समजातता : (होमोलॉजी). क्रमविकासामधील (उत्क्रांतीमधील) एका  सामान्य पूर्वजापासून आलेल्या भिन्न जीवजातींच्या संरचनांमधील (अवयवांतील)  शरीरक्रियावैज्ञानिक किंवा विकासात्मक साम्याला समजातता म्हणतात. समजातीय संरचनांमध्ये साम्य असणे गरजेचे असते व त्या एकाच तऱ्हेच्या सर्वसाधारण मार्गाने  विकसित झालेल्या असतात. उदा., सील या पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या उभयचर  प्राण्याचे पर व कुत्र्याचे पुढील पाय यांची मूलभूत संरचना एकसारखीच असते. सागरातील कासवाचे पाय व पक्ष्यांचे पंख हेही समजातीय अवयव आहेत. मात्र त्यांचे  उपयोग भिन्न आहेत. एकसारखा उपयोग असलेल्या पण संरचना भिन्न असलेल्या अवयवांना  समरूप, समधर्मी वा कार्यसदृश अवयव म्हणतात. पक्ष्यांचे पंख व कीटकांचे पंख यासमरूप संरचना आहेत.

पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये अवयवांच्या संरचनेचा आराखडा  सर्वसाधारणपणे सारखाच असतो. अशा प्राण्यांमध्ये हात व  पाय हे अवयव चालणे, पळणे, उड्या मारणे, पोहणे, हवेत उडणे अशी विविध कामे  करतात. त्यामुळे त्यांच्यात बाह्यत: सारखेपणा कमी दिसतो. मात्र त्यांच्या हाडांच्या सांगाड्याच्या रचनेचा आराखडा सारखाच असतो. अशा  अवयवांना समजातीय अवयव म्हणतात व या प्रकारच्या साम्याला समजातता म्हणतात.  एकसारख्या पूर्वजापासून क्रमविकास झाल्याचे हे अवयव द्योतक असतात.

जीवसृष्टीमध्ये असंख्य जातींच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. त्यांचे वर्गीकरण करण्याचा  प्रयत्न केल्यास इतिहासात ज्याप्रमाणे एखादया राजघराण्याची वंशावळी देतात, त्याचप्रमाणे  या प्राण्यांची वंशावळी देता येईल. प्राण्यांचे निरनिराळे वर्ग, उपवर्ग, जाती आणि  उपजाती मिळून एक मोठा वंशवृक्ष तयार होईल. हे वर्गीकरण नैसर्गिक रीत्या  केले आहे. कोणत्याही वर्गांतील भिन्न प्राण्यांचा अभ्यास केल्यास असे आढळते की, त्यांच्या शरीररचनेत काही तरी साम्य आहे. तसेच एका वर्गातील उपवर्गात येणाऱ्या  प्राण्यांमध्ये याहीपेक्षा अधिक साम्य आढळून येते. यावरून असे अनुमान काढता  येते की, हे सर्व प्राणी म्हणजे एक मोठा थोरला वंशविस्तारच आहे. ज्याप्रमाणे  एखादया वंशावळीतील व्यक्तीचे परस्परांशी जवळचे अगर लांबचे नाते असते, त्याप्रमाणे याभिन्न प्राण्यांचे एकमेकांशी काही तरी नाते असले पाहिजे व हे नाते या वर्गीकरण  वृक्षात जसजसे वरवर जाऊ तसतसे ते अधिकाधिक जवळचे होते म्हणजे हे सर्व प्राणी  एकाच अथवा काही थोड्या अशा पूर्वजांचे वंशज असले पाहिजेत, अशी कल्पना  यावरून साहजिकच येते. फरक इतकाच की, हे पूर्वज अत्यंत प्राचीन म्हणजे लाखो वर्षांपूर्वीचे असले पाहिजेत.

परिस्थितीत जसजसे बदल घडत जातात तसतसे या नव्या परिस्थितीशी टक्कर देण्याला  योग्य असे फेरबदल प्राण्यांच्या शरीररचनेत होत जातात. आनुवंशिक संस्कारांमुळे  पुढच्या पिढीतून हे फरक वाढत जाऊन कमाकमाने त्या प्राण्यांचे एकंदर  रंगरूप पालटलेले दिसते. म क्रमविकासा च्या मुळाशी ही कल्पना आहे.  परिस्थितीनुसार शरीररचनेत फेरबदल घडल्याची अनेक उदाहरणे प्राणिसृष्टीत  आढळतात.

