सदाफुली : (हिं. सदाबहार इं. मादागास्कर पेरिविंकल रेड पेरिविंकल लॅ. लॉक्नेरा रोझिया, व्हिंका रोझिया, कॅथरॅन्थस रोझियस, कुल-अपोसायनेसी). या उभ्या वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्ष जगणाऱ्या) ओषधीय [⟶ ओषधी] फुलझाडांचे मूलस्थान मादागास्कर (मॅलॅगॅसी) असून दोन्ही गोलार्धांच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात तिचे सर्वत्र स्वाभाविकीकरण झाले आहे. काहींच्या मते वेस्ट इंडिज हे तिचे मूलस्थान असावे. हिच्या प्रजातीत एकूण पाच जाती असून भारतात आणून लावलेली ही जाती बागेत व क्वचित इतरत्रही आढळते. ती ०·३- ०·९ मी. उंच वाढते. तिची पाने साधी, समोरासमोर, व्यस्त अंडाकृती, दीर्घवृत्ताकृती किंवा लांबट व चकचकीत असतात. सामान्यतः २-३ फुले कक्षास्थ (पानांच्या बगलेत) व कुंठित (मर्यादित) फुलोऱ्यात झुपक्यांनी वर्षभर येतात, ती द्विलिंगी व अपछत्राकृती (किंवा) समईसारखी असतात. पेटिकाफळ दंडगोलाकृती (उभे व लांबट) असून त्यात पुष्कळ बिया असतात. पांढृया फुलाचा आल्बा, पाकळ्या पांढृया व मध्यभाग (कंठात) गुलाबी ते जांभळट लाल रंगाचा ऑसेलेटा व एकसारख्या गुलाबी फुलांचा रोझियस हे तीन प्रकार लागवडीत आढळतात. फुलाची सामान्य संरचना व वनस्पतीची इतर शारीरिक लक्षणे ⇨अपोसायनेसी कुलात किंवा करवीर कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
सदाफुलीची सामान्यत : बागेत लागवड करतात, तसेच कुंडीतही लावतात. तिची लागवड बिया लावून व रोपे करून अगर छाटकलमे लावून करतात. सर्व प्रकारची जमीन तिला चालते. उन्हाळी फुलांच्या ताटव्यांसाठी, चौफेर लावण्यासाठी व शैलोदयानात (खडकाळ वाफ्यात) लावण्यासाठी ती सोईची असते. कधीकधी सदाफुली पडीक जागी व रेताड प्रदेशात आपोआप तणासारखी वाढलेली आढळते. फांदयांची दाटी व ती काष्ठमय होत असल्यामुळे दर चार महिन्यांनी तिची छाटणी करतात. हेक्टरी एक वर्षाच्या झाडांपासून ३·५ टन पानांचे व १·५ टन मुळांचे उत्पादन होते.
नाताळ आणि दक्षिण आफ्रिकेच्या इतर विविध भागांत, तसेच भारतात व श्रीलंकेत या वनस्पतीचा उपयोग मधुमेहावर करतात. ती खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होते. पानांचा रस गांधीलमाशीच्या दंशावर लावतात.पानांचा फांट (गरम पाण्यात भिजत ठेचून काढलेला अर्क) स्त्रियांच्या मासिक अतिस्रावावर देतात. मूळ विषारी असून दीपक (भूक वाढविणारे) असते.
सदाफुलीच्या सर्व भागांत सु. ६६ व विशेषतः मुळाच्या सालीत अनेक अल्कलॉइडे असतात. अजमलीन, सर्पेंटिन व रेसरपीन ही तीन ⇨सर्पगंधा गटातील अल्कलॉइडे असून त्यांचे सदाफुलीतील प्रमाण सर्पगंधेच्या मुळीतल्यापेक्षा जास्त असते. सदाफुलीतील अल्कलॉइडांमध्ये सर्पगंधेमधील अल्कलॉइडांसारखीच पण बऱ्याच जास्त प्रमाणात रक्तदाब कमी करण्याचा, शामक व प्रशामक (शांत करणारे) गुणधर्म असतात. त्यामुळे ऐच्छिक (इच्छानुवर्ती) स्नायू शिथिल होतात व केंद्रिय तंत्रिका तंत्रात (मध्यवर्ती मज्जासंस्थेत) अवसाद निर्माण होतो.
