शिसे : जड धातुरूप मूलद्रव्य. रंग रुपेरी पांढरा, परंतु हवेत उघडे राहिले असता निळसर करडा. रासायनिक चिन्ह Pb ( शिशाच्या Plumbum या लॅटिन शब्दावरून बनविण्यात आले ). अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ८२. अणुभार २०७.१९. आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील ⟶ आवर्त सारणी] गट ४ अ. वितळबिंदू ३२७·५o से. उकळबिंदू १,७४४o से. विशिष्ट गुरुत्व ११·३४ (१६o से. ला) कठिनता १·५ मोह. संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता) + २ व + ४. विद्युत् विन्यास (अणुकेंद्राभोवतीच्या विविध कक्षांमधील इलेक्ट्रॉनांची संख्या) २, ८, १८, ३२, १८, ४. शिलावरणात विपुलता ०·००१६ टक्के. २०४, २०६, २०७ व २०८ हे द्रव्यमानांकन (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्युट्रॉन यांची एकूण संख्या) असलेले याचे चार स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेले त्याच मूलद्रव्यांचे प्रकार) आहेत. यांपैकी तीन समस्थानिक (द्रव्यमानांक २०६, २०७ व २०८) युरेनियम व थोरियम यांच्या किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म असलेल्या) क्षयाचे उत्पाद आहेत. युरेनियम (२३८) पासून शिसे (२०६), युरेनियम (२३५) पासून शिसे (२०७) आणि थोरियम (२३२) पासून शिसे (२०८) हे समस्थानिक मिळतात. शिसे (२०४) हा क्षय श्रेणीचा घटक नाही. त्यांची सापेक्ष विपुलता शिसे (२०४) १·४८%, शिसे (२०६) २३·६%, शिसे (२०७) २२·६% आणि शिसे (२०८) ५२·३% अशी आहे. यांशिवाय १९४ ते २०३, २०५, २०९ ते २१४ या द्रव्यमानांकांचे किरणोत्सर्गी समस्थानिकही आहेत.

शिशावर हवेतील ऑक्सिडीकरणाने घट्ट व अभिलग्न पटल तयार होते. त्यामुळे धातूचे पुढील विक्रियेपासून चांगले संरक्षण होते.  सामान्य तापमानाला शिसे पाण्यात विरघळत नसले तरी ते विद्रुत (विरघळलेला) ऑक्सिजन असलेल्या पाण्यामध्ये स्पष्ट विरघळते. पिण्याचे पाणी शिशाच्या नळांमधून नेणे अयोग्य असते, कारण त्यामुळे शिशाची विषबाधा संभवते. शिसे विरल नायट्रिक आम्लात लगेच विरघळते. त्यावर हायड्रोक्लोरिक अम्लाची क्रिया सावकाश होते. विरल सल्फ्यूरिक अम्लाचा शिशावर काही परिणाम होत नाही. थंड संहत सल्फ्युरिक अम्लाचा अगदी थोडा परिणाम होतो परंतु उष्ण संहत अम्लाची लगेच क्रिया होते. हायड्रोक्लोरिक किंवा सल्फ्युरिक अम्लाचा शिशाच्या पृष्ठभागावर परिणाम होऊन तयार झालेल्या अविद्राव्य क्लोराइड किंवा सल्फेट आवरणामुळे पुढील विक्रियेला अडथळा होतो. शिसे उभयधर्मी आहे. ते क्षारीय विद्रावामध्ये प्रबल क्षपणकारक आणि अम्लीय विद्रावात अनुकूल असते. शिशापासून अनेक लवणे, ऑक्साइडे आणि कार्बनी-धातू संयुगे तयार होतात.

इतिहास : शिसे आद्य ज्ञात धातूंपैकी एक आहे. त्याचा प्राचीन काळचा नमुना इ. स. पू. सु, ३,००० वर्षांपूर्वीचा आहे. बायबलचा जुना करार यात शिशाचा अनेक वेळा उल्लेख आलेला आहे. प्राचीन ईजिप्तमध्ये मृत्पात्रांना चकाकी आणण्यासाठी आणि दागदागिने तयार करण्यासाठी याचा वापर करीत. रोमन लोकांनी पाण्याच्या नळांकरिता याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. असे काही नळ अजूनही सुव्यवस्थित आणि वापरता येतील अशा अवस्थेत आहेत.

