शिवालिक संघ : भारतातील खडकांच्या एका समूहाचे हे नाव असून हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या टेकड्या मुख्यतः या खडकांच्या बनलेल्या आहेत. सुमारे ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या ⇨तृतीयसंघातील अगदी अलिकडच्या काळातील शैलसमूह भारताच्या द्वीपकल्पाबाहेरील भागात प्रचंड प्रमाणात आढळतात. सिंधू नदी (बन्नू मैदान, पाकिस्तान) ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतच्या (पोटवार पठार) हिमालयाच्या दक्षिणेकडील बुटक्या पायथ्या-टेकड्यांत हा शैलसमूह आढळतो. गंगा-यमुना नद्यांदरम्यानच्या व हरद्वारजवळच्या शिवालिक टेकड्यांवरून संघाचे हे नाव पडले आहे, कारण येथील खडकांचा अभ्यास सर्वप्रथम करण्यात आला (१८३९). पुराजीवविज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा जीवाश्मांचा (शिळाभूत झालेल्या जीवावशेषांचा) समृद्ध साठा या खडकांत आढळल्याने या संघाला जगभर प्रसिद्धी मिळाली. याच प्रकारचे पुष्कळ खडक व जीवाश्म असलेले शैलसमूह बलुचिस्तान, सिंध, आसाम व म्यानमार येथेही पायथ्या-टेकड्यांत तयार झालेले आढळतात. हिमालयाबाहेरील या शैलसमूहांना स्थानिक नावे दिली आहेत. उदा., मक्रान (बलुचिस्तान), मंचर (सिंध), टिपम डुपी टिला व डिहिंग (आसाम) आणि इरावती (म्यान्मार) संघ.

शैलसमूह : शिवालिक संघातील खडकांच्या संघटनांवरून ते कसे तयार झाले ते कळते. पर्वताची झीज होऊन बनलेली डबर तेथील अनेक नद्या व जलप्रवाहांनी वाहून खाली आणली व ती पायथ्याशी गाळाच्या रुपात साचली. मात्र हिमालयाचे उत्थान होताना हा संघ तयार झाल्याने या गाळाच्या सर्वांत बाहेरच्या टेकड्यांत या खडकांना घड्या पडल्या किंवा ते तिरपे झाले. परिणामी त्यांना उच्च नती प्राप्त होऊन काही प्रमाणात हे गाळ कठीण झाले. घड्या पडल्याने काही थर उलटे झाले. या थरांचा संकोच होऊन व त्यांच्यावर ताण पडून प्रणोद विभंग (तिरपे तडे) निर्माण झाले आणि खालचे अधिक जुने खडक तुलनेने अधिक नवीन खडकांवर दीर्घ अंतरापर्यंत घसरत गेलेले आढळतात. या संपर्क पातळीला मुख्य सीमावर्ती विभंग म्हणतात, कारण याने शिवालिक संघाची सीमा व मर्यादा उघड होते. हा व्युत्क्रमी विभंग शिवालिक पायथ्या-टेकड्यांचे लक्षणीय भूसांरचनिक वैशिष्ट्य असून तो सिंधू ते ब्रह्मपुत्रा असा सर्व लांबीभर आढळतो. अर्थात हा एकच विभंग नाही, तर समांतर विभंगांची ही एक मालिका आहे. यामुळे बाह्य हिमालय पर्वतरांगा बनल्या असून त्यांच्यात सर्वत्र ही भूसांरचनिक व नव्यावर जुने थर असलेली रचना आढळते.

