सरकार, दिनेशचंद्र : (८ जून १९०७ -१५ जनेवारी १९८५). पुराभिलेखविदया, नाणकशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास इ. विषयांतील थोर भारतीय संशोधक व विद्वान. जन्म सध्याच्या बांगला देशातील फरिदपूरजवळच्या कृष्णनगर या गावी. त्यांचे वडील यज्ञेश्वर हे वैदयकी करीत. आईचे नाव कुसुमकुमारी. कोलकाता विदयापीठातून ते एम्. ए. व नंतर पीएच्.डी. (१९३७) झाले. संस्कृत, भारतीय इतिहास आणि संस्कृती हे त्यांचे परीक्षाविषय आणि नाणकशास्त्र व पुराभिलेखविदया हे स्वतंत्र अभ्यासविषय होते.

दिनेशचंद्र १९३७ साली कोलकाता विदयापीठामध्ये व्याख्याता म्हणून रूजू झाले. पुढे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या खात्यामध्ये निरनिराळ्या पदांवर त्यांनी काम करून अखेर त्या खात्यामध्ये भारतीय पुराभिलेखप्रमुख झाले. अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन, बर्कली इ. विदयापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. जर्मनीतील हायडेलबर्ग विदयापीठातही त्यांची व्याख्याने झाली. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. पुराभिलेखविदयेमधील असामान्य कर्तृत्वाबद्दल त्यांना ताम्रशासन देण्यात आले . तसेच नवनालंदा महाविहार या संस्थेने त्यांना ‘विदयावारिधी’ या पदवीने गौरविले. अखिल भारतीय पाच्यविदयापरिषद, उज्जैन (१९७२) भारतीय इतिहास परिषद, मुंबई (१९८०) यांचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. अनेक संस्थांचे अध्यक्ष किंवा विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले.

दिनेशचंद्र यांनी बंगाली आणि इंग्रजीमध्ये विपुल लेखन केले आहे.त्यांच्या नावावर एकूण पस्तीस गंथ आहेत : स्टडीज इन द जिऑगफी ऑफ एन्शंट अँड मिडिव्हल इंडिया (१९६०), स्टडीज इन द रिलिजस लाइफ ऑफ एन्शंट अँड मिडिव्हल इंडिया (१९७३), द शाक्त पीठाज (१९४८), द स्टडीज इन इंडियन कॉइन्स (१९६८), द गुहिलास ऑफ किष्किंधा (१९६५) यांसारखे त्यांचे ग्रंथ अत्यंत मौलिक समजले जातात. दोनशे पन्नासांहून अधिक तामपटांचे तथा शिलालेखांचे त्यांनी वाचन आणि संपादन करून ते एपिगाफिया इंडिका या नियतकालिकांत प्रसिद्घ केले (१९५५ ते १९६१). याच कालखंडात या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. नाणकशास्त्र,संस्कृत वाङ्मय, धर्म, प्राचीन कला, प्राचीन भूगोल, राजकीय, इतिहास इ. विषयांवर दिनेशचंद्र यांनी बाराशेहून अधिक लेख लिहिले. पुराभिलेखविदया, नाणकशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहासाच्या विविध शाखा या विषयांतील त्यांचे योगदान असामान्य आहे.

गोखले, शोभना