आढळ व उत्पादन : शिसे सर्वत्र आढळते परंतु ते शुद्धरूपात किंवा अमिश्ररूपात क्वचित आढळते. गेलेना (लेड सल्फाइड) ही सर्वात महत्त्वाची धातुक असून जगामध्ये तिच्यापासून शिशाचे उत्पादन मुख्यतः केले जाते. अँग्लिसाइट (लेड सल्फेट PbSO4) आणि सेर्यूसाइट (लेड कार्बोनेट PbCO3), वुल्फेनाइट (लेड मॉलिब्डेट, PbMoO4), पायरोमॉर्फाइट [लेड फॉस्फेट PbCl2 · 3Pb3(PO4)2] व क्रॉकॅइसाइट (लेड क्रोमेट PbCrO4) ही धातुके व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहेत. शिसे युरेनियम आणि थोरियम खनिजांमध्येसुद्धा आढळते. ते किरणोत्सर्गी क्षयापासून प्रत्यक्षपणे मिळते. शिशाची धातुके चांदी, अँटिमनी, आर्सेनिक, बिस्मथ, तांबे आणि जस्त यांच्या धातुकांबरोबर मिश्ररूपात नेहमी आढळतात. शिशाच्या धातुकांच्या संहतीकरणासाठी विविध प्रकारच्या यांत्रिक विलगीकरण प्रक्रिया वापरतात परंतु सल्फाइड धातुकांचे संहतीकरण प्लवन प्रक्रियांनी सामान्यपणे करतात. परावर्तन (वा उघडा चुला) भट्टीमध्ये शिशाचे धातुक चुना व अभिवाहक यांच्याबरोबर भाजून (हवेच्या झोतात ते तापवून) किंवा झोतभट्टीमध्ये धातुक भाजून व प्रगलन करून शिशाचे निष्कर्षण करतात. नंतर परिष्करणाने शिशामध्ये असलेल्या अशुद्धी (मलद्रव्ये) काढून टाकतात. परिष्कृत व्यापारी शिशामध्ये ०·०५ ते ०·१% अशुद्धी राहतात.

जगामध्ये शिशाचे सर्वाधिक उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये होते. अमिरेकेची संयुक्त संस्थाने, रशिया, कॅनडा, पेरू, मेक्सिको, चीन, युगोस्लाव्हिया, मोरोक्को आणि बल्गेरिया हे इतर प्रमुख उत्पादक देश आहेत.

वापर : शिशाचा सर्वाधिक वापर संचायक विद्युत घटांमधील पट्ट्यांकरिता होतो. ७–१२% अँटिमनी आणि कमी प्रमाणात कथिल असलेल्या शिशाच्या मिश्रधातूपासून सच्छिद्र जालकांचे ओतकाम करून या पट्ट्या तयार करतात. यानंतर जास्तीत जास्त वापर टेट्राएथिल लेड (TEL) निर्मितीमध्ये होत असे पण शिशाच्या विषबाधेचा दुष्परिणाम माहीत झाल्यावर घातल्या गेलेल्या बंदींमुळे हा वापर आत नगण्य झाला आहे. दूरध्वनी, दूरचित्रवाणी आणि विजेच्या वाहक तारांकरिता आवरक म्हणून शिशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे पन बहुवारिकाचा विद्युत रोधकासाठी तसेच आवरक म्हणून होत असलेल्या वापराने आता शिसे ह्या क्षेत्रात जवळजवळ वापरीत नाहीत. ह्याच कारणामुळे तसेच विषबाधेच्या शक्यतेमुळे संचायक टाक्यांचे अस्तर अथवा छपरावरील घालावयाच्या पोलादी पत्र्यांचे लेपन म्हणून होणारा शिशाचा वापर बंद झाला आहे. शिसे व अस्बेस्ट्स हे दोन्ही आरोग्याला अहितकारक असल्यामुळे कंपनांच्या शोषणाकरिता व ध्वनिप्रेषण थांबविण्यासाठी बांधकामांत होणारा शिशाचा वापरही थांबला आहे.

