कुंती – २ :यदुकुलोत्पन्न ‘शूर’ नावाच्या राजाची मुलगी व कृष्णपिता वसुदेवाची बहीण. मूळ नाव पृथा पण कुंतिभोज राजाने तिला दत्तक घेतल्यामुळे ‘कुंती’ असे नाव तिला प्राप्त झाले. अतिथीसत्काराचे  काम तिच्याकडे होते. दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले असता, त्यांची उत्कृष्ट सेवा केल्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी कुंतीस एक मंत्र दिला आणि ‘या मंत्राने ज्या देवतेचे आवाहन करशील, तिच्यापासून तुला पुत्रप्राप्ती होईल’ असा वर दिला. या मंत्रामुळे तिला कौमार्यावस्थेत सूर्यापासून कर्ण हा पुत्र झाला. स्वयंवरानंतर ती पांडूपत्नी झाली. पांडूच्या आग्रहावरून तिला यमधर्मापासून युधिष्ठिर (धर्म), वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन हे पुत्र झाले. पांडूच्या विनंतीवरून तिने माद्रीलाही मंत्रोपदेश केल्यामुळे, माद्रीला अश्विनीकुमारापासून नकुल व सहदेव हे जुळे पुत्र झाले. भारतीय युद्धात तिने कर्णाला पांडवांच्या बाजूने लढण्याचा आग्रह केला होता. भारतीय युद्धानंतर महाप्रस्थानास निघाली असता वणव्यात सापडून तिला मृत्यू आला. 

केळकर, गोविंदशास्त्री