निरनिराळ्या जातींच्या प्राण्यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे आढळते की, या प्राण्यांचे काही अवयव मूलत: एकाच रचनेचे असून त्यांचे कार्य मात्र वेगवेगळ्या  प्रकारचे असते. अशा अवयवांना’समजातीय  अवयव ‘असे म्हणतात व या अवयवांत कार्यानुरूप घडलेल्या बदलास’समजातता ‘ असे  म्हणतात. या प्राण्यांची बाह्य लक्षणे अगदी भिन्न असली तरी त्यांच्या विशिष्ट अवयवांची  अंतर्रचना एकाच पद्धतीची असते. उदा., मानव, माकड, वटवाघूळ, पक्षी, देवमासा  आणि सील हे प्राणी वेगवेगळ्या प्राणिवर्गांत मोडतात. त्यांची लक्षणे इतकी भिन्न आहेत  की, यांतील फक्त एखादा प्राणी पाहून त्यावरून दुसऱ्याची कल्पनासुद्धा आणून देणे  फार अवघड आहे. या प्राण्यांचे शरीर, सवयी, लक्षणे, आहार वगैरे सर्व गोष्टी  परस्पराहून अगदी भिन्न आहेत परंतु या प्राण्यांचा एखादा अवयव घेऊन त्याची  अंतर्रचना पाहिल्यास त्यांचे परस्परांतील साम्य लक्षात येते. यासाठी वरील सहा  प्रकारच्या प्राण्यांचे हात आणि पाय यांची अंतर्रचना कशी असते ते खाली दिले आहे.

मनुष्याच्या हाताची (खांदयापासून ते बोटापर्यंत) अंतर्रचना पाहिल्यास असे  आढळते की, खांदयापासून कोपरापर्यंत एक लांब हाड व कोपरापासून  मनगटापर्यंत दोन हाडे असून ही हाडे दोन्ही टोकांना एकमेकांशी  सांधलेली आहेत. मनगटात लहान लहान हाडांच्या दोन ओळी आहेत. त्यानंतर  तळव्याची पाच हाडे व सर्वांत शेवटी पाच बोटे आहेत. अंगठयात दोन व उरलेल्या  चार बोटांत प्रत्येकी तीन हाडे आहेत. मनुष्याच्या पायांची अंतर्रचना हाताच्या  अंतर्रचनेसारखीच असते. फरक काय तो हाडाच्या लांबीत असतो.

माकडाच्या हातापायांची अंतर्रचना माणसाच्या हातापायांच्या अंतर्रचनेसारखीच  असते. फरक फक्त हाडांच्या लांबीत असतो. कुत्र्याच्या पुढील पायांची हाडे व  माणसाच्या हाताची हाडे यांची रचना एकसारखीच असते. यानंतर सील, देवमासा  यांच्या हातापायांची रचना पुढे दिली आहे : मनुष्य व माकड जमिनीवर राहतात, एवढे तरी त्यांच्यात साम्य आहे परंतु मनुष्य, देवमासा व सील यांच्यात तेवढेही  साम्य नाही. देवमासा पूर्णपणे जलचर आहे तर सील उभयचर आहे. तो काही वेळ  पाण्यात व काही वेळ जमिनीवर राहतो. जमिनीवर चालणे व पाण्यात पोहणे या दोन्ही  क्रिया भिन्न असल्याने अवयवांची व शरीराची ठेवण दोन्ही ठिकाणी एकाच प्रकारची  असणे योग्य नाही. पाण्यात पोहण्यासाठी पायांपेक्षा हातांचा अधिक उपयोग  होतो. म्हणूनच देवमासा व सील यांच्या हातांचे रूपांतर परांमध्ये झालेले आहे.  दोघांची पाण्यातील गती या परांवर अवलंबून असल्याने ते अधिक बळकट झाले  आहेत. मनुष्याच्या हाताची हाडे लांब असतात व बोटे वेगवेगळी असतात परंतु  देवमासा व सील यांच्या परांतील हाडे आखूड असतात, तसेच त्यांची बोटे  एकमेकांस कातडीच्या साहाय्याने चिकटलेली असतात. त्यामुळे पाण्यात पोहताना  पाणी मागे लोटण्यासाठी या परांचा वल्ह्यासारखा उपयोग होतो. पोहताना  पायांची विशेष आवश्यकता नसल्याने या जलचर प्राण्यांचा शरीराचा पाठीमागील भाग  निमुळता झालेला आहे. सील उभयचर असल्याने त्याच्या मागील पायांची पूर्ण वाढ होत  नाही त्यांचे अवशेष राहिलेले आहेत. अर्धवट वाढलेल्या या मागील पायांचा  उपयोग सीलला जमिनीवर खुरडण्यासाठी होतो. देवमाशाला पाण्याबाहेर केव्हाही  यावयाचे नसल्याने त्याचे मागील पाय पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. देवमासा व  सील यांच्या परांतील हाडांची रचना माणसाच्या हातामधील हाडांच्या रचनेसारखीच  असते.


