शीराझ : इराणमधील फार्स प्रांताची राजधानी, तसेच एक प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या १०,५३,०२५ (१९९६). इराणच्या दक्षिणमध्य भागात, झॅग्रॉस पर्वतीय प्रदेशात सस.(समुद्रसपाटी)पासून १,५८५ मी. उंचीवर हे वसले आहे. इ.स.पू. सहाव्या शतकापासून येथे वस्ती असावी. तेव्हापासून प्रदीर्घ काळापर्यंत शीराझ हे इराणमधील एक महत्त्वाचे नगर होते. इ.स. सातव्या शतकाच्या अखेरीस हे एक महत्त्वाचे व्यापारी, लष्करी व प्रशासकीय केंद्र बनले. दहाव्या शतकापासून येथील व्यापारी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात व्यापार करीत होते. तेराव्या शतकाच्या सुरुवातीस मंगोलांनी येथे एक मशीद व गढी बांधली. १३९३ मध्ये तैमूरलंगाने या शहराची लुटालूट केली. त्यानंतर सफाविद राजवटीत येथे अनेक नव्या इमारती बांधण्यात येऊन शहर सुशोभित करण्यात आले. १७२४ मध्ये अफगाण आक्रमकांनी हे शहर लुटले. झांड वंशीय करीमखान याच्या कारकीर्दीत (१७५०–७९) शीराझ ही इराणची राजधानी होती. करीमखानचा उत्तराधिकारी आगा मुहंमदखान याने आपली राजधानी तेहरानला हलवली. तेव्हापासून शीराझचे महत्त्व कमी झाले. १६३० व १६६८ मध्ये पुरामुळे तर १८१३, १८२४ व १८५३ मध्ये भूकंपामुळे शहराची खूप हानी झाली होती.

पूर्वीपासूनच मद्य, गालिचे, जडजवाहीर व धातू यांच्या उत्पादनांसाठी शीराझ प्रसिद्ध आहे. वस्त्रे, खनिज तेल, रसायने, सिमेंट, साखर ही येथील इतर उत्पादने आहेत. पर्शियन कवींनी आपल्या काव्यामधून या शहराचे ऋतुसौंदर्य, मद्य, गुलाबांचे बागबगीचे यांची सुंदर वर्णने केलेली आहेत. इराणचे ख्यातनाम कवी ⇨ हाफीज व ⇨ सादी यांची शीराझ ही जन्मभूमी व कर्मभूमी. त्यांची येथील स्मारके व लगतच्या बागा प्रेक्षणीय आहेत. नवव्या शतकातील इमाम रिझाच्या दोन भावांची येथील थडगी पवित्र मानली जातात. येथील शाह चीराघची कबर, नवी मशीद (१२१८), वकील मशीद, मस्जिद-इ-जामी (८७५) चे अवशेष, पर्शियन चर्च, सतराव्या शतकातील मद्रसा इ. पर्यटन स्थळे आहेत. शहरात पेहलवी विद्यापीठ (१९४५) व फार्स संग्रहालय आहे. शीराझच्या ईशान्येस सु. ५० किमी. वर ⇨ पर्सेपलिस या प्राचीन शहराचे अवशेष आढळतात. 

चौधरी, वसंत