शूबर्ट, फ्रांट्‌स पेटर : (३१ जानेवारी १७९७–१९ नोव्हेंबर १८२८). प्रसिद्ध ऑस्ट्रियन संगीतरचनाकार. जन्म व्हिएन्ना येथे. एका गरीब शाळामास्तरचा हा मुलगा. त्याचे बालपण फारसे सुखाचे नव्हते पण सर्व कुटुंब मात्र संगीतवेडे होते. या कुटुंबाचे स्ट्रिंग क्वॉर्टेट्‌सचे कार्यक्रम आजूबाजूच्या गावात लोकप्रिय होते.

रॉयल चॅपेलमधील समूहगायन शाळेत शूबर्टला वयाच्या अकराव्या वर्षी प्रवेश मिळाला. चांगले  संगीतशिक्षण, भरपूर काबाडकष्ट व अन्नाची वानवा असा त्याचा शिक्षणकाल होता. सॅलिएरी नावाच्या उत्तम शिक्षकाजवळ त्याचे शिक्षण झाले (१८१४–१६). पुढे काही काळ लिश्टेंथाल इथे वडिलांच्या शाळेत नोकरी केली. नंतर ही नोकरी सोडून संगीतजीवनास त्याने वाहून घेतले. १८१८ पासून त्याचे वास्तव्य व्हिएन्नात होते. तेथेच प्रसिद्ध जर्मन संगीतकार ⇨ लुट्‌व्हिख व्हान बेथोव्हन कार्यरत होता असे म्हणतात की, व्हिएन्नामधील बोग्नेर्स कॉफी हाउसमध्ये बेथोव्हन एकटा बसलेला असे व आपल्या मित्रांसोबत तिथे आलेला बुजरा व तरुण शूबर्ट भक्तिपूर्ण नजरेने त्याच्याकडे बघत राही.

फ्रांट्‌स योझेफ हायडन व ⇨ व्होल्फ्‌गांग आमाडेउस मोट्‌सार्टप्रणीत अभिजाततावादी संगीतास नव्या सौंदर्यवादी संगीताकडे नेण्याच्या कार्यास बेथोव्हनप्रमाणे शूबर्टनेही हातभार लावला. बेथोव्हनप्रमाणे शूबर्टनेही सिंफनी – सोनाटा व स्ट्रिंग क्वॉर्टेट्‌स रचली तथापि त्याचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे गीतरचना. कवितेच्या भावनिक अंशांस सांगीतिक प्रतिसाद देणे, त्याच्याइतके फार कमी संगीतकारांस जमले. अगदी अल्प आयुष्य लाभूनही त्याने बरीच रचना केली. २१ पियानोफोर्ट सोनाटा व ९ सिंफनी या त्याच्या प्रमुख रचना. याला स्वरधून सुचण्यास कधीच अडचण पडत नसे, असे म्हणतात. व्हिएन्ना येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Frisch, Walter, Ed. Schubert : Critical and Analytical Studies, Neb., 1986.              2. Gal, Hans, Franz Schubert and the Essence of Melody, New York, 1977. 

            3. Hutchings, Arthur, Schubert, London, 1978.                                       

रानडे, अशोक दा.