 पक्षी आणि वटवाघूळ यांच्या हातांचे रूपांतर पंखामध्ये झालेले असते. त्यांच्या  बोटांची लांबी कमी होऊन पंखाचा बहुतेक विस्तार मनगट व बाहू यांच्या  हाडांत झालेला असतो. पक्ष्याचा पंख पिसांनी बनलेला असतो, तर वटवाघळाचा पंख  कातडीच्या पातळ पडदयाचा बनलेला असतो.

वर चर्चिलेल्या सहा प्राण्यांच्या हातातील साम्य केवळ त्यांच्या हाडांच्या रचनेपुरतेच  नसून त्यांचे स्नायू , रक्तवाहिन्या यांमध्येही आहे परंतु परिस्थितीनुसार त्यांचे  कार्य वेगवेगळ्या प्रकारचे असते. या घटनेला समजातता व या अवयवांना समजातीय  अवयव म्हणतात. माणसाचा व माकडाचा हात, पक्ष्याचे व वटवाघळाचे पंख आणि देवमासा  व सील यांचे पर यांच्यातील हाडांची रचना एकाच प्रकारची असली, तरी त्यांचे  कार्य वेगवेगळे असते. मानवाचा व माकडाचा हात वस्तू उचलण्यासाठी व  फेकण्यासाठी, पक्षी व वटवाघूळ यांचे पंख उडण्यासाठी आणि देवमासा व सील  यांचे पर पोहण्यासाठी उपयोगी पडतात.

बेडूक व मानव यांच्या शरीररचनेचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे आढळते  की, त्यांच्यात पुष्कळच साधर्म्य आहे. त्यांच्या शरीरातील हाडांच्या सांगाडयाच्या  रचनेत सारखेपणा असतो. शरीरातील अनेक तंत्रांच्या (संस्थांच्या) रचनेत व  कार्यांतही साम्य आढळते. प्राण्यांचे चालणे, धावणे पोहणे, हवेत उडणे इ. कार्ये  करणारे अवयव एकाच रचनेचे का असतात? सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या)  वर्गातील नष्ट झालेला टेरोसॉर व पक्षी यांच्या पंखांतील हाडे चतुष्पाद  प्राण्यांच्या पुढील पायांतील हाडांसारखी का असतात ? वटवाघळाच्या पंखांतील  हाडे, कुत्र्याच्या पुढील पायांतील हाडांसारखी किंवा मानवाच्या हातातील  हाडांसारखी का असतात ? समुद्रातराहणाऱ्या देवमाशाला श्वसनासाठी फुप्फुसे का असतात ? या सर्व प्रश्नांचे उत्तर एक  आहे, ते म्हणजे हे सर्व प्राणी एकाच जातीच्या प्राण्यापासून निर्माण झालेले आहेत.  परिस्थितीनुरूप त्यांच्या अवयवांत बदल घडून आले आहेत परंतु हे बदल घडून येत  असताना त्या अवयवांच्या मूळ रचनेत बदल घडून येत नाहीत. हे सर्व अवयव समजातीय  आहेत. समजाततेची विशिष्ट लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : (१) भूणावस्थेतील साम्य,  (२) रचनेतील साम्य व (३) कार्यातील साम्य. प्राण्यात आढळणाऱ्या समजाततेमुळे असे  दिसते की, आपल्या मूळ पूर्वजापासून या प्राण्यांनी एक ठराविक प्रकारची रचना  अवलंबली आहे परंतु हे प्राणी ज्या परिस्थितीत राहतात तेथील एकूण स्थितीनुसार या  अवयवांचे कार्य वेगवेगळ्या प्रकारचे असते. क्रमविकासाच्या तत्त्वाप्रमाणे देवमासा, सील, पक्षी, मनुष्य, माकड इ. प्राण्यांचे अत्यंत प्राचीन काळचे पूर्वज कोणते तरी  जमिनीवर राहणारे प्राणी होते. कालांतराने त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये  बदल घडून कोणाला पाण्यात जाणे भाग पडले, तर कोणी हवेत संचार करू लागले.  काही जमिनीवरच राहिले. नव्या परिस्थितीशी टक्कर देण्यास योग्य असे फेरबदल  त्यांच्या शरीरात व अवयवांत झाले, म्हणून त्यांचे कार्य बदलले. असे असले तरी  शरीराची व अवयवांची अंतर्रचना ठराविक साच्याची झाली. समजाततेच्या घटनेचा  चार्ल्स डार्विन यांना त्यांच्या क्रमविकासाच्या तत्त्वाला पुष्टी देण्यासाठी खूप  उपयोग झाला.

