सय्यद (सय्यिद) बंधु : दिल्लीच्या मोगल दरबारातील अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील (इ. स.१७१२-१७२०) दोन मुत्सद्दी बंधू. त्यांचे मूळ घराणे वासित (मेसोपोटेमिया- सांप्रत इराक) येथील असून त्यांचा पूर्वज हिंदुस्थानात सरहिंदनजीक राहिला. औरंगजेबाच्या दरबारात त्या घराण्यातील सय्यद अब्दुलाखान सैयदमिया) नावाचा एक सरदार होता. पुढे तो अजमीर व विजापूरचा सुभेदार झाला. त्यास अनेक मुलगे होते. त्यांपैकी हसन अली (१६६६-११ ऑक्टोबर १७२२) आणि हुसेन अली (१६७२-८ ऑक्टोबर १७२०) हे स्वकर्तृत्त्वाने प्रसिद्धीस आले, तेच सय्यद (सय्यिद) बंधू होत. हसन अली १६९७-९८ दरम्यान खानदेश, बागलाण, औरंगाबाद आदी सुभ्यांत फौजदार होता तर धाकटा हुसेन अली अजमीर, आगा येथे अन्य कामावर होता. पुढे जाजऊच्या लढाईत त्यांनी पराक्रम केला, तेव्हा बादशाहने हसनला अब्दुलाह कुत्बूमुल्क हा किताब व वजिरी दिली आणि हुसेनला अमीरूल-उमराव हा किताब व मीरबक्षी म्हणजे सेनापती केले. औरंगजेबच्या मृत्यूनंतर (१७०७) शाह आलम, अझम व कामबक्ष या तीन मुलांत वारसाहक्कासाठी झालेल्या युद्धात शाह आलम (कार. १७०७-१२) यशस्वी होऊन त्याने बहादुरशाह हा किताब धारण केला. त्याच्या कारकीर्दीत शाहाजादा अझिममुशशान याच्या मेहरबानीमुळे हुसेन अलीस बिहारची सुभेदारी (१७०८), तर अब्दुलास अलाहाबादची सुभेदारी (१७११) मिळाली. या सुमारास त्यांचे वास्तव्य दिल्लीत होते. दिल्लीत हिंदुस्थानी मुसलमानी गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते आणि हळूहळू त्यांचे वजन राजकीय वर्तुळात वाढू लागले. सय्यद बंधू सावधगिरीने आणि एकमेकांच्या विचाराने वागत असत. बहादूरशाहच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांदरशाह (कार. १७१२-१३) तीन भावांना ठार करून गादीवर आला तथापि एक वर्षाच्या आत शाह आलमचा नातू फर्रूखसियार (कार.१७१३ –१९) सय्यद बंधूंच्या मदतीने जहांदरशाहास ठार मारून बादशाही तख्तावर बसला.
फर्रूखसियारच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत सय्यद बंधूंचे दिल्ली दरबारात वर्चस्व वाढले. बादशाह बहुतेक सर्व नियुक्त्या त्यांच्या सल्ल्याने करीत असे. हसन अली हा वजीर म्हणून कार्यरत असल्यामुळे बादशाहावर त्याचा वचक होता. पूर्वी अकबराच्या वेळी राजपूत मुलींशी विवाह होत आणि त्यांचे पिता बादशाहाची नोकरी करीत. हा प्रघात राजपुतांनी पुढे मोडला होता, तेव्हा हुसेन सय्यदने जोधपूरच्या अजितसिंगावर स्वारी करून त्यास पराजित केले व त्यास आपली मुलगी इंद्रकुमारी बादशाहास देण्यास भाग पाडले. तसेच मुलगा अभयसिंग यास दिल्लीत तैनातीस ठेवले (जुलै १७१४). प्रथम इंद्रकुमारीला मुस्लिम धर्माची दीक्षा देऊन हे लग्न २७ सप्टेंबर १७२५ रोजी शाही थाटात झाले. बादशाहास सय्यदांचे वर्चस्व डोईजड होऊ लागले. त्यांत उत्तरोत्तर वितुष्ट वाढत चालले, तेव्हा फर्रूख- सियारने हुसेन अलीस दक्षिणेचा सुभेदार (१७१५-१८) नेमून त्यास हसनपासून दूर पाठविले. पुढे फर्रूखसियारने निजामुल्मुल्क, अजितसिंग वगैरे मातब्बर सरदारांना तसेच मराठयांना जवळ करून सय्यदांची उचलबांगडी करण्यासाठी कटकारस्थाने रचली तथापि अब्दुलाहाच्या बोलण्यावरून हुसेन अलीने मराठयांशी मैत्री करून त्यांच्याशी तह करून त्यांचे सैन्य घेऊन १७१८मध्ये दिल्ली गाठली. कमकुवत फर्रूखसियारला सय्यदांनी प्रथम पदच्युत केले आणि नंतर काही महिन्यांनी त्यास ठार मारले. त्याच्याजागी त्यांनी रफी--उद्-दरजत, नीकू सियार व रफी-उद्दौला या शाहजादांना तख्तावर बसविले (१७१९). त्यांपैकी निकू सियारची निवड होऊनही त्यास गादी मिळाली नाही. रफी-उद्-दरजत क्षयरोगाने मरण पावला (जून १७१९). त्यानंतर त्याचा वडीलभाऊ रफी-उद्दौला आजारी पडून १७ सप्टेंबर १७१९ रोजी मरण पावला, तेव्हा सय्यद बंधूंच्या मदतीने व पाठिंब्याने बहादुरशाहचा नातू रोशन अख्तर (कार. १७१९-४८) हा मुहम्मदशाह हा किताब धारण करून तख्तनशीन (सिंहासनाधिष्ठित) झाला. सय्यदांनी राजपुतांना खुश करण्यासाठी अजितसिंगास अजमीर व गुजरात सुभ्यावर नेमले. सवाई जयसिंगासही पुष्कळ नवीन मुलूख दिला मात्र निजामुल्मुल्कुला त्यांनी माळव्यात सुभेदार नेमले.
