संवेदनाहरण : (बधिरीकरण स्थानिक असंवेदनत्व). शरीराच्या कोणत्याही भागावर एखादी मर्यादित स्वरूपाची, दीर्घकाळ न चालणारी आणि रूग्णाला अनेक दिवस रूग्णालयात राहण्याची आवश्यकता नसलेली शस्त्रक्रिया करावयाची असल्यास बधिरीकरण उपयुक्त ठरते. या तंत्रात शरीराचा केवळ एखादा विशिष्ट भाग संवेदनाहीन केला जातो. रूग्णाचे शुद्धीहरण होत नसल्यामुळे नंतरच्या गुंतागुंती कमी प्रमाणात होऊन तो लगेच हिंडू फिरू लागतो. [→ शुद्धिहरण].

पाश्चात्त्य वैदयकात या तंत्राची सुरूवात कोकेनाच्या वापराने झाली. पेरू देशातून यूरोपात आलेल्या कोका या वनस्पतीच्या पानांचा अर्क (कोकेन) १८६० मध्ये तयार झाला. त्याचा मानसिक परिणाम सिग्मंड फॉइड यांनी व डोळ्याच्या पृष्ठभागावरील संवेदनाहारक परिणाम त्यांचे सहकारी कार्ल कोल्ल्र यांनी अभ्यासले (१८८४). तेव्हापासून सु. २० वर्षे कोकेन विविध प्रकारे वापरले गेले. त्याची रासायनिक संरचना उलगडल्यावर (१८९८) मानवनिर्मित रसायनांची निर्मिती होऊ शकली. या वर्गातील पहिला पदार्थ प्रोकेन (नोव्होकेन) विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून अनेक वर्षे लोकप्रिय ठरला. अधिक परिणामकारक आणि अनिष्ट परिणामांपासून मुक्त द्रव्यांच्या शोधाचे फलित म्हणून सध्या उपलब्ध असलेली बधिरी-करणाची द्रव्ये पुढील होत : झायलोकेन, डायब्युकेन, टेट्राकेन, मेपिव्हाकेन, ब्युपिव्हाकेन, प्रायलोकेन, प्रॅमॉक्सीन इत्यादी.

बधिरीभवनाची प्रक्रिया : तंत्रिकांमधील (मज्जापेशींमधील) संदेश-वहनाची प्रक्रिया त्यांच्या तंतूंच्या पटलातील सोडियम, पोटॅशियम व कॅल्शियम आयनांच्या (विद्युत् भारित अणूंच्या) हालचालींवर अवलंबून असते. या आयनांची पटलातून आरपार होणारी देवाण-घेवाण पटलाच्या पृष्ठभागावरील विद्युत् भारात बदल घडवून आणते व त्यामुळे संदेश (आवेग) पुढे सरकत असतो. संवेदनाहारक द्रव्याच्या रेणूंमुळे आयनांची देवाण-घेवाण बंद होऊन पटलावरील विद्युत् भार स्थिर राहतो. त्यामुळे या क्रियेला ‘ पटल स्थिरीकरण ’ असेही नाव आहे. तंत्रिका तंतूंच्या (मज्जा तंतूंच्या) जाडीनुसार बधिरक द्रव्यांच्या रेणूंची आत प्रवेश करण्याची सुलभता बदलते. त्यामुळे प्रथम सी (C) वर्गातील तंतू (सर्वांत कमी जाडीचे) बाधीत होतात. खाजणे, सौम्य वेदना, तापमान या संवेदना त्यामुळे प्रथम लुप्त होतात. नंतर क्रमाक्रमाने बी (B) तंतू-स्वायत्त तंत्रिका तंत्राचे नियंत्रण जाणे- व शेवटी ए (A) तंतू- ऐच्छिक स्नायूंवरील नियंत्रण, तीव्र स्वरूपाच्या वेदना, स्पर्श संवेदना यांचा लोप होणे- अशी बधिरीभवनाची क्रिया घडून येते. त्यामुळे असंवेदनत्वाबरोबरच शेवटी तेथील स्नायूंच्या हालचालीही मंदावतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