शिसे लघुतरंगलांबींच्या प्रारणांचे शोषण चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे ते अणुकेंद्रीय विक्रियक, कणवेगवर्धक, क्ष-किरण उपकरणे आणि किरणोत्सर्गी द्रव्याची साठवणूक करणारे डबे ह्यांभोवती संरक्षक कवच म्हणून वापरले जाते. प्रारण सामग्रीतील खिडक्यांच्या काचाही पुष्कळ प्रमाणात शिसे असलेल्या असतात. लेड झिर्कोनेट आणि लेड टिटॅनेट ह्यांच्या भस्मीकृत मिश्रणाला (लेड झिर्कोनेट टिटॅनेट व्यापारी नाव PZT) दाबविद्युत द्रव्य म्हणून बाजारात वाढती मागणी आहे. शिशाची संयुगे रंगद्रव्ये व रंगलेप ह्यांत शुष्कक म्हणून वापरली जात होती. पेट्रोल, कीटकनाशके, बंदुकींच्या गोळ्या ह्यांसाठी तसेच वीजतंत्री आणि नळकामगार शिशाचा जो वापर जोडण्या/जोडकामासाठी करीत तो आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळे बंद केला गेला आहे. शिसे, कथिल व कधीकधी अँटिमनी ह्यांच्या मिश्रधातूंना सहज आकार देता येत असल्यामुळे त्यांचा उपयोग मोनो, लायनो वगैरे टाइप तयार करण्यासाठी आणि घरगुती वापराची भांडी बनविण्याकरिता होत असे. छपाई तंत्रातील प्रगतीमुळे आणि लेड-विषबाधेची शक्यता टाळणे आवश्यक असल्यामुळे, हे उपयोग मागे पडले आहेत. ह्या प्रकाराच्या मिश्रधातूंचा वापर दागिन्यांचे साचे व धारवे यांमध्ये होतो.

संयुगे : शिशाची संयुजा प्लंबस संयुगांमध्ये +२ आणि प्लंबिक संयुगांमध्ये +४ असते. ऑक्सिडीकरणाच्या या दोन्ही अवस्थांमध्ये ती धातू किंवा अधातू असे गुण दाखवित असल्यामुळे त्यांचे चार वर्ग पडतात : प्लंबस लवणे, प्लंबाइटे (प्लंबस अम्लाची लवणे). प्लंबिक लवणे आणि प्लंबेटे (प्लंबिक अम्लाची लवणे).

ऑक्साइडे : शिसे आणि ऑक्सिजन यांची चार संयुगे आहेत : लेड मोनॉक्साइड : [लेड (II) ऑक्साइड PbO] याची लिथार्ज आणि मॅसिकॉट ही दोन रूपे आहेत. लिथार्ज किंवा आल्फा रेड (II) ऑक्साइड लाल किंवा लालसर पिवळा घनरूप पदार्थ असून त्यात चतुष्कोणीय स्फटिक संरचना असते. हे ४८८ o से. तापमानाखाली स्थिर असते. लेड मोनॉक्साइडाचा वितळबिंदू ८८८o से. इतका आहे. तयार झालेला लेड मोनॉक्साइड वितळू नये इतके कमी तापमान ठेवल्यास तयार होणाऱ्या पदार्थास मॅसिकॉट असे म्हणतात. मॅसिकॉट किंवा बीटा लेड (II) ऑक्साइड पिवळा घनरूप पदार्थ असून समचतुर्भुजी स्फटिक संरचना असते. हे ४८८o से. तापमानाच्या वर स्थिर असते. ही दोन्ही रूपे पाण्यामध्ये अविद्राव्य आहेत परंतु अम्लामध्ये विरघळल्यानंतर प्लंबस आयन (Pb2+) आणि क्षारकामध्ये विरघळल्यानंतर प्लंबाइट आयन (PbO22-) तयार होतात. लेड नायट्रेटाचे हवेत ऑक्सिडीकरण करून लिथार्जाचे (PbO) उत्पादन करतात. 

2 Pb(NO3)2 ⟶2 PbO + 4 NO2 + O

लिथार्जाचा उपयोग रबर व रंगलेप उद्योगांमध्ये, तसेच काच, एनॅमले व संचायक विद्युत घटाच्या पट्ट्या तयार करण्यासाठी होतो. ते व्हार्निशांमध्ये शिष्कक म्हणूनही वापरतात.