व्हिन्ब्लास्टाइन व व्हिनकिस्टाइन ही दोन अल्कलॉइडे कर्करोगावर वापरतात. भारतात महाराष्ट्रातील पुणे विदयापीठ व राष्ट्रीय रासायनिक प्रयोग-शाळा येथे सदाफुलीतून व्हिन्ब्लास्टाइन अल्कलॉइड वेगळे करण्याचे महत्त्वाचे कार्य यशस्वीपणे केले गेले (जुलै १९८०). तत्पूर्वी ते अमेरिकेत व हंगेरीत आणि इतर काही देशांत वेगळे करून त्यांचे व्यापारी उत्पादनही केले होते. १९६१ मध्ये ते अमेरिकेतील बाजारात उपलब्ध झाले. १९६८ मध्ये ह्या वनस्पतींचा अर्क अर्बुदावर गुणकारी असल्याचे प्रसिद्ध झाले होते. बाजारात व्हिन्ब्लास्टाइन ‘ व्हेल्डे ’ या नावाने आयात औषध उपलब्ध आहे. इतर देशांतील उत्पादनात वापरलेल्या तंत्रापेक्षा भारतातील उत्पादन पद्धती अधिक सोपी व कमी खर्चाचे आहे असे आढळले आहे. व्हिन्ब्लास्टाइन प्रमाणेच दुसरे अल्कलॉइड, व्हिनकिस्टाइन हेही उपलब्ध असून त्याचा उपयोग फक्त ल्यूकेमियावर (रक्ताच्या कर्करोगावर) करतात, मात्र सदाफुलीतून हे अत्यल्प प्रमाणात मिळते. हॉजकिन रोग (विशिष्ट अवयवातील लसीका गंथीची वाढ) व लिंफोमा (लसीका मांसार्बुद), विशिष्ट प्रकारचा कार्सिनोमा (मारक उपकला अर्बुद) इ. रोगांवर व्हिन्ब्लास्टाइन व व्हिनकिस्टाइन गुणकारी असल्याचे पूर्वीच सिद्ध झाले आहे. लहान मुलांच्या चिरकारी ल्यूकेमियावरील चिकित्सेत व्हिनकिस्टाइनचा विशेष उपयोग होतो. अजमलीन ह्या अल्कलॉइडाचा उपयोग वैदयकात होऊ लागला आहे. आयात माल फार खर्चाचा असल्याने मोठया प्रमाणात भारतात बनविलेला माल बराच स्वस्तात मिळू शकेल असे मानले जाते.
रोग : सदाफुलीला केवडा रोग होतो. त्याबरोबरच देठांना पात्यांचे स्वरूप येणे, पानांची गुच्छासारखी मांडणी होणे ही लक्षणे एका विषाणू [⟶ व्हायरस] रोगाची निदर्शक असतात. तसेच चंदनाप्रमाणे ‘ स्पाइक रोग’ ही होतो, यामुळे पाने लहान होऊन पेरी जवळजवळ येतात व एकंदरीत वनस्पतीला झुबक्याचे स्वरूप येते. पावसाळ्यात रोपटयाची ‘ कूज ’ होते, ‘ मर ’ मुळेही सदाफुलीची हानी होते. ह्या सर्व उपद्रवकारकांवर योग्य ते उपाय करणे आवश्यक असते.[⟶ कवकनाशके].
सांकपी : (सं. सांखफुली, सांखी, लॅ. लॉक्नेरा प्युसिला). सदाफुलीच्या प्रजातीतील ही भारतीय जाती प. हिमालय ते द. भारतापर्यंत साधारण सर्वत्र आढळते. ही अनेक शाखायुक्त (अनेक फांद्यांची) सु. १५-६० सेंमी. उंच व वर्षायू ओषधी, शेतात व गवताळ रानात तणाप्रमाणे वाढलेली आढळते. हिला पांढरी फुले एकेकटी किंवा जोडीने येतात. पेटिकाफळे बारीक असून इतर लक्षणे सदाफुलीप्रमाणे असतात. गुरांना ही विषबाधा करते, त्यामुळे त्यांना तात्पुरते अंधत्व येते व सर्वांगावर पित्ताच्या गांधी उठतात. सुक्या वनस्पतीचा काढा तेलात उकळून कटिशुलावर (करक भरल्यास) चोळण्यास वापरतात.
पहा : अपोसायनेसी कवकनाशके सर्पगंधा.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.
2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, New Delhi, 1975.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.