बधिरीकरणाच्या पद्धती : कोणत्याही संवेदनेचा तंत्रिका तंत्रांमधील मार्ग पुढीलप्रमाणे असतो : त्वचा किंवा श्लेष्मल (बुळबुळीत) पटलातील संवेदना ग्राही ⟶ तंत्रिका तंतूंचे सूक्ष्म जाळे ⟶ तंत्रिका शाखा ⟶ मोठी तंत्रिका ⟶ मेरूरज्जूला जोडणारे मूळ ⟶ मेरूरज्जूमधील तंत्रिकांचा संवेदी मार्ग ⟶ मेंदूमधील थॅलॅमस हे केंद्र ⟶ प्रमस्तिष्क (संवेदनेची जाणीव). या मार्गातील शेवटचे दोन टप्पे सोडून इतर कोणत्याही स्थळी बधिरक द्रव्य प्रविष्ट करून संवेदनाहरण घडवून आणता येते. त्यानुसार पुढील पद्धती प्रचलित आहेत : (१) पृष्ठभागावर बेंझोकेन, डायब्युकेन, प्रॅमॉक्सीन यांसारखी औषधे द्रवाचा फवारा, मलम, थेंब यांसारख्या रूपात लावणे. डोळे, नाक, घसा, मलमार्ग, मूत्रमार्ग, श्वसन मार्ग यांमध्ये वेदनाहरणासाठी किंवा उपकरणे आत घालण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते. एथिल क्लोराइड (फवारा) हा द्रव त्वचा गोठवून तात्पुरता परिणाम घडवितो. (२) पृष्ठभागाच्या खालील ऊतकस्तरात (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांच्या म्हणजे पेशीसमूहांच्या थरात) द्रव टोचणे (अंतःस्पंदन किंवा अंतःभरण). सर्वाधिक वापरात असलेल्या या पद्धतीने अनेक किरकोळ शस्त्रक्रिया केल्या जातात. उदा., जखम शिवणे. (३) तंत्रिकेच्या शाखेच्या जवळ द्रव टोचून त्या शाखेच्या सर्व उपशाखांशी संबंधित क्षेत्र बधीर करणे. अंतःस्पंदनापेक्षा या पद्धतीत कमी द्रावण लागते. उदा., एका मात्रेत अर्धा जबडा- आठ दातांची मुळे- बधीर होऊ शकतात. तंत्रिका रोध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतीचा एक विशेष प्रकार क्षेत्ररोध हा आहे. पोटाच्या त्वचेसारखे विस्तीर्ण क्षेत्र बधीर करण्यासाठी क्षेत्राच्या संपूर्ण परिघातील तंत्रिका शाखांच्या समीप औषध टोचून हा परिणाम घडवून आणता येतो. (४) मेरूरज्जूच्या शाखा मणक्यांच्यामधील जागेतून बाहेर पडतात, त्या ठिकाणी द्रव टोचणे याला परापृष्ठवंशीय रोध असे म्हणतात. (५) पाठीच्या कण्यात, मेरूरज्जू व त्यातून निघणारी शाखांची मुळे यांच्या परिसरात द्रव टोचणे, मेंदू व मेरूरज्जू यांच्याभोवती असणाऱ्या तीन पटलांपैकी जालपटलाच्या आणि तंत्रिकीय ऊतकाला चिकटून असलेल्या मृदुतानिकेच्या मधील जागेत जो स्वच्छ द्रव असतो त्यात बधिरक द्रव्य टोचता येते. अंतःप्रावरकीय किंवा अध:जालीय सूचिकाभरण या नावांनी ओळखले जाणारे हे तंत्र शरीराच्या खालच्या अर्ध्या भागातील कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी वापरता येते. सुई टोचण्याची पातळी, औषधाच्या द्रावाचा जडपणा (विशिष्ट गुरूत्व) आणि रूग्णाला बसविण्याची किंवा आडवे ठेवण्याची स्थिती यांमध्ये फेरफार करून शरीराच्या आवश्यक तेवढय भागातील तंत्रिकांचे बधिरीकरण करता येते. या तंत्रात मेरूरज्जूमधून बाहेर पडणाऱ्या अनुकंपी तंत्रिकांचे बधिरीकरण झाल्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. तसेच औषध प्रमस्तिष्काच्या दिशेने मोठया प्रमाणात गेल्यास श्वसन आणि इतर महत्त्वाच्या क्रियाही बाधीत होतात. हे तंत्र फार मोठया प्रमाणात प्रचलित आहे. [→ तंत्रिका तंत्र].