जीवाश्म : पुराजीवविज्ञानाच्या दृष्टीने या खडकांतील जीवाश्म अतिशय महत्त्वाचे आहेत. यांच्यात अनेक ठिकाणी पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचे विपुल जीवाश्म आढळले आहेत. जमिनीवर राहत असणाऱ्या आताच्या प्राण्यांच्या निकटच्या पूर्वजांचे हे जीवाश्म असून यांत बहुतेक आधुनिक सस्तन प्राण्यांच्या जातींचे (उदा., पाणघोडा, जिराफ, मॅस्टोडॉन, गाय, म्हैस, उंट, घोडा, माकडे, गवे, वाघ, कपी, हरणे, हत्ती वगैरेंचे) पूर्वज येतात. ते पर्वतांच्या बाहेरच्या उतारावरील जंगलात व दलदलीत राहत. त्यांचे सांगाड्यातील कठीण भाग दात, जबडे, कवट्या वगैरे भाग टिकून राहिले. उबदार व दमट जलवायुमान, विपुल अन्न व योग्य प्रकारचे पर्यावरण यांच्यामुळे त्या काळात आताच्या तुलनेत प्राणिसृष्टी फारच समृद्ध होती. (उदा., तेव्हा हत्ती व हत्ती सारख्या प्राण्यांच्या तीस जाती होत्या, तर आता त्यांपैकी एकच जाती उरली असून उरलेल्या निर्वंश झाल्या). यांपैकी ‘शिवाथेरियम’ हा प्राणी रवंथ करणारे प्राणी व हत्तीसारखे प्राणी यांतील दुवा मानतात. त्याला चार शिंगे व सोंडही होती. यांशिवाय मगरी, कासवे, कुर्म, कृंतक प्राणी, शहामृगासारखे न उडणारे पक्षी, मृदुकाय प्राण्यांसारखे पाठीचा कणा नसणारे अपृष्ठवंशीय प्राणी यांचेही जीवाश्म यांत आढळले असून सपुष्प वनस्पतींची अश्मीभूत खोडे व शेल खडकांवरील पानांचे ठसे आढळले आहेत. यांपैकी ‘कलोसोचेलिस ऍटलस’ हा सहा मीटर लांबीचा कूर्म वैशिष्ट्यपूर्ण प्राणी होता. या काळातील प्राण्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) झपाट्याने झाल्याचे या जीवाश्मांवरून उघड होते.

खडक : शिवालिक संघाच्या गाळाच्या खडकांचे थर अतिशय जाड (सु. ४,५०० ते ५,५०० मी.) असून त्यांच्यात ओबडधोबड थरांचे वालुकाश्म, वाळूचे व खरीचे दगड, पिंडाश्म, मृत्तिका, गाळवट वगैरे खडक आहेत. खालील भागात सूक्ष्मकणी अभ्रकयुक्त व काहीसे घट्ट झालेले वालुकाश्म असून त्यांच्यात अधुनमधुन तांबड्या व जांभळ्या शेल खडकांचे थर आढळतात. शिवाय अश्मीभूत व पूर्ण खोडे व लाकडे, वालुकाश्मावरील व शेल खडकांवरील पानांचे ठसेही आढळतात. वरच्या भागात अधिक मृण्मय, मऊ, जाड थरयुक्त मृत्तिका असून काही ठिकाणी अगदी माथ्यावर मोठे, सिलिकामय गोलसर दगडगोटे असणारे अगदी भरड पिंडाश्म आढळतात. या खडकांवरूनही त्यांची उत्पत्ती सूचित होते. हिमालयाच्या ग्रॅनाइटी गाभ्याची मुख्यतः जोरदार जलप्रवाहांनी झीज होऊन बनलेली डबर ⇨शिवालिक नदीच्या लांब-रुंद खोऱ्यात साचून हे खडक बनले. मूळ खडक एकच व गाळ साचण्याची सलग द्रोणी यांमुळे येथील खडकांत एकसारखेपणा आढळतो. खालचे थर पुढे गोड्या झालेल्या नदीमुखांत व सिंधुतडागांत (खाजणांत) साचले आहेत (उदा., कामलियल टप्पा). हिमालयाच्या उत्थानांमुळे पुनरुज्जीवित होणाऱ्या नद्यांद्वारे हे खडक अतिशय जलदपणे साचले. त्यामुळे त्यांच्यात चांगले थर तयार झाले नाहीत व आकारमानानुसार कणांची मांडणी झाली नाही. काही ठिकाणी प्रवाहस्तरण आढळते. उलट मूळच्या ग्रॅनाइटी पट्टिताश्म खडकांतील क्वॉर्टझ, फेल्स्पार, अभ्रके, हॉर्नब्लेंड, तोरमल्ली, मॅग्नेटाइट, एपिडोट, गार्नेट, रुटाइल, झिरकॉन, इल्मेनाइट इ. घटक खनिजे सहज ओळखू येतात. हिमालयाचे उत्थान होताना नद्यांचे पुनरुज्जीवन होऊन शिवालिक संघाचे खडक अधिकाधिक दक्षिणेला साचत गेले. कदाचित गंगा-सिंधू नद्यांच्या गाळाखाली शिवालिक संघातील खडकांचा अनेक किमी. रुंद पट्टा गाडला गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

वर्गीकरण : शिवालिक संघाचे उत्तर (वरचा), मध्य आणि पूर्व (खालचा) या तीन गटांत वर्गीकरण करतात. हे वर्गीकरण सामान्यपणे जीवाश्मांवरून करतात.

