समानुभूति : (एम्पथी). दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पावून तिचे विचार, वृत्ती, भावना, इच्छा, इ. जाणून घेणे म्हणजे समानुभूती. ही संज्ञा विसाव्या शतकाच्या सुरूवातीस मानसशास्त्रात प्रविष्ट झाली आणि अन्य व्यक्तींना जाणून घेण्याच्या प्रयत्नांत जर्मन मानसशास्त्रज्ञ टेओडोर लिप्स ह्याने ह्या संकल्पनेसाठी Einfuhlung (ॲम्फ्यूलन) ही जर्मन संज्ञा वापरली. एडवर्ड टिचनर ह्या मानसशास्त्रज्ञाने ‘एम्पथी’ असे तिचे इंग्रजीकरण केले.
निरनिराळ्या व्यक्तींच्या मानसिक जीवनाचे अधिक परिपूर्ण ज्ञान मिळावे, ह्यासाठी मानसशास्त्रज्ञ सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत. अन्य व्यक्तींच्या मनांशी समानुभूती साधणे, हा ह्याच दिशेने केलेला प्रयत्न होय.
आंधळ्या व्यक्तींच्या समस्यांची जाणीव व्हावी, म्हणून काही संशोधक अपारदर्शक काचांचे चष्मे लावून काही काळ जीवन जगलेले आहेत. ⇨ चित्तविकृती ने पछाडलेल्या व्यक्तीला येणाऱ्या अनोख्या आणि पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ अशा जगाचे व अनुभवांचे ज्ञान त्या व्यक्तीशी समानुभूती साधून मिळविणे अवघड असते तथापि ही विकृती न झालेल्या माणसाला स्वत:च्या स्वप्नांचा तसेच दु:स्वप्नांचा अभ्यास करून चित्तविकृतीच्या जगाचे ज्ञान काही प्रमाणात मिळविता येईल. चित्तविकृतीसारखी मानसिकता, त्याच्या मानसिक जगातील अनुभवांच्या जवळपास येऊ शकतील असे अनुभव काही औषधांच्या योगे तात्पुरते निर्माण करता येतात. मानसो-पचारज्ञ, निदानीय मानसशास्त्राचे (क्लिनिकल सायकॉलॉजी) अभ्यासक ह्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देताना जी प्रायोगिक तंत्रे वापरली जातात, त्यांच्या साहाय्याने मानसिक दृष्टया निकोप असणाऱ्या व्यक्तीही निराधार भम, संवेदन आणि विचार ह्यांच्या प्रकियेतले अडथळे वा क्षोभ आणि व्यक्तिमत्त्वातली परिवर्तने अनुभवू शकतात. समानुभूतीच्या संदर्भात हे महत्त्वाचे आहे.
दोन माणसांत चालणारे अशाब्दिक वा अस्पष्ट संदेशवहन अशी समानुभूतीची व्याख्या अमेरिकन मनोविश्र्लेषक हॅरी स्टॅक सलव्हन ह्याने केली आहे. असे संदेशवहन अगदी जन्मापासूनही असू शकते. उदा., आई तिच्या बाळाला पाजत असताना शब्दरूप धारण न केलेल्या तिच्या अनेक भावना, वृत्ती ह्यांना ते मूल प्रतिसाद देत असते. त्याला पाजण्याच्या वेळी आई जर अस्वस्थ, चिंतातुर मन:स्थितीत असेल, तर मूल भयभीत होऊन वा विक्षोभ प्रकट करून आईच्या मानसिक अवस्थेला प्रतिसाद देते समानुभूतीचे, अगदी मूलभूत पातळीवरचे हे स्वरूप होय. मूल वयाने वाढल्यानंतर इतरांच्या भावना, वृत्ती इ. भाषेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागते. समानुभूतीचा उपयोग हा समुपदेशनाच्या (काउन्सेलिंग) तंत्रातील महत्त्वाचा टप्पा (भाग) असून हे तंत्र अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रोजर्स याने विकसित केले आहे.
कुलकर्णी, अ. र.