समुद्रतळ विस्तारण : महासागराच्या तळावरील उंचवटा साधारणपणे महासागराच्या द्रोणीच्या मध्यभागी आढळतो. म्हणून पाण्याखालील या पर्वतीय क्षेत्रांना एकत्रितपणे मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणी असे म्हणतात. या पर्वतश्रेणीच्या कंटकाला (माथ्याला) अनुसरून महासागरी भूकवच (समुद्रतळ) निर्माण होते व ते आडव्या दिशेत तिच्यापासून दूर ढकलले जाऊन विस्तारत राहते. या सिद्धांताला समुद्रतळ विस्तारण म्हणतात.
⇨ खंडविप्लवाच्या सिद्धांतात खंड सरकविणाऱ्या प्रेरणांविषयी प्रश्र्न उपस्थित झाला होता. १९६० साली एच्. एच्. हेस यांनी खंड कसे हलविले जातात हे स्पष्ट करण्यासाठी समुद्रतळ विस्तारणाचा सिद्धांत मांडला. तीनच वर्षांनी एफ्. जे. व्हाइन आणि डी. एच्. मॅथ्यूज या बिटिश भूभौतिकीविदांनी या सिद्धांताला पुष्टी देणारा पुरावा सादर केला. ⇨ भूपट्ट सांरचनिकी सिद्धांत विकसित होण्याला समुद्रतळ विस्तारणाचा सिद्धांत आधारभूत ठरला आणि भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस पंचवीस वर्षांत भूवैज्ञानिक विचारांमध्ये कांती घडून आली.
खोल समुद्रतळांविषयीच्या नवीन शोधांच्या आधारे हेस यांनी समुद्रतळ विस्तारणाचा सिद्धांत पुढीलप्रमाणे मांडला : पृथ्वीच्या भूकवचाखालील मुख्यत्वे शिलारसाच्या (वितळलेल्या खडकांच्या) तप्त जाड थराला प्रावरण म्हणतात. प्रावरणातून शिलारस मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणीच्या माथ्याला अनुसरून एकसारखा वर येत असतो. (सर्व महासागरात मिळून ही पर्वतश्रेणी ६० हजार किमी. लांब पसरली आहे.) हा शिलारस थंड होऊन कठीण झाला की नवीन समुद्रतळ बनतो व तो या पर्वतश्रेणीच्या कडांपासून दूर लोटला जाऊन जुना समुद्रतळ पुढे सरकतो. अशा तृहेने अधिक नवीन समुद्रतळ निर्माण होत जाऊन समुद्रतळ विस्तारण होते. या विस्तारणामुळे भूपट्ट खंडांसह पुढे सरकतो. परिणामी खंडांचा विप्लव होऊन स्थलांतराव्दारे ते एकमेकांपासून दूर जातात. उदा., अटलांटिक महासागरातील मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणीच्या माथ्यावर मध्य-अटलांटिक खचदरी नावाची खोल व अरूंद दरी आहे. या दरीच्या दोन बाजूंना दोन भूपट्ट आहेत. भूपट्टात कठीण भूकवच प्रावरणाचे घनरूप बाह्य थर येतात. हे भूपट्ट सावकाशपणे एकमेकांपासून दूर जात आहेत. परिणामी दरीच्या तळावर सर्वसाधारणपणे पूर्व-पश्र्चिम जाणाऱ्या भेगा निर्माण होतात. प्रावरणाच्या दुर्बलावरण या वितळलेल्या थरातून येणारा शिलारस या भेगांत शिरून कठीण होतो व नवा समुद्रतळ बनतो. प्रावरणात अतिशय खोलवर होत असलेल्या अभिसरणाच्या हालचालींमुळे समुद्रतळ हलतो. अशा प्रकारे अटलांटिक महासागराभोवतीचे खंड मिड-अटलांटिक रिज या मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणीपासून एका वर्षात १-२ सेंमी. दूर जात असल्याचे मानतात. याचा अर्थ अटलांटिक महासागराच्या द्रोणीची रूंदी दरवर्षी याच्या दुप्पट (सु. २·५ सेंमी.) वाढत आहे. थोडक्यात जेथे भूपट्ट एकमेकांपासून दूर जात असतात तेथे समुद्रतळ विस्तारण होते. जेव्हा खंडाभोवती खोल खंदकांची प्रणाली असते (उदा., पॅसिफिक महासागराभोवतीचे खंड अंदमान व्दीपसमूहाचा पश्चिम तट) तेव्हा सागरी तळ खाली डुबतो व खंडाखाली रेटला जातो. अखेरीस तो ज्याच्यापासून निर्माण झालेला असतो, त्या पृथ्वीच्या प्रावरणात घुसतो व वितळून त्यात मिसळून जातो.
