शिसू : (शिशम, शिसवा, शिसवी हिं. शिशम गु. शिसम क. बिटे, तोडगट्टी सं. शिंशपा इं. ईस्ट इंडियन रोजवूड, बाँबे ब्लॅकवूड लॅ. डाल्बर्जिया लॅटिफोलिया कुल–लेग्युमिनोजी, उपकुल – पॅपिलिओनेटी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] या भारतीय वृक्षाचा प्रसार हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात, बिहार, ओरिसा आणि मध्य, पश्चिम व दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी आढळतो. मिश्रजंगलात तो इतस्तः विखुरलेला व अनेकदा सागवानाबरोबर वाढलेला आढळतो. सह्याद्रीच्या दक्षिण भागात त्याची सर्वोत्तम वाढ झालेली आढळते.

शिसूची पानगळ होते, पण नवी पालवी जलद येते, त्यामुळे हा नाममात्र पानझडी वृक्ष (किंवा सदापर्णी वृक्ष) ठरतो. सह्याद्रीच्या दक्षिण भागात त्याची उंची सु. ३९ मी. व घेर ६ मी. असतो. खोडाचा सोट २१ मी. उंचीपर्यंत असून तोच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा असतो. कमीत कमी सु. २ मी. घेराचा सोट उपयुक्त ठरतो. सामान्यतः याची उंची २५ मी. असून त्याच्या अनेक पसरट फांद्यांमुळे दाट सावली पडते. पाने एकाआड एक, संयुक्त, विषमदली व पिसासारखी असून १०–१५ सेंमी. लांब असतात. प्रत्येक दल गोलसर व टोकास बोथट, दोन्ही बाजूंस गुळगुळीत, तळाशी काहीसे टोकदार, खालच्या बाजूस फिकट व वरील बाजूस गर्द हिरवे व लहान देठाचे असते. परिमंजरी प्रकारचे फुलोरे पानांच्या बगलेत किंवा तळाच्या आसपास येतात व ते पानांपेक्षा कमी लांब असतात. फुलांचा हंगाम ऑगस्टमध्ये असतो. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. शेंगा पट्टीसारख्या सपाट, लांबट, फिकट तपकिरी, पातळ (बियांभोवती फुगीर), दोन्हीकडे टोकदार व न तडकणाऱ्याअसतात. बिया १–३, क्वचित ४ व मुत्रपिंडाकृती असतात.

शिसू (डाल्बर्जिया लॅटिफोलिया) : पाने, फुलोरे व शेंगा यांसह फांदी.

मुनवे, बाजूच्या मुळांचे तुकडे, बिया व त्यांपासून पन्हेरीत तयार केलेल्या रोपांचे खुंट इत्यादींचा वापर नवीन लागवडीसाठी करतात. बियांची लागण शेंगांचे एकबीजी तुकडे घेऊन ते सु. ३.५ मी. अंतराच्या रांगांत परस्परांपासून सु. ०·४५ मी. अंतरावर लावून करतात. याच वृक्षांचा मळा (रोपवन) करावयाचा असल्यास खुंट किंवा रोपे प्रथम ४·५ मी. अंतराने लावतात व पुढे ती एकाआड एक काढून टाकतात. खोडाचा घेर १.८ मी. होण्यास स्थलपरत्वे ८० ते १६० वर्षे लागतात. मध्यम वयाच्या शिसूच्या वृक्षाची वाढ सागनावापेक्षा अधिक असते परंतु लहान व जून वृक्षाची वाढ सागवानापेक्षा मंद असते.

खोडातील रसकाष्ठ (बाहेरचा भाग) अरुंद व फिकट पिवळसर पांढरे असून कधीकधी त्यावर जांभळट छटा असते. मध्यकाष्ठाचा रंग सोनेरी तपकिरी असून मधूनमधून फिकट गुलाबी, जांभळट ते गर्द जांभळ्या किंवा काळ्या रेषा कमी-अधिक अंतरावर असतात. लाकूड सुगंधी, जड, सागवानापेक्षा अधिक मजबूत व कठीण असते. कठीणपणामुळे ते कापकामास अवघड असते. यांत्रिक पद्धतीने कापणी व रंधणी करून त्याला उत्तम झिलई करता येते. सजावटी सामान व कपाटे-पेट्या यांसारख्या वस्तूंकरिता भारतीय लाकडांत याची प्राधान्याने निवड करतात. यूरोप व अमेरिकेत याचा उपयोग मुख्यतः पियानो तयार करण्यासाठी करतात. विविध घरगुती व औद्योगिक प्रकारच्या वस्तू करण्यासाठी शिसूचे लाकूड प्राधान्याने वापरतात.

कॉफीच्या मळ्यात सावलीसाठी शिसूची लागवड करतात. त्याच्या सालीत टॅनीन असते. पांढरी कूज या रोगाचा शिसूला उपद्रव होतो.

परांडेकर. शं. आ.