लेड डाय-ऑक्साइड : [लेड (IV) ऑक्साइड PbO2]. हे निसर्गामध्ये तपकिरी ते काळ्या रंगाच्या प्लॅटनेराइट खजिनामध्ये आढळते. ट्रायलेड टेट्राक्साइडाचे नायट्रिक अम्लाने किंवा क्लोरिनाने ऑक्सिडीकरण करून याचे व्यापारी उत्पादन करतात.

 Pb3O4 + 4 HNO3 ⟶ 2 Pb (NO3)2 + PbO2 + 2 H2O

तापविल्यानंतर लेड डाय-ऑक्साइडाचे विघटन होऊन नीच ऑक्साइडे तयार होतात. यांचा वापर रंगद्रव्ये, रसायने, शोभेचे दारूकाम व आगकाडी यांच्या निर्मितीमध्ये ऑक्सिडीकारक आणि पॉलिसल्फाइड रबरांकरिता कठिनताकारक म्हणून होतो.

ट्रायलेड टेट्रॉक्साइड : (Pb3O4). याला मिनियम किंवा लाल शिसे असे म्हणतात. हे नारिंगी-लाल किंवा विटकरी-लाल रंगद्रव्य आहे. याचा वापर लोखंड व पोलाद यांचे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी होतो. हे ऑर्थोप्लंबिक अम्लाचे लवण असल्यामुळे याचे सूत्र Pb2(PbO4) असेही लिहितात. ३५०o – ४७०o से. तापमानामध्ये लेड मोनॉक्साइड तापवून हे तयार करतात. ४७० o से. पेक्षा जास्त तापमान जास्त झाल्यास विघटन होऊन लिथार्ज (PbO) परत मिळतो. याची आयर्न (III) ऑक्साइडाबरोबर विक्रिया होऊन चिरचुंबकासाठी वापरण्यात येणारे फेराइट तयार होते.

लेड ट्राय-ऑक्साइड : (Pb2O3). हे लालसर पिवळे चूर्ण आहे. हे मेटाप्लंबिक अम्लाच्या लवणाशी संबंधित असल्यामुळे कधीकधी याचे सूत्र Pb(PbO3) असेही लिहितात.

लेड (II) असिटेट : [शुगर ऑफ लेड Pb (C2H3O2)2·3 H2O]. रंगहीन स्फटिक किंवा पांढरे चूर्ण. प्रबल असिटिक अम्लामध्ये लिथार्ज विरघळविल्यास पाण्यात विद्राव्य असलेले लवण तयार होते. जलसंयोगित पाणी गमावून हे हळूहळू फुलारते. हे स्तंभक म्हणून वापरता येते परंतु लेड आयन विषारी असल्यामुळे हे फक्त बाहेरून लावण्याकरिता किंवा पशुवैद्यकीय औषधांमध्ये वापरतात. वैश्लेषिक रसायनशास्त्रात, सुती कापडाच्या रंजनक्रिया व छपाई प्रक्रियांत आणि शिशाची इतर संयुगे तयार करण्यासाठी लेड असिटेटाचा वापर करतात. क्षारकीय असिटेट [Pb (C2H3O2)2 · Pb (OH)2] हे पांढरे चूर्ण कार्बनी विद्राव रंगहीन करण्यासाठी आणि विश्लेषणामध्ये साखरेच्या विद्रावाचे निश्चितीकरण करण्यासाठी वापरतात.

पांढरे शिसे : [क्षारकीय लेड कार्बोनेट Pb(OH)2·2PbCO3]. सघन पांढरे चूर्ण. हवा, कार्बन डाय-ऑक्साइड आणि असिटिक अम्ल यांची शिशावर विक्रिया करून पांढरे शिसे तयार करतात. याचा वापर पूर्वीप्रमाणे रंगद्रव्य म्हणून मोठ्या प्रमाणात होत नाही, कारण या संयुगाचा रंग हायड्रोजन सल्फाइडाने काळा बनतो. याचा वापर लांबी तयार करण्यासाठी आणि लेड कार्बोनेट पेपर तयार करण्यासाठी होतो.