समुद्रतळ विस्तारण सिद्धांताची पुष्टी करणारे अनेक पुरावे मिळाले आहेत. उदा., व्हाइन व मॅथ्यूज यांनी १९६३ साली सादर केलेला पुरावा. यासाठी त्यांनी मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणीलगत पुराचुंबकीय मापने केली [→ पुराचुंबकत्व]. समुद्रतळावरील खडकांतील चुंबकीय कणांमध्ये ते जेव्हा कठीण झाले तेव्हाचे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र नोंदले गेले आणि समुद्रतळ तयार होत असताना खुद्द चुंबकीय क्षेत्राची दिशा वेळोवेळी उलट झाली, या दोन गृहितांवर त्यांचे प्रयोग आधारलेले होते. जर समुद्रतळ विस्तारत असेल, तर पर्वतश्रेणीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या नेहमीच्या व उलट दिशेतील चुंबकत्वाचे आकृतिबंध (रचना) हे एकमेकांशी जुळायला हवेत. त्यांना प्रयोगांत असे जुळणारे चुंबकीय आकृतिबंध आढळले व समुद्रतळ विस्तारण होत असल्याचे दिसून आले. अशा रीतीने महासागरी चुंबकीय विक्षोभांच्या म्हणजे स्थानिक चुंबकीय विक्षोभांच्या या अनुसंधानाने समुद्रतळ विस्तारण सिद्धांताला पुष्टी मिळाली.
ऊष्मीय एषणींव्दारे केलेल्या अभ्यासातूनही अशी पुष्टी मिळाली आहे. समुद्रतळाच्या गाळातून वाहणारा उष्णताप्रवाह हा सामान्यपणे खंडांमधून होणाऱ्या उष्णताप्रवाहाएवढा असतो. मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणीतील उष्णताप्रवाह याला अपवाद आहे. या पर्वतश्रेणीत काही ठिकाणी उष्णता- प्रवाहाचे मूल्य हे नेहमीच्या त्याच्या मूल्याच्या तीन ते चार पट आढळले आहे. ही उच्च् मूल्ये नियमविरूद्ध (असंगत) आहेत आणि ती या पर्वतश्रेणीच्या माथ्यालगत तप्त शिलारस घुसत (अंतर्वेशित होत) असल्याची निदर्शक आहेत, असे मानतात. भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या तरंगांचे मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणीच्या माथ्यातून जातानाचे तीन वेळा अपेक्षेपेक्षा कमी (नियमविरूद्ध) असतात, ही वैशिष्टयपूर्ण गोष्ट संशोधनांती उघड झाली आहे. ऊष्मीय प्रसरण व वर येणाऱ्या शिलारसामुळे पडणाऱ्या भेगा ही याची कारणे असू शकतील. म्हणजे ही बाब समुद्रतळ विस्तारणाच्या बाजूचीआहे.
सागरी गाळाची जाडी मोजणे व त्यातील द्रव्याचे निरपेक्ष वय ठरविणे यांव्दारे समुद्रतळ विस्तारणाचा आणखी पुरावा मिळाला आहे. खडकाचा गाभा काढणे, गाळ उपसणी व खोल सागरी छिद्रण करणे यांसारख्या विविध पद्धतींनी सागरी गाळाचे नमुने मिळविण्यात आले आहेत. यांपैकी सर्वांत जुन्या गाळाचे वय केवळ जुरासिक कालीन म्हणजे १९ कोटी वर्षे एवढेच आले आहे. सागरी द्रोणी चिरकालिक असल्याचा सिद्धांत पृथ्वीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये दीर्घकाळापासून रूढ झालेला आहे. मात्र सागरी गाळाची वये याच्याशी जुळणारी नाहीत. समुद्रतळ विस्तारण हे यामागील कारण असू शकते.
पहा : खंडविप्लव भूपट्ट सांरचनिकी महासागर व महासागरविज्ञान.
ठाकूर, अ. ना.