता. त्याशिवाय विरहतरंग, सुधारक, किरण, आनंदगीत ह्यांसारख्या अनेक काव्यसंग्रहांवर परीक्षणे लिहून त्यांनी आपले वेगळेपण दाखविले.
प्राचीन कवींच्या काव्याविषयीचा त्यांचा अभ्यास सखोल होता. श्रीसरस्वतीमंदिरातून वामनपंडित, मुक्तेश्वर व तुकाराम ह्यांच्यावरील प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख त्यांच्या सूक्ष्म व्यासंगाची व संशोधनदृष्टीची साक्ष देतात. हे तीनही लेख वामनपंडित (वृत्त व ग्रंथ) – (१९०५), मुक्तेश्वर (वृत्त व ग्रंथ )–(१९०६) व तुकारामबोवा (वृत्त व ग्रंथ )–(१९०८) ह्या नावांनी पुस्तकरूप झाले आहेत. वामनपंडित… ह्या आपल्या ग्रंथात वामनपंडित ह्या नावाचे पाच वेगवेगळे कवी [(१) यथार्थदीपिकाकार वामन, (२) शांडिल्यगोत्री वामन, (३) वशिष्ठगोत्री वामन, (४) शृंगारप्रिय वामन, (५) यमक्या वामन] होऊन गेले असल्याचा अभिनव सिद्धांत त्यांनी मांडला. मुक्तेश्वर…व तुकारामबोवा…ह्यांतूनही त्यांनी स्वतःचे असे निराळे विचार मांडले आहेत. ते विचार वादग्रस्त असले, तरीही त्यांच्या व्यसंगाची व चिकित्सक दृष्टीची साक्ष देणारे आहेत. वामनपंडितकृत हरिविलास (१९२१), वामनपंडितकृत नामसुधा (१९२१) व सार्थ ज्ञानेश्वरी (१९२२) ही त्यांची काही उल्लेखनीय संपादने. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा सुलभ, सुंदर व प्रवाही अनुवाद ह्यांमुळे हे संपादन विशेष मान्यता पावले.
काही काळ ते काव्यसंग्रह ह्या मासिकाचे संपादक होते. त्यातून त्यांनी मोरोपंतकृत महाभारत (भाग १३ ते १८), मोरोपंतांची स्फुट काव्ये, श्रीशुभानंदस्वामीकृत महाभारत-६ भीष्मपर्व, वामनपंडितकृत यथार्थदीपिका (भाग ३-४) हे ग्रंथ अर्थनिर्णायक टीपांसह प्रसिद्ध केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी साहित्याचा इतिहास लिहिण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते. तथापि मराठी साहित्येतिहासाचा काही प्रारंभिक भाग लिहून होतो न होतो, तोच त्यांना मृत्यूने गाठले. त्यांनी लिहिलेला हा भाग मराठी भाषेचा व वाङ्मयाचा इतिहास (मानभाव अखेर ) ह्या नावावे १९३३ साली प्रसिद्ध झाला. ह्या ग्रंथाचा अर्ध्याहून अधिक भाग मराठी भाषेसंबंधीच्या चर्चेला वाहिलेला असून उरलेल्या भागात मुकुंदराज, ज्ञानदेव, नामदेव, चक्रधर, म्हाइंभट्ट, भास्करभट्ट बोरीकर इ. कवींची अभ्यासपूर्ण माहिती आली आहे. तथापि ह्या इतिहासात अनेक वादग्रस्त विधाने त्यांनी केली आणि अनेक वादग्रस्त विधानांनाही त्यांनी परामर्श घेतला.
अदवंत, म. ना.