उत्तर शिवालिक : या गटातील शैलसमूहाची जाडी सु. १,८०० ते २,७००मी. आहे. भरड दगडगोट्यांचे पिंडाश्म, मातकट मृत्तिकांचे जाड थर, वाळू, रेव आणि वरच्या भागात गाळ हे यातील मुख्य खडक आहेत. शिवालिक टेकड्यांच्या भागातील या खडकांत विपुल जीवाश्म आढळले आहेत. पुढील उदाहरणांत दिलेल्या सध्याच्या प्राण्यांच्या पूर्वजांचे हे जीवाश्म आहेत. उदा., मांसाहारी प्राणी (कोल्हा, तरस, वाघ, बिबळ्या), हत्ती व त्यासारखे प्राणी (मॅस्टोडॉन, स्टेगोडॉन, एलेफस प्लेनिफ्रॉम्स), खुरी प्राणी (घोडा, पाणघोडा, डुक्कर, गाय, म्हैस, गेंडा, उंट, जिराफ, गवा वगैरे). नरवानर गणातील प्राण्यांचे अवशेष (उदा., सिमिया, पॅपिओ इ. प्रजाती) हे या गटाचे वैशिष्ट्य असून मानवसदृश्य कपींच्या सु. १५ प्रजाती आढळल्या आहेत. मात्र त्यांचे अवशेष खंडश: आढळल्याने त्यांच्या माणसापर्यंतच्या क्रमविकासाचा मागोवा घेण्याचे काम अतिशय अवघड झाले आहे. उत्तर शिवालिक गटाचा काळ पूर्व प्लायोसीन ते पूर्व प्लाइस्टोसीन असा (सु. १ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीचा) सुचविण्यात आला आहे.

मध्य शिवालिक : या सु. १,८०० ते २,६०० मी. जाडीच्या शैलसमूहात करडे व पांढरे घट्ट वालुकाश्म, कमी प्रमाणात शैल व बहुधा लालसर मृत्तिका आणि माथ्याशी दगडगोटे हे खडक आढळतात. मिठाच्या डोंगरात सर्वांत विपुल जीवाश्म सापडले आहेत. पाणघोडे, जिराफासारखे मोठे प्राणी, डुकरे, मेरिकोपोटॅमस मॅस्टोडॉन, हिप्पारियन, प्रोस्टेगोडॉन, हत्ती, कृंतक प्राणी, नरवानर गणातील प्राणी इत्यादींचे जीवाश्म येथे आढळले आहेत. त्यांवरून या गटाचा कालावधी मध्य मायोसीन ते पाँटियन (सु. १·२ ते १ कोटी वर्षांपूर्वीचा) असा काढण्यात आला आहे.

पूर्व शिवालिक : या गटातील शैलसमूहाची जाडी सु. १,१०० ते १,५०० मी. असून यात भडक तांबडे गाठी असलेले शेल, मृत्तिका, करडे वालुकाश्म, छद्मपिंडाश्म, जांभळे शेल, गडद कठीण वालुकाश्म इ. खडक आढळतात. यात शिवालिक टेकड्यांच्या भागात जीवाश्म आढळले नाहीत, तर पंजाबात पुष्कळ जीवाश्म आढळले आहेत. उदा., लिस्ट्रिओडॉन, अँफिसियॉन, जिराफोहायरिक्स, टेट्राबेलोडॉन, असेराथेरियम, टेलमॅटोडॉन, हायोबूप्स, नरवानर गणाचे प्राणी वगैरे. यांशिवाय सरिसृप (उदा., साप), मासे, पक्षी, हरणे, मृदुकाय प्राणी (उदा., शंख) यांचे जीवाश्म आणि अश्मीभूत वनस्पती व लाकडाची ऊतकेही या गटात आढळली आहेत. या गटाचा कालावधी हेल्बेशियन ते मध्य मायोसीन (सु. १·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीचा) असा काढला आहे.

वय : शिवालिक संघातील खडक मुख्यतः गोड्या पाण्यात साचलेले व काही थोडे जमिनीवर साचलेले आहेत. यामुळे त्यांचे वय निश्चितपणे ठरविणे अवघड होते. प्राण्यांच्या क्रमविकासातील विविध टप्पे व त्यांच्याशी जुळणाऱ्या विविध सस्तन प्राण्यांनी युक्त अशा युरोपातील पातळ्या वा टप्पे यांवरून शिवालिक संघाचे वय मध्य मायोसीन ते पूर्व किंवा अगदी मध्य प्लाइस्टोसीन (सु. १·५ कोटी ते सु. ४ ते ६ लाख वर्षांपूर्वीचा कालावधी) असे सुचविण्यात आले आहे.

पहा : शिवालिक नदी.

संदर्भ : 1. Dey, A. K. Geology of India, New Delhi, 1968.

           2. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.

           3. Pascoe, E. H. A Manual of the Geology of India and Burma, 3 Vols., Delhi, 1965.

           4. Wadia, D. N. Geology of India, London, 1961.

                                                    

ठाकूर, अ. ना.