शक्तिपीठ : शक्तीच्या – देवीच्या – उपासनेची काही विशिष्ट स्थाने ही ‘शक्तिपीठे’ म्हणून ओळखली जातात. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक ठिकाणच्या भैरवाचे आणि शक्तीचे नाव वेगळे असते. बहुतेक पुराणांत शक्तिपीठांची संख्या एकावन्न मानलेली असली, तरी काही ग्रंथातून ही संख्या वेगवेगळी –चार, सात, आठ, अठरा, बावन्न इ. दाखविण्यात आलेली आहे. देवी भागवतात एकशे आठ पीठांचा निर्देश असून तेथे फक्त पीठस्थाने आणि त्याच्या अधिदेवता एवढेच तपशील दिले आहेत. तुळजापूर (भवानी), कोल्हापूर (अंबाबाई), माहुरझरी (रेणुका) आणि वणी (सप्तशृंगी देवी) ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शक्तिपीठे मानली जातात. ह्या शक्तिपीठांचा उदगम दोन पुराणकथांशी निगडित आहे. त्या कथा अशा : दक्ष प्रजापतीची मुलगी सती (पार्वती) ही शंकराला दिलेली होती. दक्ष प्रजापती आणि शंकर या दोघांत वितुष्ट होते. पुढे दक्ष प्रजापतीने ‘बृहस्पतिसव’ नावाचा यज्ञ करावयाचा ठरविले. ह्या यज्ञाचे आमंत्रण शंकराला मात्र दिले नाही. तथापि सती मात्र पतीचा विरोध असताही हट्टाने त्या यज्ञप्रसंगी उपस्थित राहिली. त्या वेळी प्रत्यक्ष पित्याकडून झालेला अपमान असह्य होऊन सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वत:स जाळून घेतले. शंकराला हे समजल्यानंतर त्याने आपल्या जटेतून वीरभद्राला उत्पन्न केले व त्याच्याकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून दक्षालाही ठार मारले आणि दु:खावेगाने यज्ञस्थळी जाऊन शंकराने सतीचे निष्प्राण शरीर मस्तकावर घेऊन तांडव नृत्य सुरू केले. त्याला शांत करण्याच्या हेतूने विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिवाचे अवयव तोडण्यास प्रारंभ केला. सतीच्या मृत देहाची अंग-प्रत्यंगे जेथे जथे पडली, तेथे तेथे शक्तिपीठे निर्माण झाली.

शक्तिपीठांच्या निर्मितीसंदर्भात जी दुसरी पुराणकथा आहे ती अशी : विष्णुभक्त अंबरीष राजाच्या एकादशीच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास मुनी आपल्या साठ हजार शिष्यांसह सकाळीच ह्या राजाकडे आले. त्या दिवशी राजाच्या व्रताचे उद्यापन होते. दुर्वास ऋषी वेळेवर न परतल्याने त्यांच्यासारख्या थोर अतिथीला सोडून व्रताचे उद्यापन करायचे, की अतिथी आल्यावर जेवून व्रत मोडायचे हा प्रश्न राजाला पडला. शेवटी राजाने तुळशीचे तीर्थ घेऊन उपवास सोडला आणि भोजनासाठी आलेल्या इतर लोकांना जेवू घातले. झाल्या प्रकाराने दुर्वास संतापले आणि त्यांनी राजाला शाप दिला, की ह्या व्रताचे फळ तुला मिळणार नाही आणि तुला शंभर जन्म घ्यावे लागतील. मग विष्णूने अंबरीषाला त्या शापापासून अभय दिले आणि विष्णूसह सर्व देवांनी दुर्वासांच्या शापवाणीने अंबरीषाला मिळणारे शंभर जन्म आपसात वाटून घेतले. त्यांपैकी एकावन्न जन्म देवीने स्वीकारले. त्यामुळे एकावन्न शक्तिपीठे निर्माण झाली.

संदर्भ :  १. ढेरे, रा.चिं. शक्तिपीठांचा शोध, पुणे, १९७३.

             २. प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरूप (देवीकोश), खंड १ व २, पुणे, १९६७, १९६८.

कुलकर्णी, अ. र