डार्विन यांनी त्यांचा क्रमविकासाचा सिद्धांत जगापुढे मांडण्यापूर्वी समजातता  या विषयावर अनेक शास्त्रज्ञांनी निरीक्षण केले असल्याचे आढळते. अरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञांच्या लेखामध्ये प्राण्यांतील समजाततेबद्दल उल्लेख आहे. पी. बलाँ (१५५५) या शास्त्रज्ञांनी पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्या सांगाडयंचा तुलनात्मक अभ्यास करून  त्यांच्यातील साम्य दाखवून दिले. ई. जी. सेंट हिलेर (१८८८) यांनी समजाततेची  व्याख्या तयार केली. रिचर्ड ओएन (१८४९) यांनी समान लक्षणे दाखविणाऱ्या  अवयवांमधील कार्याच्या दृष्टीने असलेले भेद स्पष्ट केले. ओएन यांच्या मते  समजातीय अवयव एकाच पद्धतीने निर्माण झाले असले, तरी ते वेगवेगळी कार्ये करतात.  माणसाचा हात वस्तू उचलण्यासाठी, तर माशाचा पर पाण्यात पोहण्यासाठी उपयोगी  पडतो. डॉगफिश (मुशी) या माशाच्या जबडयातील हायोमँडिब्युलर कास्थी  आणि जमिनीवर राहणाऱ्या पृष्ठवंशी प्राण्याच्या कानातील रिकिबीचे हाड समजातीय  आहेत परंतु त्यांची कार्ये वेगवेगळी आहेत. हायोमँडिब्युलर कास्थी जबडयाला  आधार देते तर रिकिबीचे हाड ध्वनितरंग ग्रहण करते. तसेच अँफिऑक्ससची पूर्व -अवटू गंथी व पृष्ठवंशी प्राण्याच्या शरीरातील अवटू गंथी समजातीय असली, तरी  त्यांचे कार्य  वेगवेगळे आहे. पूर्व-अवटू ग्रंथी अन्न गहण करणे व त्याचा संचय करणे ही  कार्ये करते, तर अवटू ग्रंथी हार्मोन स्रवते.

ओएन यांना असे आढळले की, प्राण्यातील काही अवयव एकाच प्रकारचे कार्य  करतात परंतु त्यांची उत्पत्ती एकाच ठराविक पद्धतीची नसते. उदा., पक्ष्याचा पंख  आणि कीटकाचा पंख. पक्ष्याचा पंख त्याच्या पुढील पायापासून तयार झालेला असतो, तर कीटकाचा पंख त्याच्या शरीराच्या बाह्य त्वचेपासून तयार होतो परंतु हे  दोन्ही प्रकारचे पंख पक्ष्याला व कीटकाला हवेत उडण्यासाठी उपयोगी पडतात.  खेकड्याचा पाय व चतुष्पाद प्राण्याचा पाय यांचे कार्य चालण्याचे असले, तरी त्यांची  रचना व निर्मिती वेगळ्या प्रकारांनी होत असते. अशा तऱ्हेच्या वेगळ्या प्रकाराने  उत्पन्न झालेल्या परंतु एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या अवयवांना समरूप  अवयव म्हणतात.

