शेअरबुर्ग : फ्रान्सच्या मांश विभागातील सर्वांत मोठे शहर, नाविक तळ असलेले प्रमुख सागरी बंदर व एक हवेशीर ठिकाण. लोकसंख्या २८,३२४ (१९८२). फ्रान्सच्या वायव्य भागातील कोतांतँ द्वीपकल्पाच्या उत्तर टोकाशी, इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. दिव्हेत ही छोटीशी नदी येथेच इंग्लिश खाडीला मिळते. प्राचीन काळापासून हे शहर अस्तित्वात असावे. सीमारक्षक चौकी म्हणून रोमनांनी याची स्थापना केली असावी. मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे फ्रेंच व इंग्रज यांच्यात वारंवार येथे लढाया झाल्या. इ.स. तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत इंग्रजांनी वारंवार हल्ले करून ते आपल्या ताब्यात ठेवले होते. लाटांचा जोर कमी करून बंदरातील गोदी सुरक्षित राखण्यासाठी येथे कृत्रिम रोधक किंवा मोठा बांध (ब्रेकवॉटर) घालण्यात आला आहे. या बांधकामास चौदाव्या लूईच्या कारकीर्दीत सुरुवात झाली व सत्तर वर्षांनंतर बांध पूर्ण झाला. याच काळात शहराभोवती तटबंदी घालण्यात आली. सप्तवार्षिक युद्धात ब्रिटिशांनी शहराचा विध्वंस केला होता. १७७९ ते १८५३ या कालावधीत या बंदराचा हळूहळू विकास होत गेला. दुसऱ्या महायुद्धकाळात येथे जर्मनीचा लष्करी तळ होता. १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हे शहर मुक्त केले.
चौधरी, वसंत