लेड टेट्राएथिल : [Pb (C2H5)4]. सोडियम आणि शिसे यांच्या मिश्रधातूबरोबर एथिल क्लोराइडाची विक्रिया करून टेट्राएथिल लेड तयार 4 PbNa + 4 C2H5Cl ⟶ (C2H5)4 Pb + 4 NaCl + 3 Pb तयार करतात. हा रंगहीन द्रव पाण्यामध्ये अविद्राव्य आहे परंतु गॅसोलिनामध्ये लगेच विरघळतो आणि एथिल गॅसोलीन तयार होते. टेट्राएथिल लेड अंतर्ज्वलन एंजिनांमध्ये प्रत्याघाती संयुग म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते. एक गॅलन गॅसोलिनामध्ये २-३ मिली. हा प्रत्याघातीकारक मिसळला असता इंधनाचा ऑक्टेन दर सु. १० ऑक्टेन अंकापर्यंत वाढतो. ऑक्टेन अंकात वाढ झाल्यामुळे मोटारगाडी एंजिनातील संपीडन गुणोत्तर वाढून त्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. शिशाची संयुगे तयार करण्याकरिता आरंभक द्रव्य म्हणून लेड टेट्राएथिल मोठ्या प्रमाणात वापरत असत. आता मात्र लेड-फ्री पेट्रोलच विक्रीसाठी उपलब्ध असते.

इतर संयुगे : लेड आर्सेनेट व आर्सेनाइट यांचा वापर कीटकनाशक निर्मितीसाठी करतात. लेड बोरेट [Pb(BO2)2· H2O] अविद्राव्य पांढरे चूर्ण आहे. याचा वापर काच व चिनी मातीची भांडी यांवर लेप देण्यासाठी आणि रंगलेप व व्हार्निशे यांमध्ये शुष्कक म्हणून होतो. लेड क्लोराइड (PbCl2) हे पांढरे चूर्ण उष्ण पण्यामध्ये विरघळते. याचा वापर वेदनादायक सूजीकरिता वापरण्यात येणाऱ्या मलमांमध्ये होतो. लेड क्रोमेट (PbCrO4) यास क्रोम यलो असेही म्हणतात. हे संयुग रंगलेप, वस्त्रे, चिनी मातीची भांडी यांमध्ये महत्त्वाचे रंगद्रव्य म्हणून वापरतात. लेड नायट्रेट [Pb(NO3)2] हा पांढरा स्फटिकरूप घन पदार्थ आहे. हे पाण्यामध्ये लगेच विरघळते. हे स्तंभक म्हणून बाहेरून लावण्याकरिता वापरतात. आगपेटी निर्मिती, कापडावरील रंजनक्रिया व छ्पाई, उत्कीर्णन इ. उद्योगांमध्ये याचा उपयोग होतो.

लेड सल्फेट [PbSO4] हे अविद्राव्य पांढरे चूर्ण आहे. याचा वापर रंगद्रव्य म्हणून होतो, तसेच संचायक विद्युत् घटामध्ये व शिलामुद्रणामध्ये होतो. लेड सल्फाइड [PbS] हे काळे अविद्राव्य चूर्ण आहे. याचा वापर काच आणि सेरॅमिक फ्रिट हे सायुज्यित द्रव्य यांच्या निर्मितीकरिता होतो. लेड अझाइड [Pb(N3)2] हे स्फोटकद्रव्यांकरिता प्रमाणभूत विस्फोटक आहे.


मिश्रधातू : ०·१५% आर्सेनिक, ०·१% बिस्मथ व राहिलेला भाग शिसे असलेली मिश्रधातू तारेवरील आवरणामध्ये वापरतात. १–१३% अँटिमनी, १२–२०% कथिल, थोड्या प्रमाणात कॅल्शियम, तांबे आणि राहिलेला भाग शिसे या मिश्रणाने तयार केलेली मिश्रधातू गंजरोधक म्हणून वापरतात. विद्युत् घटमालेमध्ये वापरात येणाऱ्या जाळ्या किंवा पट्ट्या ह्या अँटिमनी, शिसे किंवा कॅल्शियम, शिसे व थोड्या प्रमाणात कथिल वापरून मिश्रधातू तयार केल्या जातात. यामध्ये ७–१२% अँटिमनी वापरले जाते. शिशाच्या मिश्रधातूची गुणवत्ता ही अँटिमनीच्या प्रमाणावर अवलंबून असते. काही वेळेस कमी श्यानतेचे शिसे तयार करण्यासाठी ६३% कथिल व ३७% शिसे वापरले जाते.

