शूद्रक : मृच्छकटिक या संस्कृत नाटकाचा हा कर्ता मानतात. त्याच्या जीवनाविषयी निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. त्याचा काळही निश्चितपणे सांगता येत नाही. मृच्छकटिकाच्या प्रस्तावनेत त्याच्याविषयी माहिती दिली आहे परंतु ती प्रक्षिप्त असावी. इतिहासात-पुराणांत शूद्रक नावाचे राजे होऊन गेल्याचे आढळते. त्यावरून ‘शूद्रक म्हणजे संवत स्थापणारा विक्रमादित्यच होय’, असाही तर्क केला जातो. राजशेखरच्या मते शूद्रक राजाच्या पदरी असलेल्या रामिल व सौमिल या दोन कवींनी संयुक्त काव्य केले असावे. त्यावरून ह्या दोन कवींनी मृच्छकटिकाची रचना केली असावी व कवी म्हणून शूद्रकाचे नाव घातले असावे, असाही निष्कर्ष काढला जातो. ⇨ कालिदासाने मालविकाग्निमित्र ह्या नाटकाच्या प्रस्तावनेत सौमिल कवीचा उल्लेख केला आहे. त्यावरून हा शूद्रक राजा कालिदासपूर्व असावा, असे दिसते. कथासरित्सागरात उल्लेखिलेला शूद्रक हाच आभीरराजा शिवदत्त होय (इ. स. सु. २५०) असे प्रा. कोनोचे मत आहे. ⇨ आर्थर बेरिडेल कीथच्या मते शूद्रक हे दंतकथेतले नाव आहे. ⇨ वामनकृत काव्यालंकारात, बाणभट्टकृत कादंबरीत आणि ⇨ दंडीकृत दशकुमारचरितात शूद्रकाचा उल्लेख आलेला आहे.    

मृच्छकटिक हे नाटक शूद्रकाचेच आहे किंवा काय याबद्दलही विद्वानांत मतभेद आढळतात. ⇨ भासाच्या नावावर असलेल्या दरिद्रचारुदत्त (चारुदत्त) व मृच्छकटिक या नाटकांत लक्षणीय साम्य आढळल्याने मृच्छकटिक हे भासाचे किंवा अन्य कवीचे असावे व त्याचा संक्षेप दरिद्रचारुदत्त या नावाने केला असावा किंवा दरिद्रचारुदत्त या अपूर्ण नाटकास जोड देऊन मृच्छकटिक हे नाटक अन्य कवीने रचले असावे, असाही तर्क केला जातो. मृच्छकटिक आणि दशकुमारचरित यांच्या भाषेत व आशयात बरेच साम्य असल्याने दंडी हाच या नाटकाचा कर्ता असावा असेही एक मत आहे.    

मृच्छकटिकातील कर्नाटककलहप्रयोग आणि दक्षिण भारतात राहणाऱ्या द्रविड, चोल इत्यादींचा उल्लेख त्याचा कर्ता दाक्षिणात्य वा दक्षिणेकडील रहिवासी असल्याचे दर्शवितो.

पहा : मृच्छकटिक.

संदर्भ : १. तिवारी, रमाशंकर, महाकवि शूद्रक (शूद्रक और मृच्छकटिक), वाराणसी, १९६७.      

            २. वाटवे, केशव नारायण, संस्कृत नाट्य-सौंदर्य, पुणे, १९६२.

पोळ, मनीषा