शूस्टर, सर आर्थर : (१२ सप्टेंबर १८५१–१४ ऑक्टोबर १९३४). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. त्यांनी ऋण किरणांकरिता विद्युत्‌ भार आणि द्रव्यमान यांचे गुणोत्तर निश्चित करण्यासाठी चुंबकीय विचलनाचा उपयोग केला. या संशोधनामुळे इलेक्ट्रॉनचा शोध लागण्यास मदत झाली. त्यांनी वर्णपटविज्ञान व विशेषत: सूर्याचे तेजोवलय (किरीट) व तारे यांच्या वर्णपटांशी संबंधित विषय, उष्णतामापन, प्रारणमापन, भूकंपविज्ञान आणि भूचुंबकत्व यांमध्ये संशोधन केले.

शूस्टर यांचा जन्म फ्रॅंकफुर्ट आम मेन (जर्मनी) येथे व शिक्षण फ्रॅंकफुर्ट जिम्नॅशियम आणि ओवेन्स महाविद्यालय (मॅंचेस्टर) येथे झाले. त्यांना वर्णपट विश्लेषणासंबंधीच्या संशोधनाची प्रेरणा हेन्री रॉस्को यांच्याकडून मिळाली. नायट्रोजनच्या वर्णपटासंबंधीचा संशोधन प्रबंधही त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांनी ⇨ गुस्टाफ किरखोफ यांच्या मार्गदर्शनाखाली हायडल्‌बर्ग येथे अध्ययन केले आणि १८७३ मध्ये पीएच्‌.डी. पदवी संपादन केली. १८७५ मध्ये ते ब्रिटिश नागरिक झाले. त्यांनी १८७३ मध्ये ओवेन्स येथे भौतिकीच्या प्रयोगशाळेत प्रयोगनिर्देशक म्हणून काम केले. १८७५ मध्ये सयाम (थायलंड) येथे गेलेल्या ग्रहण अभ्यास मोहिमेचे रॉयल सोसायटीतर्फे त्यांनी नेतृत्व केले. १८७६–८१ मध्ये त्यांनी मॅक्सवेल यांच्याबरोबर केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम केले. त्यांनी लॉर्ड जॉन विल्यम स्ट्रट रॅली यांना ओहमचे केवल (निरपेक्ष) मूल्य निश्चित करण्यात मदत केली. ओवेन्स महाविद्यालयात व मॅंचेस्टर विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले (१८८१–१९०७). 

शूस्टर यांनी `वायूंचे वर्णपटातील हरात्मक गुणोत्तर’ या आपल्या लेखात काही निवडक पाच मूलद्रव्यांच्या वर्णपटरेषा या जी. जे. स्टोनी यांनी विषद केलेल्या नियमाविरुद्ध इतस्तत: विखुरलेल्या असतात असे दाखविले. त्यांनी स्टोनी यांचे वर्णपटरेषांबद्दलचे विवरण खोडून काढले. तथापि त्यांनी असा निष्कर्ष काढला की, सर्व वर्णपटरेषांना लागू पडणारा एखादा नियम असावा (तोपावेतो अज्ञात असलेला) आणि विशिष्ट परिस्थितीत तो हरात्मक गुणोत्तराच्या नियमाच्या स्वरूपात लागू पडत असावा. ए थिअरी ऑफ ऑप्टिक्‌स (१९०४) या ग्रंथात त्यांनी दाखवून दिले की, पांढऱ्या प्रकाशापासून वर्णपट तयार करणाऱ्या लोलकाचे कार्य जटिल तरंगांचे विभाजन करणाऱ्या हरात्मक विश्लेषकासारखे असते.

निर्वात नलिकेतील वायूंमध्ये विद्युत्‌ विसर्जनाने निर्माण झालेल्या वर्णपटांचे शूस्टर यांनी अध्ययन केले. त्यांनी १८८० मध्ये दाखवून दिले की, वायूंमधून विद्युत्‌ प्रवाह आयनांमुळे  वाहू शकतो,  तसेच एकदा वायू आयनीभूत झाल्यानंतर थोडेसे वर्चस्‌ विद्युत्‌ प्रवाह चालू ठेवण्यास पुरेसे असते.

दररोज आढळणारे चुंबकीय फेरबदल अंतर्गत व वातावरणीय असे दोन प्रकारचे असतात. अंतर्गत बदल पृथ्वीमधील प्रवर्तन प्रवाहामुळे आणि वातावरणीय बदल विद्युत्‌ प्रवाहामुळे होतात हेही त्यांनी सिद्ध केले (१८८९). व्हिल्हेल्म रॉंटगेन यांच्या क्ष-किरण संशोधनानंतर लगेचच १८९६ मध्ये शूस्टर यांनी सुचविले की, क्ष-किरण हे लघू तरंगलांबी असलेली ईथराची अनुप्रस्थ (आडवी) कंपनेच आहेत. शूस्टर यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. त्यांचे स्पेक्ट्रम ॲनॅलिसिस(१८८५), द प्रोग्रेस ऑफ फिजिक्स (१९११) आणि बायोग्राफिकल फ्रॅगमेंट्‌स (१९३२) हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

येलडाल (इंग्लंड) येथे ते मरण पावले.

शिंगटे, सु. र.