सय्यद बंधूंची अखेरची दोन वर्षे फार धामधुमीत गेली तरीसुद्धा हुसेन अलीने दक्षिणेत सुभेदारीवर असताना मराठयांशी तह केला होता. त्याची बादशाहकडून फर्मान घेऊन अंमलबजावणी केली आणि पूर्वी झालेले करार पुरे करून मराठे सरदारांस व फौजेस दक्षिणेत पाठविले. मानसिंग व येसूबाईसह अन्य मंडळी कैदेत होती, ती बाळाजी विश्र्वनाथाचे स्वाधीन करण्यात आली तसेच चौथ व सरदेशमुखीच्या सनदा आणि स्वराज्याचा करार असे तीन करार मराठयांच्या पदरी सय्यदांमुळे पडले. फर्रूखसियारची राजपूत विधवा राणी दिल्लीत होती. तिला सय्यदांनी अजितसिंगाच्या स्वाधीन केले. तिची एक कोटीची संपत्तीही तिला दिली. अजितसंगाने तिला स्वदेशी नेऊन प्रायश्चित्त देववून परत हिंदू धर्मात घेतले. एकूण सय्यदांना राजपूत-मराठे आदी हिंदूंबद्दल सहानुभूती होती. त्यांच्यामुळेच त्यावेळी दिल्लीत मोठमोठया मुस्लिम सरदारांजवळ अनेक हुशार हिंदू गृहस्थ नोकरीस होते. चिटणीसी, हिशोबी, वकिली वगैरे खलबते व खुब्या जाणून घेण्यास हिंदूंचा विशेष उपयोग होई. रतनचंद नावाचा इसम अब्दुला सय्यदचा उजवा हात असून, तो तत्कालीन बनिया मंडलाचा प्रमुख होता. अब्दुलाने दिवाण-इ-खालसा या पदावर त्याची नियुक्ती केली होती मात्र त्याचे महत्त्व वाढते आहे, हे लक्षात येताच बादशाहाने इनायतुल्ल या औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेल्या हिंदुद्वेष्टया इसमाची नियुक्ती केली. रतनचंदाच्या विनंतीवरून सय्यदांनी बादशाहास जझिया कर रद्द करण्यास भाग पाडले होते, तो इनायतुल्लमुळे पुन्हा सुरू झाला. या प्रकरणामुळे अब्दुला व बादशाह यांत वैर निर्माण झाले. रतनचंदाने दोघा सय्यद बंधूंत मतभेद झाले, तेव्हा उभयतांची समजूत घातली. तसेच राजा गिरधर बहादुर व सय्यद यांत अलाहाबाद येथे लढाई झाली. तीत रतनचंदानेच तह घडवून आणून गिरिधरसारखा शूर सरदार सय्यदांच्या बाजूस आणला.
मुहम्मदशाहला सय्यद बंधूंचे दिल्ली दरबारातील वर्चस्व जाचू लागले पण धूर्त अब्दुला फौज बाळगून होता आणि हुसेन अलीने राजपुतांशी मराठयांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यामुळे तोही शिरजोर झाला होता. तेव्हा बादशाहाने कपटकारस्थाने आरंभली. सय्यदांचे पिढीजात अंतःस्थ शत्रू निजामुल्मुल्क आणि त्याचा चुलत चुलता मुहम्मद अमीन यांचे साहाय्य मिळविले. बादशाह व हुसेन अली यांनी निजामाचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत जावे आणि अब्दुलाने दिल्लीतील बंदोबस्त पाहावा, असे ठरले. सय्यद बंधूंची ही फाटाफूटच त्यांच्या नाशास कारणीभूत ठरली. त्याप्रमाणे बादशाहाची स्वारी आग्याहून निघून जयपूरच्या पूर्वेस तोडाभीम येथे आली असता, अमीनखान, हैदरकुलीखान व सादतखान या तीन सरदारांकरवी बादशाहाने हुसेन अलीचा खून करविला. बादशाहाने दरबार भरवून बक्षिसे वाटली. दिल्लीस परतल्यावर अब्दुलाचे त्याचे वाकडे आले. बादशाहाने अमीनखानास वजीर केले तेव्हा अब्दुला व बादशाहाचे सैन्य यांत हसनपूर (यमुनेकाठी) १४ नोव्हेंबर १७२० मध्ये लढाई होऊन अब्दुलास कैद झाली. याप्रमाणे सैय्यदांची अल्पशी, पण दैदीप्यमान कारकीर्द संपुष्टात आली. पुढे दोन वर्षांनी अब्दुलाचा खून झाला.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. Maratha Supremacy, Bombay, 1983.
2. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत–मध्यविभाग (सन १७०७ते १७४०), पुणे, १९९९.
गोखले, कमल