जालतानिका व दृढतानिका या दोन्ही पटलांच्या बाहेरील मोकळ्या जागेत म्हणजेच अधिदृढीय अवकाशात औषध टोचणेही शक्य असते. पोटाच्या खालच्या भागातील आणि श्रोणीमधील शस्त्रक्रियांसाठी हे तंत्र उपयुक्त ठरते. याच तंत्राचा दुसरा एक प्रकार म्हणजे मेरूपुच्छीय वेदनाहरण प्रसूतिवेदना कमी करण्यासाठी विशेष उपयुक्त अशा या पद्धतीत पाठीच्या कण्याच्या सर्वांत खालच्या भागात म्हणजे त्रिकास्थीय रंधातून सुई आत घातली जाते. मेरूरज्जू आणि दृढतानिकेचा कोश जेथे संपतात, त्याच्या खालच्या पातळीवर म्हणजे मेरूपुच्छाच्या समीप औषधाचा प्रवेश होत असल्याने मर्यादित क्षेत्राचे आणि सुरक्षित वेदनाहरण साध्य होते[→ प्रसूतिविज्ञान].

दुष्परिणाम व सावधानता : शुद्धीहरणाच्या मानाने बधिरीकरण अधिक सुरक्षित असले, तरी ॲलर्जीजन्य प्रतिक्रिया, रक्तदाब एकाएकी कमी होणे, मेरूरज्जूमधील योजनेनंतर डोके दुखणे, प्रमस्तिष्कीय उत्तेजनामुळे आकडी आल्यासारखे झटके येणे यांसारख्या घटनांची शक्यता लक्षात घ्यावी लागते. त्या टाळण्यासाठी द्रव्याच्या वापराचा पूर्वेतिहास जाणून घेऊन आवश्यक वाटल्यास सूक्ष्म मात्रेने चाचणी घेतली जाते. तसेच कमीतकमी संहतीचा द्राव कमीत कमी मात्रेत दिला जातो. पुनःपुन्हा मात्रा दयावी लागल्यास त्याची नोंद ठेवून एकूण मात्रा विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही हे पाहिले जाते. सार्वदेहिक परिणाम टाळण्यासाठी औषधाच्या द्रावात अत्यल्प संहतीत ॲड्रीनॅलीन हे वाहिनी संकोचक द्रव्य मिसळलेले असते. सुई एखादया रक्तवाहिनीत किंवा स्नायूत प्रवेश करणार नाही याचीही काळजी घेण्यात येते. किरकोळ शस्त्रक्रिया असली, तरीही आघात किंवा आकडी यांसारख्या गुंतागुंतीवर उपचारांची तयारी ठेवली जाते.

पहा : शस्त्रक्रिया तंत्र शुद्धीहरण संवेदना तंत्र.

संदर्भ : 1. Cousins, M. J. Bridenbaugh, P. O., Eds., Neural Blockade in Clinical Anesthesia and Management of Pain, 1988.

2. Dripps, R. D. and others, Eds., Introduction to Anesthesia : The Prin ciples of Safe Practice, 1988.

3. Miller, R. D., Ed., Anesthesia, 1986.

4. Stoelting, R. K. Pharmacology and Physiology in Anesthetic Practice, 1987.

श्रोत्री, दि. शं.