समघनता रेषा : साधारणपणे वातावरणातील हवेची घनता एखादया क्षैतिज किंवा समदाब पृष्ठावर सर्व ठिकाणी सारखी नसते. एखादया पृष्ठावर हवेच्या घनतेचे एक ठराविक मूल्य असलेल्या ठिकाणांस जोडणाऱ्या रेषेस समघनता रेषा असे संबोधिले जाते. ज्या पृष्ठावर हवेची घनता सर्वत्र सारखी आहे अशा पृष्ठास समघनता पृष्ठ असे म्हणतात. अशी पृष्ठे साधारणपणे क्षैतिजही नसतात आणि समदाबही नसतात. हवेच्या घनतेचा व्यस्तांक म्हणजे हवेचे विशिष्ट आकारमान होय. त्यामुळे समघनता पृष्ठ ह समविशिष्ट आकारमान पृष्ठही असते. तसेच समघनता रेषा ह्या समविशिष्ट आकारमान रेषाही असतात. एखादया विशिष्ट तापमानिक रचनेमुळे वातावरणात समघन पृष्ठ आणि समदाब पृष्ठ जर समांतर असतील, तर अशा वातावरणास समांतर दाबघनता वा समदाब (बॅरोट्रॉपिक) वातावरण असे संबोधिले जाते पण समदाब व समघनता पृष्ठ समांतर नसतील, तर त्या वातावरणास असमांतर दाबघनतेचे वा दाबप्रवण (बॅरोक्लिनिक) वातावरण असे म्हणतात. पृथ्वीचे वातावरण नेहमीच असमांतर दाबघनता असते. कारण सूर्यापासून प्राप्त होणारे प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) अक्षांशावर अवलंबून असल्यामुळे वातावरणात कोणत्याही क्षैतिज अथवा समदाब पृष्ठावर तापमान ऱ्हास रेखांशीय असतो.

समांतर दाबघनता वातावरण ही एक संकल्पना आहे. असे आढळून आले आहे की, पृथ्वीच्या वातावरणात सु. ८ किमी. उंचीच्या पृष्ठावर हवेची घनता सर्वत्र आणि सर्वकाळ साधारणपणे सारखी असते.

संदर्भ : 1. Huske, R. E. Glossary of Meteorology, Boston, 1959.

2. McIntosh, D. H. Meteorological Glossary, London, 1963.

गोखले, मो. ना. मुळे, दि. आ.