विषबाधा : शिसे आणि त्याची संयुगे विषारी आहेत. शरीराकडून ती धरून ठेवली जातात व फार काळ (प्राणघातक राशीपर्यंत) त्यांचा संचय होत राहतो. शिशाचा वाफारा, धूळ किंवा बाष्प यांच्या अंतःश्वसनामुळे किंवा शिसे असलेले रंगलेप गिळल्यामुळे ते शरीरात प्रवेश करू शकते. शिशाची काही कार्बनी संयुगे त्वचेमधून शोषली जाऊ शकतात. त्यांपैकी वाहनाच्या धुरामधून बाहेर पडणारा टेट्राएथिल लेड बाष्पनशील असल्याने त्याचा कातडीत सहज प्रवेश होऊ शकतो. याला वाईट वास येत नसल्यामुळे श्वासाबरोबर त्याचे बाष्प शरीरात जाण्याचा धोका अधिक असतो. ते चरबीत लवकर विरघळते व शरीरात त्याचे शोषण होते. शेवटी ते यकृतामध्ये व केंद्रीय तंत्रिका तंत्रामध्ये साठून राहते.

शिशाच्या विषबाधेमुळे वजनामध्ये घट, शूल, पोटदुखी, डोकेदुखी, ओकारी आणि गंभीर अवस्थेत पक्षाघात, आंधळेपणा, उत्तेजनक्षमता कमी होणे आणि आकडी (झटके) हे परिणाम दिसून येतात. रंगकाम व वितळजोडकाम करणाऱ्या कामगारांना आणि जे लोक धातू किंवा त्यांची संयुगे हाताळतात अशा सर्वांना व्यावसायिक आजार जडण्याचा धोका असतो [⟶ व्यवसायजन्य रोग]. कामगारांच्या रक्तामधील व लघवीमधील शिशाची पातळी दाखविणाऱ्या काटेकोर निदानीय तपासण्या केल्यास औद्योगिक विषबाधेस पूर्णपणे प्रतिबंध करता येतो परंतु केवळ चाचण्यांवर भरवसा ठेवून ह्या परिणामाबाबत अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि कामगार ह्यांचे आरोग्य व आयुष्य धोक्यात आणण्यास वावच राहू नये म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने अनेक क्षेत्रांत शिसे व त्याची संयुगे/मिश्रधातू ह्यांच्या वापरासच मनाई केली आहे. त्यामुळे शिशाचा पूर्वी होत असलेला वापर कमी झालेला आहे. त्याचबरोबर शिशाचे पदार्थातील अत्यल्प प्रमाणातीलही अस्तित्वाबाबतचे अभिज्ञान व्हावे ह्यासाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्याची माहिती पुढे दिली आहे.

अभिज्ञान : शिशाचा सल्फ्यूरिक अम्लाबरोबर किंवा विद्राव्य क्लोराइडांबरोबर पांढरा अवक्षेप आणि विद्राव्य आयोडाइडे, क्रोमेट किंवा डायक्रोमेट यांच्यावरोबर पिवळा अवक्षेप मिळतो. शिशाच्या विद्रावाचे थायकार्बाझोनच्या क्लोरोफॉर्ममधील विद्रावाने निष्कर्षण केले असता विटेसारखा तांबडा अवक्षेप मिळतो. या पद्धतीने १०७ भागांतील शिशाच्या एका भागाचे अभिज्ञान करता येते. लेड सल्फेट किंवा लेड क्रोमेटाच्या स्वरुपात शिशाचे भारात्मक परिमापन करता येते. लेड सल्फेट विद्रावात अमोनियम मॉलिब्डेटाबरोबर अनुमापन करून शिशाचे आयतनमापी परिमापन करता येते.

सूर्यवंशी, वि. ल.