ओएन यांच्या मते नेहमीच समजात अवयव एकाच प्रकारे उत्पन्न होत  नाहीत. प्राण्यांच्या अंडयात प्रत्येक अवयव निर्माण होण्याच्या काही ठराविक जागा  असतात. या जागा निरनिराळ्या जातीच्या प्राण्यांच्या अंडयात वेगवेगळ्या ठिकाणी  असतात. राना फुस्का या बेडकामध्ये डोळ्याचे भिंग विशिष्ट जातीच्याकोशिकेपासून (पेशीपासून) निर्माण होते परंतु यासाठी दृष्टि-चषकापासून  कोशिकांना प्रेरणा मिळणे जरूरीचे असते. राना एस्कुलेंटा या बेडकामध्ये  डोळ्यातील भिंग कोशिकेपासून तयार होत असले, तरी दृष्टि-चषकाकडून प्रेरणा  मिळण्याची गरज नसते. दृष्टि -चषकाचा भाग डोळ्यातून काढून टाकला, तरी  डोळ्यात भिंग तयार होते परंतु असे असले, तरी या दोन्ही जातींच्या बेडकांच्या  डोळ्यांतील भिंगाची समजातता नाकारता येत नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते समान गुण  असणाऱ्या जनुकाच्या प्रभावामुळे तर काहींच्या मते वेगवेगळे गुण असणाऱ्याजनुकांच्या प्रभावामुळे समजातीय अवयव निर्माण होतात. उदा., ड्रॉसोफिला  माशीच्या डोळ्याचा रंग. या माशीचे डोळे तांबडे असतात परंतु या माशीपासून  पांढऱ्या डोळ्याच्या माशाही उत्पन्न होतात. डोळ्यांचा रंगआनुवंशिकतेवर  अवलंबून नसतो. या प्रकारच्या समजाततेला’सुप्त समजातता ‘ असे म्हणतात.

ओएन (१८६६) यांनी समजाततेचे पुढील तीन प्रकार ठरविले आहेत. (१) सामान्य  समजातता : एखादया प्राण्याच्या अवयवाचे त्याच्या पूर्वजाच्या अवयवाशी असणारे साम्य (२) विशिष्ट समजातता : वेगवेगळ्या जातींच्या प्राण्यांच्या अवयवांतील साम्य. यात त्यांच्या  मूळ पूर्वजाच्या अवयवाचा विचार केला जात नाही आणि (३) क्रमिक समजातता :  एकाच प्राण्याच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत असणाऱ्या अवयवांची एकाच प्रकारची  रचना. उदा., ज्या प्राण्यांचे शरीर खंडयुक्त आहे अशा प्राण्यांच्या प्रत्येक खंडाची  लक्षणे एकमेकांसारखी असतात (उदा., गांडूळ). तसेच पृष्ठवंशी प्राण्यांच्या  शरीरातील मणक्याची हाडे व पक्ष्याच्या शरीरावरील पीसे, खेकडयाच्या वेगवेगळ्या  खंडावरील अवयव इत्यादी.

ई. रे. लँकेस्टर यांनी एका मूळ पूर्वजापासून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या  प्राण्यांच्या अवयवांच्या समजाततेला होमोनिमी (समार्थकता) अशी संज्ञा दिली आहे  आणि क्रमिक समजातता व समरूपता यांना त्यांनी’होमोप्लॅसी ‘ अशी संज्ञा दिली  आहे परंतु लँकेस्टर यांच्या वरील संज्ञा इतर शास्त्रज्ञांनी स्वीकारल्या नाहीत.

पहा : क्रमविकास डार्विन, चार्ल्स रॉबर्ट.

संदर्भ : 1. Jessop, N. M. Biosphere-A Study of Life, New Jersey, 1970.

             2. Johnson, W. H. Delanney, L. E. Essentials of Zoology, New York, 1969.

             3. Lull, R. S. Organic Evolution, New Delhi, 1976.

रानडे, द. र.